Monday, 1 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.09.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 01 September 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      शांघाय सहकार्य संघटनेच्या जाहीरनाम्यात भारताच्या प्रादेशिक सहकार्य आणि नवोन्मेष क्षेत्रातल्या योगदानाची विशेष दखल; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध 

·      मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार एक नवीन शासन निर्णय काढण्याच्या तयारीत

·      मुंबई उच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण आंदोलनाला दोन दिवस वाढीव परवानगी

·      ज्येष्ठागौरी पूजनाचा सोहळा सर्वत्र पारंपरिक पद्धतीने साजरा-उद्या गौरी विसर्जन

आणि

·      राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्हा योगासन संघटनेला दोन सुवर्णपदकं

****

चीनमधे तिएनजीन इथं सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर बैठकीनंतर तिएनजीन जाहीरनामा प्रसिद्ध  झाला. त्यात भारताच्या प्रादेशिक सहकार्य आणि नवोन्मेष क्षेत्रातल्या योगदानाची दखल घेण्यात आली आहे. तसंच यात दहशतवादाविरोधात स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून या हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या प्रियजनांप्रति सहवेदना व्यक्त केल्या आहेत. हल्ला घडवून आणणाऱ्यांना जबाबदार धरायला हवं अशी स्पष्ट भूमिका घेऊन सर्व सदस्य देशांनी दहशतवादाविरोधात लढाईप्रति वचनबद्ध असल्याचं सांगितलं. मे २०२५ मधे शांघाय सहकार्य संघटनेचा थिंक टँक फोरम भारतात यशस्वीपणे घेण्यात आला, त्याबद्दल सदस्य देशांनी भारताचं अभिनंदन केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात आज चीनमधे तिएनजीन इथं द्विपक्षीय चर्चा झाली. ऊर्जा, आर्थिक क्षेत्रात द्विपक्षीय संबंधामुळे सातत्याने होणाऱ्या प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं. युक्रेनमधला संघर्ष थांबवण्यासाठी रशियाने उचललेल्या पावलांवर मोदी यांनी समाधान व्यक्त केलं तसंच यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त केली. दोन्ही देशातील धोरणात्मक संबंध अधिक बळकट करण्यावर यावेळी सहमती झाली. दरम्यान आपला चीन दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले.

****

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार एक नवीन शासन निर्णय-जीआर काढण्याच्या तयारीत आहे.  आरक्षणाबाबत स्थापन मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. महाधिवक्त्यांनी कायदेशीर बाजू तपासल्यानंतर याबाबतचा मसूदा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यात येईल, आणि त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं विखे पाटील यांनी सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयानं या आंदोलनासाठी वाढीव दोन दिवस परवानगी दिली आहे. याच काळात सरकारचा जीआर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

दरम्यान, आझाद मैदानाबाहेर मराठा आंदोलक असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात आज विशेष सुनावणी झाली. अमी फाऊंडेशनं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम अंखड आणि रविंद्र घुगे यांच्या पीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. सीएसएमटी, मंत्रालय, मरीन ड्राइव्ह, उच्च न्यायालय आणि इतर परिसरात आंदोलक का जमले आहेत, असा सवाल न्यायालयानं केला.

****

न्यायालयाच्या या निरीक्षणाच्या अनुषंगाने बोलतांना, आरक्षणासाठीचं आंदोलन फक्त आजाद मैदानातच व्हायला हवं, मैदानाबाहेर निदर्शनं झाल्यास, ते आंदोलन समजलं जाणार नाही, असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. अशा लोकांवर कारवाईचा इशाराही विखे पाटील यांनी दिला.

****

मराठा समाजातील तरुणांची माथी भडकावून राजकीय स्वार्थ साधण्याचं राजकारण विरोधकांकडून केले जात असल्याची घणाघाती टीका अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मराठा आंदोलनाची दिशा भरकटली असून सध्याचे आंदोलन हे केवळ व्यक्तिविरोधी असल्याचं पाटील यांनी नमूद केलं.

माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी बंद केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात पुनर्स्थापना केली. या महामंडळाच्या माध्यमातून केलेल्या कामकाजाचा पाटील यांनी आढावा घेतला. ते म्हणाले...

बाईट - अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील

 

महायुती सरकार मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढेल, तोपर्यंत शांततेत आंदोलन करावं, असं आवाहन त्यांनी केलं. महाराष्ट्रात मराठा समाजाचे १२ मुख्यमंत्री झाले पण त्यांनी समाजाला काहीच दिलं नाही. मराठवाड्यातले सर्वात जास्त मुख्यमंत्री होते तरीही गरीबी का दूर झाली नाही याविषयावर पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यावेळी सत्तेत असलेल्या पक्षांनी आत्मचिंतन करण्याची गरजही नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली...

बाईट - अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील

****

महावितरणमध्ये विद्युत सहायकपदी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी २० ते २२ ऑगस्ट दरम्यान पूर्ण झाली आहे. तथापि अतिवृष्टी तसेच इतर कारणांमुळे गैरहजर असलेल्या काही उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी नऊ आणि १० सप्टेंबरला शेवटची संधी देण्यात आली आहे. कागदपत्रांची पडताळणी राहिलेले जे उमेदवार यासाठी हजर राहणार नाहीत, त्यांची निवड रद्द समजली जाईल आणि भविष्यात त्यांच्याशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, असं महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

****

ज्येष्ठागौरी पूजनाचा सोहळा आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे. आज दुपारनंतर घरोघरी पंचपक्वान्नांसह सोळा भाज्यांचा सुग्रास नैवेद्य गौरींना अर्पण करून त्यांचं पूजन करण्यात आलं. उद्या या तीन दिवसीय सोहळ्याची गौरी विसर्जनाने सांगता होणार आहे.

****

देशभरात नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असलेला हिंगोलीच्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थांनच्या वतीने यावर्षी दीड लाख नवसाचे मोदक वाटप करण्यात येणार आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर...

दरवर्षी देशभरातून तीन ते चार भाविक या ठिकाणी दर्शनासाठी व नवस पूर्ण करण्यासाठी येतात. महाराष्ट्रासह, दिल्ली, गुजरात, राजस्थानतेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील भाविकांचीही येथे मोठी संख्या असते. गणेशोत्सवानिमित्त येथे दहा दिवस धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. अनंतचतुर्दशीच्या दिवशी सप्टेंबर रोजी कयाधू नदीवरून कावड आणली जाईल. पहाटे चार वाजता बाप्पाला महाभिषेक केल्यानंतर मोदकोत्सवाला सुरुवात केली जाणार असल्याचे संस्थांच्या वतीने कळविण्यात आले आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.

 

आखाडा बाळापूर इथला बालकलावंत शिवार्थ दारव्हेकर याने श्री गणेशासमोर भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' ची चित्रकथा साकारली आहे. हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांची मोठी रीघ लागली आहे.

****

भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनने टोकियो येथे होणाऱ्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी भारताचा अंतिम १९ सदस्यीय संघ जाहीर केला. या संघाचे नेतृत्व भालाफेक विश्वविजेता निरज चोप्रा करणार आहे. या संघात १४ पुरुष आणि ५ महिला खेळाडूंचा समावेश आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन क्रीडा संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या वरिष्ठ गटातील राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत धाराशिव जिल्हा योगासन संघटनेच्या योग अभ्यासकांनी दोन सुवर्ण तसंच एक कांस्यपदक पटकावलं. २८ ते ३५ वर्ष महिला वयोगटात सीमा चौरे यांनी लेग बॅलन्स प्रकारात तर ३५ ते ४५ वर्ष पुरुष वयोगटात सतीश साबळे यांनी ट्विस्टिंग प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. तर याच वयोगटात सुपैन प्रकारात परमेश्वर चौरे यांनी कांस्यपदक पटकावलं आहे.

छत्तीसगड इथं होणाऱ्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी सीमा चौरे आणि सतीश साबळे यांची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

****

जालना इथल्या डॉ. प्रदीप सोनवणे रुग्णालयाला जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याप्रकरणी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. असा कचरा उघड्यावर टाकू नये, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा जालना महानगरपालिकेनं दिला आहे.

****

यंदाच्या खरीप हंगामात मे ते ऑगस्ट या चारही महिन्यात नांदेड जिल्ह्याला प्रतिकूल निसर्गाचा मोठा फटका बसला असून जिल्ह्यातील ९३ पैकी ८८ मंडळात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. रस्ते, पूल, घरं, पशुधनासह शेतीचं मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान पाहता जिल्ह्याला भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

 

लातूर जिल्ह्याच्या रेणापूर प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून ६२९ पूर्णांक २२ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद या वेगाने विसर्ग करण्यात येत आहे.

जायकवाडी धरणात सध्या सुमारे ७ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरु असून गोदापात्रात १४ हजार ६७२ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने विसर्ग सुरु आहे.

****

येत्या २४ तासात मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याचे वारे आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

****

No comments: