Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date – 04 September
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ सप्टेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
· जीएसटीचे
१२ आणि २८ टक्क्यांचे स्लॅब रद्द-अनेक वस्तू आणि सेवांवरील करात मोठी कपात;जीवन विमा
आणि आरोग्य विम्यासह जीवनरक्षक औषधांना जीएसटीतून सूट
· ओबीसी प्रश्नांच्या
सोडवणुकीसाठी उपसमिती नेमण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
· संजय गांधी
निराधार तसंच श्रावणबाळ दिव्यांग योजनेच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपये वाढ
· येत्या
१७ सप्टेंबरला हैदराबाद मुक्ती संग्रामदिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वेगाडीचा शुभारंभ
· काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून देशात मध्यावधी निवडणुकांची शक्यता व्यक्त
आणि
· १७ सप्टेंबरपासून
देशभरात सेवा पंधरवडा-७५ ठिकाणी नमो मॅरेथॉनसह विविध उपक्रमांचं आयोजन
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटीचे
१२ आणि २८ टक्क्यांचे स्लॅब रद्द करण्यात आले असून, आता फक्त पाच टक्के आणि १८
टक्के असे दोनच स्लॅब असणार आहेत. काल नवी दिल्लीत जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर केंद्रीय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. सामान्य माणूस आणि मध्यमवर्गीय
समाज वापरत असलेल्या वस्तूंवरील जीएसटी १८ आणि १२ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत
कमी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. वैयक्तिक जीवन विमा पॉलिसी आणि वैयक्तिक आरोग्य
विमा पॉलिसीला जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे.
कर्करोगासह ३३ जीवनरक्षक औषधं तसंच दुर्मिळ
आजार आणि गंभीर आजारांवरच्या औषधांवरचा जीएसटी रद्द करण्यात आला असून, विविध वैद्यकीय
उपकरणांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. ही नवीन
कर प्रणाली २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
****
दरम्यान, जीएसटीमधल्या
या सुधारणांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं. नागरीकांचं जीवन
अधिक सुलभ व्हावं या उद्देशानं जीएसटी दराच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यात आल्याचं
त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
इतर मागास प्रवर्गाच्या प्रश्नांच्या
सोडवणुकीसाठी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय
घेण्यात आला. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालच्या या उपसमितीत छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव
पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तात्रय भरणे यांचा सदस्य
म्हणून समावेश आहे. मंत्रिमंडळाने काल घेतलेल्या इतर निर्णयांबाबतचा हा वृत्तांत...
संजय गांधी निराधार योजना तसंच श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या
अर्थसहाय्यात एक हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत झाला, त्यामुळे
या योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा दीड हजारांऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार आहेत.
महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील
राखेच्या वापराबाबतचं धोरण निश्चित करणं, महाराष्ट्र
दुकाने आणि आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा, कारखाने
अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा, अनुसूचित जमातीतील नववी, दहावीच्या
विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र
सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करणं, मुंबई-ठाणे आणि
पुणे मेट्रोच्या पुढच्या टप्प्यांना मान्यता, ठाणे ते
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग उभारणं,
"नवीन नागपूर" अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार
आणि वित्तीय केंद्र विकसित करणं, नागपूर शहराभोवती बाह्य वळण
रस्ता, आदी निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
****
नमो शेतकरी महासन्मान निधी
योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातवा हप्ता वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे
काल शासन निर्णय काढण्यात आला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. या
निर्णयाचा ९२ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार असून, त्यासाठी एक हजार ९३२ कोटी
७२ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
****
महाराष्ट्र औद्योगिक विकास
महामंडळ - एमआयडीसी च्या जमिनी वितरित करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या
उद्देशाने निर्मित 'मिलाप' या ॲपचं काल अनावरण करण्यात आलं. ज्यांना MIDC त जमीन
हवी आहे, ते या ॲपवरून घरबसल्या अर्ज करू शकतात आणि सर्व छाननी आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर
साधारण आठवडाभराच्या कालावधीत भूखंड मंजूर झाल्याचं ऑनलाईन प्रमाणपत्र मिळणार आहे.
****
येत्या १७ सप्टेंबरला हैदराबाद
मुक्ती संग्रामदिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात
येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली
काल मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बीड ते परळी वैजनाथ या उर्वरित
मार्गातील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचनाही पवार यांनी दिल्या. या
मार्गाच्या भूसंपादनाची प्रलंबित प्रकरणं जिल्हा प्रशासनाने तातडीने निकाली काढून आवश्यक
जमीन उपलब्ध करून द्यावी, या रेल्वे मार्गासाठी राज्य शासनाच्या वाट्याची रक्कम
तातडीने अदा करण्यात यावी, अर्थसंकल्पात मंजूर १५० कोटी रुपये देण्यात यावे, आदी सूचनाही
पवार यांनी केल्या.
****
देशात मध्यावधी निवडणुका होण्याची
शक्यता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वर्तवली आहे.
काँग्रेसच्या वतीनं कथित वोट चोरीविरोधात देशभर मेळाव्यांचं आयोजन केलं जात आहे, त्याअंतर्गत
पहिला राज्यव्यापी मेळावा काल नागपूर जिल्ह्यात कामठी इथं घेण्यात आला, त्यावेळी
सपकाळ बोलत होते. विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी
उपस्थित होते. केंद्र तसंच राज्य सरकारसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही यावेळी टीका
करण्यात आली.
****
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान
मुंबईत सार्वजनिक संपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या आरोपांबाबत मनोज जरांगे
पाटील आणि आंदोलनाच्या आयोजकांनी प्रतिज्ञापत्र सादर करावं, असे निर्देश
मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रशेखर
आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या पीठानं या नुकसानाबद्दल जरांगे आणि महाराष्ट्र सरकारला
प्रश्न विचारले. या नुकसानाला जरांगे जबाबदार नाहीत, आंदोलकांनी स्वतः हे कृत्य
केलं, अशा आशयाचं शपथपत्र सादर करावं, असे निर्देश न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी दिले.
****
हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा
निर्णय हा कायद्याच्या चौकटीत घेतला असून, त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र
मिळण्याची प्रक्रिया सुलभ होणार असल्याचं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या निर्णयामुळे ओबीसी प्रवर्गाचं
नुकसान होणार नाही, जे ओबीसी नेते नाराज आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री आणि
आपण चर्चा करू, वस्तुस्थिती समजल्यानंतर त्यांची नाराजी दूर होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त
केला. ते म्हणाले...
बाईट- उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे
या निर्णयामुळे ओबीसींचं नुकसान
होण्याची शक्यता असल्यास, उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा अन्न पुरवठा मंत्री
छगन भुजबळ यांनी दिला आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवडा देशभरात साजरा करण्यात
येणार आहे. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ही माहिती
दिली. या पंधरवड्यात २१ सप्टेंबर रोजी ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉन तर, त्यानंतर सरदार
वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत
एकतेचा संदेश देणाऱ्या पदयात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे. देशभरातल्या १०० सामाजिक
आणि अध्यात्मिक संस्थांच्या व्यसनमुक्त भारत तसंच संसद खेल महोत्सवाचं आयोजनही करण्यात
येणार आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व
अभियानांतर्गत “सेवा पंधरवाडा” प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र
पापळकर यांनी दिले आहेत. काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. विभागातले सर्व जिल्हाधिकारी
या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. हे अभियान तीन टप्प्यात राबवलं
जाणार असून, त्याबाबत सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.
****
विकास योजनांची आखणी आणि प्रत्यक्ष
अंमलबजावणी करताना स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींचा सहभाग राहिल्यास योजनांचा लाभ
खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचू शकेल, असं धाराशिवचे खासदार ओमप्रकाश
राजेनिंबाळकर यांनी म्हटलं आहे. ते काल धाराशिव इथं दिशा समितीच्या आढावा बैठकीत बोलत
होते. विकास कामांची आखणी करतांना, सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याची सूचना निंबाळकर
यांनी केल्याचं, आमच्या वार्ताहराने कळवलं आहे.
****
नांदेड महापालिकेच्या आगामी
सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना घोषित करण्यात आली आहे. एकूण २० प्रभागात
८१ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. १५ सप्टेंबरपर्यंत या प्रभाग रचनेवर आक्षेप स्वीकारण्यात
येणार आहेत.
****
आशिया चषक हॉकी स्पर्धेत काल
बिहारमधल्या राजगिर इथं झालेला भारत आणि कोरियामधला सामना दोन - दोन असा बरोबरीत सुटला.
सुरवातीला भारताने एक गोल करुन आघाडी मिळवली होती, मात्र कोरियाने पेनल्टी शुटआऊटमध्ये
दोन गोल केले. सामन्याच्या शेवटच्या काही मिनिटात मनदीप सिंगने गोल करुन ही बरोबरी
साधली. आज भारताचा सामना मलेशियासोबत होणार आहे.
****
मराठवाड्यातल्या धरणातून
पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पैठण इथल्या जायकवाडी धरणातून सध्या सुमारे साडे चौदा
हजार, हिंगोली
जिल्ह्यातल्या सिद्धेश्वर धरणातून सुमारे आठ हजार, नांदेड जिल्ह्यातल्या इसापूर धरणातून सुमारे साडे
अकरा हजार तर परभणी जिल्ह्यातल्या येलदरी धरणातून सुमारे सात हजार दशलक्ष घनफूट
प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
हवामान
कोकण तसंच खान्देशातल्या काही
जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला
पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांनाही
आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment