Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 03
September 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
जीएसटी अर्थात वस्तु आणि सेवा कर परिषदेची छप्पनावी बैठक
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सुरु आहे.
भारताच्या भावी पिढीसाठी जीएसटी करांना तर्कसंगत बनवणं तसंच नियमांचं पालन करण्यात
सुलभता होण्याच्या दृष्टीने जीएसटी करांमधील सुधारणांवर या बैठकीत विचार विनिमय होण्याची
शक्यता आहे. अनेक राज्य तथा केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री या बैठकीत सहभागी झाले
आहेत.
गेल्या महिन्यात स्वातंत्र्यदिनी झालेल्या भाषणात पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी पुढील पिढीसाठी जीएसटी सुधारणा येत्या दिवाळीपर्यंत जाहीर केल्या
जातील, असं सुतोवाच केलं होतं. या सुधारणांमुळे
जीवनावश्यक वस्तुंचे दर कमी होतील आणि स्थानिक विक्रेत्यांनाही दिलासा मिळणार आहे.
****
सेमीकॉन इंडिया २०२५ या नवी दिल्लीत यशोभूमीत सुरु असलेल्या
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेमीकंडक्टर क्षेत्रातील
तज्ञांशी चर्चा केली. त्यांनी या परिषदेतल्या प्रदर्शनाला भेट देऊन सेमीकंडक्टरशी निगडीत
विविध उत्पादनं आणि परियोजनांची माहिती जाणून घेतली.
दरम्यान, सेमीकॉन इंडियातील आजच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आजच्या
गोलमेज परिषदेतही पंतप्रधान सहभागी होत आहेत. या गोलमेज परिषदेत जगभरातले उद्योग क्षेत्रातले
दिग्गज सहभागी असून, भारतातल्या सेमीकंडक्टर
परिस्थितीकी तंत्र आणि विकास यावर ते चर्चा करणार आहेत. उद्या या परिषदेचा समारोप होणार
आहे.
****
छत्तीसगढ़च्या कर्रेगुट्टालु या डोंगराळ प्रदेशात ऑपरेशन
ब्लॅक फॉरेस्ट ही मोहीम यशस्वीपणे राबवल्याबद्दल केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी
आज केंद्रीय राखीव पोलीस दल -सी आर पी एफ, छत्तीसगढ़ पोलीस, डीआरजी आणि कोबरा च्या सैनिकांना सम्मानित केलं. ऑपरेशन ब्लॅक
फॉरेस्ट मोहीमेदरम्यान या जवानांनी दाखवलेलं शौर्य, धैर्य आणि पराक्रमाचं स्मरण नक्षलविरोधी अभियानाच्या इतिहासात
सुवर्ण अध्याय म्हणून नोंदवलं जाईल, असं ते यावेळी म्हणाले. देशाला नक्षलमुक्त करण्याप्रति केंद्र
सरकार कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चारही अमित शाह यांनी यावेळी केला.
दरम्यान, छत्तीसगड च्या बीजापूर जिल्ह्यात सुरक्षा बलांनी काल १६ नक्षलवाद्यांना अटक केली. या नक्षलवाद्यांकडून विस्फोटकं तसंच आपत्तीजनक
इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मध्य रेल्वेच्या
अहिल्यानगर-बीड-परळी या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या कामाबाबत आज आढावा बैठक पार
पडली. या बैठकीत प्रलंबित कामं, रेल्वेसंदर्भात नवीन धोरण, जमीन खरेदीसंबंधी येणाऱ्या अडचणी, स्थानकांसाठी आवश्यक सीसीटीव्ही कॅमेरे तसंच इतर प्रलंबित विषयांवर
सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रकल्पासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून दिला
जाईल, असं आश्वासन पवार यांनी यावेळी दिलं.
त्याचप्रमाणे प्रलंबित कामं लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना
योग्य त्या सूचना केल्या.
****
सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील १७० प्रशिक्षणार्थी
पोलिसांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस झाली आहे. विषबाधा झालेल्यांपैकी १५ जणांवर
सोलापूर इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस प्रशिक्षण केंद्रात जवळपास
एक हजार ३५० प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. काल सायंकाळच्या सत्रात या प्रशिक्षणार्थींना
उलटी, जुलाब, मळमळ याचा त्रास झाला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं जर जरी बक्ष
यांचा ७३९ वा उर्स महोत्सव १४ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी
निर्माण होऊ नये, यासाठी खुलताबादला जाणारी
आणि येणाऱ्या जड वाहनांसाठी वाहतूक मार्गात बदल
करण्यात येत असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी जारी केले आहेत.
कन्नड - वेरुळ - खुलताबाद - दौलताबाद - छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतूक - कन्नड
- वेरुळ - कसाबखेडा फाटा - वरझडी - माळीवाडा - शरणापूर फाटा या मार्गे वळवण्यात आली
आहे.
****
ज्येष्ठ मराठी लेखक कवी बी. रघुनाथ यांच्या स्मृती दिनानिमित्त
छत्रपती संभाजीनगर आणि परभणी इथं स्मृती सोहळा आणि महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं येत्या सात तारखेला होणाऱ्या या महोत्सवात, प्रसाद कुमठेकर यांच्या ‘इतर गोष्टी’ या कथासंग्रहाला ‘बी. रघुनाथ पुरस्कार’ प्रदान करण्यात येईल. यावेळी आधुनिक मराठी कवी केशवसुत ते शांता
शेळके यांच्या कवितांवर आधारीत ‘शताब्दी कविता’ हा विशेष कार्यक्रम
सादर होणार आहे. परभणी इथं १४ ते १७ सप्टेंबर दरम्यान हा महोत्सव होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा लोकशाही दिन येत्या
सोमवारी आठ तारखेला सकाळी १० वाजता मनपाच्या प्रशासकीय समिती कक्षात होणार आहे.
धाराशिव जिल्ह्यातही सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी सकाळी ११ ते एक या वेळेत जनता
दरबार आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली.
****
No comments:
Post a Comment