Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 03 September 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ सप्टेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
भविष्यात भारताची मायक्रोचीप जगाला दिशा देईल-सेमिकॉन
इंडियाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन
·
मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीचा
शासननिर्णय जारी
·
नागपुरातल्या साडे पाच किलोमीटर लांबीच्या दुमजली उड्डाणपुलाची
गिनीज रेकॉर्ड्समध्ये नोंद
·
कवी बी. रघुनाथ स्मृतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर तसंच
परभणी इथं महोत्सवाचं आयोजन
आणि
·
राज्याच्या बहुतांश भागाला पावसाचा यलो अलर्ट
****
सेमीकंडक्टरमध्ये
जगाचा विकास करण्याची शक्ती असून, भविष्यात भारताची मायक्रो चीप जगाला दिशा
देईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या
यशोभूमी इथं काल सेमिकॉन इंडिया २०२५चं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं,
त्यावेळी ते बोलत होते. जागतिक चिप बाजारपेठेत भारताच्या वाढत्या प्रभावाकडे
त्यांनी लक्ष वेधलं. २१ व्या शतकात, या लहान चिप्समध्ये मोठी
शक्ती असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
बाईट- पंतप्रधान नरेंद्र मोदी
केंद्रीय
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी उपस्थित होते.
देशात पाच सेमिकंडक्टर युनिट्सची उभारणी प्रगतीपथावर असून, काही महिन्यांत
आणखी दोन युनिट्द्वारे उत्पादन सुरू होईलं असं वैष्णव यांनी सांगितलं.
****
वस्तू आणि
सेवा कर-जीएसटी परिषदेची ५६ वी बैठक आज नवी दिल्लीत सुरु होत आहे. या दोन दिवसीय बैठकीत
वस्तू आणि सेवा कर सुधाराबाबत विचार विनिमय होण्याची शक्यता असून, करांचे दर
तर्कसंगत तसंच सुलभ करण्यावरही या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरच्या भाषणातून केलेल्या सूतोवाचानुसार दिवाळीच्या
दरम्यान या सुधारणा लागू होण्याची शक्यता आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भात
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यासंदर्भातला शासन निर्णय राज्य शासनाने काल जारी
केला. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मसुद्याचं प्रारूप, आंदोलनकर्ते
मनोज जरांगे पाटील यांना दाखवून चर्चा केली. सातारा तसंच औंध गॅझेटियरबाबत कायदेशीर
प्रक्रिया तपासून निर्णय घेण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं. त्यानंतर जरांगे यांनी
उपोषण सोडून आपलं आंदोलन मागे घेतलं.
या चर्चेतून
मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी व्यक्त केली. ते म्हणाले....
बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संबंधित शासन निर्णयानुसार मराठा समाजातल्या पात्र
व्यक्तींना कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी चौकशी
करून, सक्षम प्राधिकाऱ्यास सहाय्य करण्यासाठी गावपातळीवर समिती
स्थापन केली जाणार आहे. या समितीत ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत
अधिकारी तसंच सहायक कृषी अधिकारी, यांचा समावेश असेल.
****
मराठा आंदोलकांवर
दाखल खटले मागे घेण्याबाबत महिनाअखेर पर्यंत निर्णय घेणं, या आंदोलनादरम्यान
मरण पावलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना आठवडाभरात आर्थिक मदत तसंच वारसांना सरकारी
महामंडळात नोकरी देणं, आतापर्यंत शोधलेल्या नोंदी ग्रामपंचायतीच्या
फलकावर प्रसिद्ध करणं, जातप्रमाणपत्र तसंच पडताळणीची कार्यवाही
विहीत मुदतीत पूर्ण करणं, आदी संदर्भातला शासन निर्णयही काल जारी
करण्यात आला.
दरम्यान, या आंदोलनाला
यश मिळाल्यानंतर सर्वत्र मराठा समाज बांधवांच्या वतीने आनंद साजरा करण्यात आला. छत्रपती
संभाजीनगर आणि लातूरसह मराठवाड्यात सर्वत्र गुलाल उधळून, फटाके
फोडून, मिठाई वाटत आनंद व्यक्त करण्यात आला.
****
मुंबईच्या
आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना सरकारनं बळाचा वापर करून हटवायला
हवं होतं, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या आंदोलनामुळे नागरिकांची
गैरसोय होत असल्याच्या याचिकेवर काल झालेल्या सुनावणीत, सरकार
न्यायालयाच्या आदेशांचं पालन का करू शकत नाही, असा प्रश्न न्यायालयानं
विचारला. पाच हजार आंदोलकांना परवानगी दिलेली असतांना, ही संख्या
एक लाखापेक्षा जास्त झाल्याचं न्यायालयाच्या निदर्शनाला का आणून दिलं नाही,
असंही न्यायालयानं विचारलं आहे.
****
नागपुरात
कामठी महामार्गावर उभारलेल्या साडे पाच किलोमीटरहून अधिक लांबीच्या सर्वात मोठ्या दुमजली
उड्डाणपुलाची, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या उपस्थितीत काल महामेट्रोला यासाठीचं प्रमाणपत्र गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून
प्रदान करण्यात आलं. सिंगल कॉलम पिअरवर उभारलेल्या या चार पदरी उड्डाणपुलाच्या हा पहिल्या
मजल्यावरून महामार्ग तर दुसऱ्या स्तरावर मेट्रो वाहतुकीची व्यवस्था आहे.
****
चालू आर्थिक
वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन - जीडीपीमध्ये मोठी वाढ दिसून आली.
या वाढीमुळे विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढून सर्वसामान्य नागरिकांना लाभ होण्याची
शक्यता छत्रपती संभाजीनगर इथले सनदी लेखापाल उमेश शर्मा यांनी व्यक्त केली आहे. ते
म्हणाले..
बाईट- सनदी लेखापाल उमेश शर्मा
उमेश शर्मा यांनी यासंदर्भात केलेलं
सविस्तर विश्लेषण आमच्या प्रासंगिक या सदरात ऐकता येईल. हा कार्यक्रम आज सकाळी दहा
वाजून ४५ मिनिटांनी आमच्या केंद्रावरून प्रसारित केला जाईल.
****
सातासमुद्रापार
राहणाऱ्या मराठी घरांमध्ये गणपती तसंच ज्येष्ठा गौरी उत्सवासाठी धाराशिव जिल्ह्याच्या
तुळजापूर तालुक्यात काटी इथं तयार झालेल्या मूर्ती तसंच मुखवट्यांची स्थापना करण्यात
आली. काटी इथल्या कुंभार बंधूंनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून
साधलेल्या यशाबद्दल श्रीकांत कुंभार यांनी माहिती दिली...
बाईट- श्रीकांत कुंभार
दरम्यान, ज्येष्ठा कनिष्ठा गौरींना काल निरोप देण्यात
आला. काल सायंकाळनंतर सुवासिनींना सौभाग्यदानं देऊन या तीन दिवसीय उत्सवाची सांगता
झाली.
****
नांदेड
शहर आणि जिल्ह्यात डीजे मुक्त पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असं आवाहन
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या
२५० सार्वजनिक गणेश मंडळांनी डीजे वाजवणार नसल्याचं हमीपत्र शासनाला दिलं आहे. या सर्व
गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांचा काल जिल्हाधिकारी कर्डिले आणि पोलीस अधीक्षक कुमार यांच्या
हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
****
बालरंगभूमी
परिषदेच्या बीड शाखेच्या वतीने गणेशोत्सवाचं औचित्य साधून अथर्वशीर्ष पठण हा उपक्रम
उद्या राबवला जाणार आहे. के एस के महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार
आहे.
****
कवी बी. रघुनाथ यांच्या स्मृती
दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर आणि परभणी इथं स्मृती सोहळा आणि महोत्सवाचं आयोजन करण्यात
आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं येत्या सात तारखेला होणाऱ्या या महोत्सवात, प्रसाद कुमठेकर
यांच्या 'इतर गोष्टी' या कथासंग्रहाला 'बी. रघुनाथ पुरस्कार' प्रदान करण्यात येईल. परभणी इथं
१४ ते १७ सप्टेंबर दरम्यान हा महोत्सव होणार आहे.
****
परभणी इथं
जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तसंच गंगाखेडच्या
श्री संत जनाबाई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या
संयुक्त विद्यमाने "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा" घेण्यात आला.
विविध क्षेत्रातल्या ३०० रिक्त पदांसाठी ३५१ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या,
त्यापैकी ८७ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
****
लातूर इथल्या
चैतन्य पूर्व प्राथमिक शाळेला शिक्षण विभागानं काल सील ठोकलं. मान्यता नसताना सुरू
असलेल्या या शाळेत पालकांची दिशाभूल करून अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशही देण्यात आला
होता. यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर ही कारवाई केल्याचं शिक्षणाधिकारी दीपक मठपती यांनी
सांगितलं.
****
हवामान
कोकण, मराठवाडा
आणि विदर्भाच्या काही भागात हवामान विभागाने आज यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात लातूर
आणि धाराशिव वगळता इतर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. कोकण, खान्देश
तसंच विदर्भातल्या काही जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment