Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 20 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी आज शपथ घेतली. दिल्लीतल्या रामलीला मैदानावर झालेल्या या शपथग्रहण सोहळ्यात दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी, गुप्ता यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. प्रवेश वर्मा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, विविध केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, रोहिणी विधानसभा क्षेत्रातून निवडून आलेले विजेंद्र गुप्ता यांची दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचं याबाबातच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर मधल्या औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी - ऑरिकला देशातलं उत्तम औद्योगिक क्षेत्र बनवण्याचा संकल्प असून, येणार्या काळात मराठवाडा सर्वात मोठं औद्योगिक हब बनेल, असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. ऑरिक सिटीत काल उद्योजकांशी झालेल्या चर्चेविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली. ऑरिक सिटीत जवळपास सात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, याठिकाणी नागरीक आणि कामगारांसाठी घरे, रुग्णालय, विद्यापीठ यासारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असल्याचं गोयल यांनी सांगितलं. या औद्योगिक क्षेत्रात कौशल्य विकास केंद्र तसंच स्टार्ट अप इन्क्यूबेशन हब बनवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मराठवाड्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असून, हा वारसा विकासाशी जोडण्याचं काम महायुती सरकार करत असल्याचं, गोयल म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा वेगाने विकास होत असून, त्याचा परिणाम म्हणूनच महाराष्ट्र, हरियाणा आणि आता दिल्लीमध्ये देखील भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं. आता मोदी सरकारच्या तिसर्या कार्यकाळातही तिप्पट वेगानं, प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प गोयल यांनी व्यक्त केला.
****
उपराष्ट्रपती जगदीप धनखड परवा २२ तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ व्या पदवीदान समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. संविधान जागृती वर्षाचं तसंच शहरातल्या सरस्वती भूवन महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवाचं उद्घाटन देखील धनखड यांच्या हस्ते होणार आहे.
****
९८ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यापासून दिल्लीत सुरु होत आहे. डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित असतील. दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियम मध्ये छत्रपती शिवाजी महराज साहित्यनगरीत तीन दिवस चालणार्या या संमेलनात, मान्यवरांच्या मुलाखती, बहुभाषिक कवी संमेलन, विविध विषयावर परिसंवाद, आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
दिल्ली ते पुणे वार्षिक सायकल मोहिमेच्या अंतिम टप्प्याचा यशस्वी समारोप काल सिंहगडावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्याने केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसंच संरक्षण मंत्रालयाच्या पाठिंब्याने ही मोहिम राबवण्यात आली. या उपक्रमाद्वारे तंदुरुस्ती, सहनशक्ती आणि भारताच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचा उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक आणि जगप्रदक्षिणा पूर्ण करणारे पहिले तसंच एकमेव भारतीय, विष्णुदास चापके यांनी ही माहिती दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीतल्या परिचारिकांनी आज विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. पदोन्नतीसह, परिचारिकांना मिळणारे भत्ते विशेषतः परिचर्या भत्ता, ग्रामीण रुग्णालयात परिसेविका पद पुनर्जीवित करणं, बंधपत्रित परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करणं, बक्षी समिती खंड-२ मध्ये परिचर्या संवर्गावर झालेला अन्याय दूर करणं, परिविक्षा कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून अधिपरिचारिका पद वगळणं, यासह इतर मागण्यांचं निवदेन परिचारिका संघटनेच्या वतीने रुग्णालय प्रशासनाला देण्यात आलं.
****
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे लेखाधिकारी संजय कोलते यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
नवव्या आयसीसी अजिंक्यपद चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना बांग्लादेशविरुद्ध होणार आहे. दुबईत होत असलेला हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरु होईल.
****
No comments:
Post a Comment