Thursday, 4 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 04 September 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

वस्तु आणि सेवा कर - जीएसटी परिषदेनं कर प्रणालीत केलेल्या सुधारणांचं समाजातल्या सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

अखिल भारतीय व्यापारी महासंघाने जीएसटी सुधारणा आणि कर दरांच्या पुनर्रचनेला ऐतिहासिक आणि क्रांतिकारी म्हटलं आहे. या सुधारणांमुळे केवळ लहान व्यापारी, ग्राहक आणि भारताच्या अर्थव्यवस्थेलाच फायदा होणार नाही तर कर रचना सुलभ होईल आणि वापर वाढेल, असं महासंघाचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी नमूद केलं. ४०० हून अधिक वस्तूंवरचा कर कमी करणाऱ्या या सुधारणांमुळे सामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन खर्चात मोठा दिलासा मिळेल, विमा सेवांना जीएसटीमधून सूट देऊन सरकारने मध्यमवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

जीएसटी दर कपात हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय, शेतकरी, सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग, महिला आणि तरुणांना मोठा दिलासा मिळेल, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

 

जीएसटी सुधारणांमुळे आरोग्यसेवेचा खर्च कमी होईल आणि लोकांचं जीवनमान सुधारेल, असं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी म्हटलं आहे. कर्करोग आणि दुर्मिळ आजारांवरील उपचारांसह ३६ जीवनरक्षक औषधांवरच्या जीएसटीत सूट देण्यात आली असून, आरोग्य आणि जीवन विमा जीएसटीमधून वगळण्यात आला आहे. हा निर्णय सर्वांसाठी परवडणाऱ्या आरोग्यसेवेच्या दिशेनं एक मोठं पाऊल असल्याचं नड्डा यांनी नमूद केलं.

 

ही केवळ कर आकारणीत सुधारणा नाही तर ती सहजतेने राहणीमानात सुधारणा असल्याचं सांगून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

****

देशात लवकरच कोळशाच्या व्यवहारासाठी शेअर बाजार प्रमाणे स्वतंत्र मंच सुरू होणार असून, संसदेची याला मान्यता मिळाली असल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली. मुंबईत आयोजित स्टार रेटिंग पुरस्कार सोहळ्यात ते आज बोलत होते. या मंचाच्या माध्यमातून देशातल्या खरेदीदारांच्या गरजा पूर्ण केल्या जातील असं ते म्हणाले. गेल्या काही वर्षात कोळसा क्षेत्रात सातत्याने सुधारणा होत आहेत, त्यामुळे कोळसा उत्खननातला खासगी क्षेत्राचा वाटा ५० टक्क्यांपर्यंत वाढावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी कोळसा आणि खाणकाम क्षेत्रातल्या विविध कंपन्यांना आणि संस्थांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कोळसा नियंत्रकांच्या नव्या संकेतस्थळाचं अनावरण रेड्डी यांनी केलं.

****

प्रादेशिक समतोल साधण्यासाठी आणि उद्योगनिर्मितीच्या दिशेनं महाराष्ट्र सरकारनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस प्रायवेट लिमिटेड सोबत राज्य सरकारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चार करार केले असून, याअंतर्गत पुणे, पालघर, रत्नागिरी आणि जळगाव इथं नवे उद्योग स्थापन होणार आहेत. या निर्णयामुळे रोजगार निर्मिती, गुंतवणूक वाढ आणि प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

****

नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर स्थित बाजारगाव कोंढाळी इथल्या सोलार एक्सप्लोजिव या शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये कार्यरत असणाऱ्या कंपनीत मध्यरात्री स्फोट झाला. यामध्ये १६ कामगार जखमी झाले. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार घटनास्थळी पोहोचले असून, कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. जखमींना उपचारासाठी नागपूर इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

****

 

 

नांदेड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर ३१ जण जखमी झाले.

भोकर तालुक्यात पाळज इथल्या प्रसिद्ध गणपतीचे दर्शन घेऊन परत जाणाऱ्या एका कारने नांदा इथं उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. यात तीन जण जागीच ठार झाले. हे सर्व भाविक तेलंगणा राज्यातले होते.

दुसऱ्या एका अपघातात देगलूर तालुक्यात वजूर इथून देगलूरला निघालेली राज्य परिवहन महामंडळाची बस नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटली. यात बसमधले ३२ प्रवासी जखमी झाले. त्यात गंभीर जखमी असलेल्या चार प्रवाशांना नांदेडमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

****

गणेशोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दहा दिवसांच्या या चैतन्य पर्वाची अनंत चतुर्दशीला, शनिवारी सांगता होणार आहे. यासाठी ठिकठीकाणच्या पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं तयारी केली आहे. मूर्ती विसर्जनाऐवजी त्या संकलित करण्याचं आवाहन करण्यात आलं असून, ठिकठिकाणी त्यासाठी संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत. 

****

बीड जिल्ह्यात माजलगाव शहरात तहसील कार्यालयाबाहेर आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी समाज बांधवांनी आज आंदोलन केलं. यावेळी हैद्राबाद गॅझेटियर शासन परिपत्रकाची  होळी करण्यात आली.

****

ईद-ए- मिलादनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातला बाह्यरुग्ण विभाग उद्या बंद राहणार आहे. परवा शनिवार पासून बाह्यरुग्ण विभाग नियमित वेळेप्रमाणे सुरु राहील,असा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन जाधव यांनी कळवलं आहे.

****

No comments: