Wednesday, 3 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र


 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 03 September 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ सप्टेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

नवी दिल्लीत सुरु असलेल्या सेमिकॉन इंडिया परिषदेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होणार आहेत. यासह या परिषदेत आज चार सत्र होणार आहेत.

****

गृह मंत्रालयाने इमिग्रेशन अँड फॉरेनर्स एक्सेम्प्शन आदेश, २०२५ अधिसूचित केला आहे. यानुसार नेपाळ आणि भूतानच्या नागरिकांना जमीन किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करण्यासाठी पूर्वीप्रमाणे पारपत्र किंवा व्हिसा देण्याची आवश्यकता राहणार नाही. धार्मिक छळामुळे किंवा छळाच्या भीतीमुळे भारतात आश्रय घेणाऱ्यांना वैध पारपत्र आणि व्हिसा नियमांतून सूट देण्यात येणार असून, ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत भारतात आलेल्यांसाठी ही सवलत लागू असेल.

****

जीएसटी, अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेची ५६वी बैठक आज नवी दिल्लीत सुरु होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. करांचं सुसूत्रीकरण आणि कर विवरणपत्र भरण्याच्या प्रक्रियेचं सुलभीकरण, यासह नव्या जीएसटी सुधारणांबाबत या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.

****

छत्तीसगढमध्ये, सुरक्षा दलांनी गेल्या २४ तासात बिजापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून १६ नक्षलवाद्यांना अटक केली. जिल्हा राखील रक्षक आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांनी जिल्ह्यात नक्षलवादविरोधी मोहिम राबवली होती. अटक केलेल्या नक्षलवाद्यांकडून स्फोटकं आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं.

****

कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत सुलभ खरेदीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या कपास किसान अॅप्लिकेशनची, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी काल सुरुवात केली. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून नोंदणी, स्लॉटचं आरक्षण तसंच व्यवहारांची नोंद आणि पाठपुरावा करणं शेतकऱ्यांसाठी सोपं होणार आहे. या अॅपमुळे खरेदी केंद्रांवरचा वेळ, कागदपत्रं तसंच अवैध विक्री यांपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना संरक्षण मिळेल, असं सिंह यांनी सांगितलं. 

****

राज्य सरकारनं एसटी, अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातल्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर त्वरित वापर करायला मान्यता दिली आहे. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य साधण्यात मदत होईल, असं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. सरकारच्या सुधारित धोरणानुसार, एसटीच्या अतिरिक्त जमिनींचा विकास सार्वजनिक-खाजगी सहभाग पद्धतीनं केला जाणार आहे.

****

सात दिवसांच्या गणपतींबरोबर काल राज्यभरात गौरींनाही निरोप देण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह सर्वत्र गौरीपूजनाचा पारंपरिक उत्साह दिसून आला. पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेश विसर्जन करण्याबाबतही जागरुकता वाढत असल्याचं दिसून येत आहे. दहा दिवसांच्या गणपती विसर्जनाला तीन दिवस शिल्लक असल्यानं विविध देखावे पाहण्यासाठी ठिकठिकाणी नागरीक गर्दी करत आहेत. 

 

दरम्यान, गणपती मूर्ती विसर्जन करण्याऐवजी त्या संकलित करण्याचा उपक्रम अनेक जिल्हा प्रशासनांकडून राबवण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका आणि स्वराज्य महाराष्ट्र या संस्थेच्या वतीनं मूर्तीदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. या अंतर्गत चिंचवडगाव परिसरात कालपर्यंत एक हजार १७६ गणेश मूर्तींचं दान तर चार टन निर्माल्य स्वीकारण्यात आलं. आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पथकं तयार करण्यात आली असून, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दान करण्याविषयी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

 

कोल्हापूर जिल्ह्यात साडे चार लाखपेक्षा अधिक मूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जित करण्यात आल्या. गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरात सुरू असलेल्या मूर्तीदान उपक्रमाला यावर्षीही नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. निर्माल्य आणि मूर्ती दान करून पर्यावरणपूरक विसर्जन चळवळ वृध्दींगत केली.

 

पुण्यात कस्तुरे चौक गणेशोत्सव मंडळानं गणपती बघायला येणाऱ्या भाविकांना प्रसादासोबत देशी झाडांचे एक हजारपेक्षा जास्त बीज गोळे दिले. यासोबतच देशी झाडांच्या बिया देखील वाटण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी देशी झाडांचं रोपण आणि संवर्धनाचा संकल्प करत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही त्याचं महत्त्व पटवून दिलं.

नांदेडमध्ये २५० गणेश मंडळांनी डीजे न वाजवण्याचं हमीपत्र दिलं असून, प्रशासनातर्फे या मंडळांचा गौरव करण्यात आला.

****

राज्य उत्सवांतर्गत आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा या वर्षापासून तालुकास्तरापर्यंत विस्तार करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा जिल्हा तसंच राज्यस्तरांसोबतच तालुकास्तरीय पारितोषिकंही देण्यात येणार आहेत. राज्यभरातल्या ४०४ मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला असून, या सर्वांच्या सादरीकरणाचं परीक्षण सुरू आहे.

****

मुंबईतून कोकणात अवघ्या काही तासांत नेणाऱ्या बहुप्रतीक्षित रो-रो सेवेची चाचणी काल मुंबई ते जयगड आणि विजयदुर्ग या सागरी मार्गावर घेण्यात आली. कोकणातून प्रवासी बोट सेवा बंद झाल्यांनतर ३५ वर्षानी अशी चाचणी होत असल्यानं काही ज्येष्ठ नागरिकांनी त्यावेळच्या बोटसेवेच्या आठवणी जागवल्या.

****

No comments: