Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 September
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
· येत्या १७ सप्टेंबरला हैदराबाद मुक्ती संग्रामदिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वेगाडीचा
शुभारंभ
· ओबीसी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी उपसमिती नेमण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
· संजय गांधी निराधार तसंच श्रावणबाळ दिव्यांग योजनेच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपये
वाढ
· हैदराबाद गॅझिटियर लागू करण्याचा निर्णय कायद्याच्या चौकटीतच-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्वाळा
आणि
· १७ सप्टेंबरपासून देशभरात सेवा पंधरवडा-७५ ठिकाणी नमो मॅरेथॉनसह विविध उपक्रमांचं
आयोजन
****
येत्या १७ सप्टेंबरला हैदराबाद मुक्ती संग्रामदिनी बीड ते अहिल्यानगर
रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा बीड
जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीत
हा निर्णय घेण्यात आला. बीड ते परळी वैजनाथ या उर्वरित मार्गातील अडथळे दूर करून गतीने
काम पूर्ण करण्याच्या सूचनाही पवार यांनी या बैठकीत दिल्या. या मार्गाच्या भूसंपादनाची
प्रलंबित प्रकरणं जिल्हा प्रशासनाने तातडीने निकाली काढून आवश्यक जमीन उपलब्ध करून
द्यावी,
या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या वाट्याची रक्कम तातडीने
अदा करण्यात यावी, अर्थसंकल्पात मंजूर १५० कोटी रुपये देण्यात
यावे,
आदी सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी केल्या.
****
इतर मागास प्रवर्ग समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राज्य
मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली
आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, मंत्रिमंडळातले सदस्य गुलाबराव
पाटील यांनी दिली. महायुतीतील तिन्ही पक्षाचे प्रत्येकी दोन मंत्री आणि अधिकाऱ्यांचा
या समितीत समावेश असेल.
संजय
गांधी निराधार योजना तसंच श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार
रुपये वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात
आला, त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांना
दरमहा दीड हजारांऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार आहेत.
महानिर्मिती
कंपनीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापराबाबतचं धोरण निश्चित करणं, महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा, कारखाने अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा, अनुसूचित जमातीतील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती
योजनेऐवजी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करणं, मुंबई-ठाणे आणि पुणे मेट्रोच्या पुढच्या टप्प्यांना मान्यता, ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग उभारणं, “नवीन नागपूर” अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वित्तीय केंद्र विकसित करणं, नागपूर शहराभोवती बाह्य वळण रस्ता, आदी निर्णयही या बैठकीत घेण्यात आले.
****
लंडन इथे महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज
वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. या भागात
सुमारे एक लाख मराठी भाषिक असून त्यांच्या मुलांना, त्यांच्या
स्थानिक मित्रमंडळींना मराठी भाषेची गोडी लागावी, यासाठी
एक प्रशिक्षण केंद्र तिथं सुरू केलं जाणार असून त्यासाठीचा अभ्यासक्रम तयार होत आहे.
दरम्यान, लंडन इथल्या महाराष्ट्र मंडळाला
‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी मंजूर केलेला पाच कोटी रुपयांचा धनादेश मंडळाचे विश्वस्त
वैभव खांडगे यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आला.
****
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC च्या जमिनी वितरित करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने निर्मित
‘मिलाप’ या ॲपचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज करण्यात आलं. उद्योगमंत्री उदय सामंत
यांनी ही माहिती दिली. ज्यांना MIDC मध्ये जमीन हवी आहे, ते या app वरून घरबसल्या अर्ज करू शकतात आणि सर्व छाननी आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारण
आठवडाभराच्या कालावधीत त्या व्यक्तीला online जमीन
मिळाल्याचं प्रमाणपत्र मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.
****
हैदराबाद गॅझिटियर लागू करण्याचा निर्णय हा कायद्याच्या चौकटीत
घेतला असून कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुलभ होणार असल्याचं उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या निर्णयामुळे
ओबीसी प्रवर्गाचं नुकसान होणार नाही. जे ओबीसी नेते नाराज आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री
आणि आपण चर्चा करू, वस्तुस्थिती समजल्यानंतर त्यांची नाराजी
दूर होईल,
असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले –
बाईट - उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे
****
या निर्णयाचा ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धोका नाही, या निर्णयावर टीका करण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावं
असं,
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज
मुंबईत बोलत होते. न्यायमूर्ती शिंदे समिती आणि कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून या निर्णयाच्या
मसूद्याला अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मराठा समाजाला पूर्वी दिलेलं १६ टक्के
आरक्षण घालवण्याचं काम महाविकास आघाडीने केल्याचा आरोपही विखे पाटील यांनी यावेळी केला.
****
भारतात गुन्हे करुन फरार होण्याची परदेशी नागरिकांची कृती रोखण्यासाठी
उपयुक्त धोरण आखण्यासंदर्भात विचार करावा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला
केली आहे. या संदर्भातल्या एका प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ही सूचना
केली. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी या विशेष धोरणाची गरज असल्याचं न्यायालयाने
नमूद केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून
२ ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत युवकांमध्ये
क्रीडाप्रेम जागवण्यासाठी तसंच निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी देशभरातील ७५ ठिकाणी
नमो मॅरेथॉन आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ.
मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली.
या संदर्भात आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत डॉ.
मांडविया यांनी राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह इतर राज्यांच्या
क्रीडा मंत्र्यांशी संवाद साधला.
या पंधरवड्यात २१ सप्टेंबर रोजी ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉन तर, यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर
या कालावधीत एकतेचा संदेश देणाऱ्या पदयात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे. देशभरातील
१०० सामाजिक आणि अध्यात्मिक संस्थांच्या व्यसनमुक्त भारत तसंच संसद खेल महोत्सवाचं
आयोजनही करण्यात येणार असून, राज्यांनी यात सक्रिय सहभाग
नोंदवावा,
असं आवाहन केंद्रीय मंत्री डॉ. मांडविया यांनी केलं आहे.
****
इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई
फुले आधार योजना तसंच पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत २०२५-२६ या शैक्षणिक
वर्षासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी येत्या १८ सप्टेंबर, पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. लातूर प्रादेशिक विभागातील लातूर, धाराशिव,
नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांतील शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी
इच्छूक विद्यार्थ्यांनी एच एम ए एस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर अर्ज
करण्याचं आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केलं आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा विषय सोडवून
मराठा बांधवांना न्याय मिळवून दिल्याबद्दल, भारतीय
जनता पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने आज क्रांती चौक परिसरातल्या कार्यालयात
जल्लोष करण्यात आला. या वेळी आतिषबाजी तसंच घोषणाबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला.
****
अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी
भांब्री आणि न्यूझीलंडचा मायकल व्हीनस या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांनी जर्मनीच्या जोडीचा ६-४, ६-४
असा सरळ सेट्समध्ये पराभव केला. आता त्यांचा पुढचा सामना क्रोएशियाचा निकोला मेकटिच
आणि अमेरिकेचा राजीव राम या जोडीशी होणार आहे.
****
उत्तर रेल्वे विभागात मुसळधार पावसाने काही ठिकाणी रेल्वेमार्गाचं
नुकसान झालं आहे. या मार्गांच्या दुरुस्तीसाठी उत्तर रेल्वेकडून जम्मू विभागात लाईन
ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात नांदेड - जम्मू तावी - नांदेड हमसफर एक्सप्रेसच्या
चार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
****
नांदेड जिल्ह्याच्या बिलोली परिसरात अतिवृष्टी तसंच पुरामुळे
विविध भागातील रस्ते तसंच पुलांची अवस्था दयनीय झाली आहे. या भागातले रस्ते आणि पुलांची
पुर्नबांधणी तसंच दुरुस्तीच्या मागणीसाठी आमदार जितेश अंतापूरकर यांनी राज्याचे ग्रामविकास
मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन चर्चा केली.
****
विभागात पैठण इथल्या जायकवाडी धरणातून सध्या सुमारे साडे चौदा
हजार तर हिंगोली जिल्ह्यातल्या सिद्धेश्वर धरणातून साडे अकरा हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद
वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नांदेड जिल्ह्यात इसापूर धरणातूनही सुमारे साडे अकरा
हजार घनफुटापेक्षा अधिक तर परभणी जिल्ह्यातल्या येलदरी धरणातून सुमारे साडे अकरा हजार
दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
हवामान
कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही
भागात हवामान विभागाने आज यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव वगळता
सर्वच जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे. कोकण तसंच खानदेशातल्या काही जिल्ह्यांना उद्या
ऑरेंज अलर्ट तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या
काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment