Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 04 September
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०४ सप्टेंबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं सिंगापूरचे
पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांची भेट घेऊन, दोन्ही देशांमधल्या भक्कम आणि बहुउद्देशीय सहकार्याचा आढावा
घेतील. दोन्ही पंतप्रधान परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवरही
चर्चा करतील. पंतप्रधान वोंग यांचा हा दौरा भारत - सिंगापूर राजकीय संबंधांच्या साठाव्या
वर्धापन दिनानिमित्त आहे. आणि ही भागीदारी आणखी भक्कम करण्यासाठी दोन्ही देशांच्या
निरंतर वचनबद्धतेची पुष्टी करणारा आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
अंगणवाडी केंद्र शाळांच्या ठिकाणी असावी याविषयी काही
मार्गदर्शक तत्वे दिल्लीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय महिला
आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी काल जारी केली. यामुळे आई मुलाची संपूर्ण
काळजी सुनिश्चित होईल, शिवाय राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने शिक्षणाचा पाया भक्कम होईल, असं प्रधान यांनी नमूद केलं. मुलांच्या
आयुष्यात अंगणवाडी कर्मचारी पहिल्या शिक्षकाची महत्वाची भुमिका निभावत असल्याचं सांगून, भारतीय भाषा शिकवण्यासाठी कृत्रिम
बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला.
****
छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात काल २० नक्षलवाद्यांनी
शरणागती पत्करली. त्यांच्यावर एकूण ३३ लाख रूपयांचं बक्षिस होतं. या नक्षलवाद्यांमध्ये
नऊ महिलांचा समावेश आहे.
****
भारतात गुन्हे करुन फरार होण्याची परदेशी नागरिकांची
कृती रोखण्यासाठी उपयुक्त धोरण आखण्यासंदर्भात विचार करावा अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने
केंद्र सरकारला केली आहे. या संदर्भातल्या एका प्रकरणी काल झालेल्या सुनावणीत न्यायालयाने
ही सूचना केली. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी या विशेष धोरणाची गरज असल्याचं न्यायालयाने
नमूद केलं.
****
लंडन इथं महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीत छत्रपती शिवाजी
महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत
घेण्यात आला. या भागात सुमारे एक लाख मराठी भाषिक असून, त्यांच्या मुलांना, त्यांच्या स्थानिक मित्रमंडळींना मराठी भाषेची गोडी लागावी, यासाठी एक प्रशिक्षण केंद्र तिथं
सुरू केलं जाणार आहे.
दरम्यान, लंडन इथल्या महाराष्ट्र मंडळाला ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी
मंजूर केलेला पाच कोटी रुपयांचा धनादेश मंडळाचे विश्वस्त वैभव खांडगे यांच्याकडे काल
सुपूर्द करण्यात आला.
****
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धोका नाही, या निर्णयावर टीका करण्यापेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी
आत्मपरीक्षण करावं असं, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते.
न्यायमूर्ती शिंदे समिती आणि कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून या निर्णयाच्या मसूद्याला
अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर स्थित बाजारगाव
कोंढाळी इथल्या सोलार एक्सप्लोजिव या शस्त्रास्त्र निर्मितीमध्ये कार्यरत असणाऱ्या
कंपनीत मध्यरात्री स्फोट झाला. यामध्ये १६ कामगार जखमी झाले. नागपूर ग्रामीणचे पोलीस
अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार घटनास्थळी पोहोचले असून, कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. जखमींना
नागपूर इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा
मृत्यू झाला, तर ३१ जण जखमी झाले.
भोकर तालुक्यात पाळज इथल्या प्रसिद्ध गणपतीचे दर्शन
घेऊन परत जाणाऱ्या एका कारने नांदा इथं उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. यात तीन जण
जागीच ठार झाले. हे सर्व भाविक तेलंगणा राज्यातले होते.
दुसऱ्या एका अपघातात देगलूर तालुक्यात वजूर इथून देगलूरला
निघालेली राज्य परिवहन महामंडळाची बस नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला खड्ड्यात
उलटली. यात बसमधले ३२ प्रवासी जखमी झाले. त्यात गंभीर जखमी असलेल्या चार प्रवाशांना
नांदेडमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.
****
जालना शहरात स्वच्छतेबाबत उपद्रव करणार्यांविरुद्ध दंडात्मक
कारवाई करण्यात येते. त्यानुसार काल देऊळगावराजा रोड इथल्या एका दुकानदाराला पाच हजार
रुपयांचा दंड आकारण्यात आला. नागरीकांनी कचऱ्याचं योग्य ते नियोजन करावं आणि कचरा घंटागाडीतच
टाकावा असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे.
****
गणेशोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभरात उत्साहाचं
वातावरण पाहायला मिळत आहे. दहा दिवसांच्या या चैतन्य पर्वाची अनंत चतुर्दशीला, शनिवारी सांगता होणार आहे. यासाठी
ठिकठीकाणच्या पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं तयारी केली आहे. मूर्ती विसर्जनाऐवजी त्या
संकलित करण्याचं आवाहन करण्यात आलं असून, ठिकठिकाणी त्यासाठी संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत.
****
मराठवाड्यातल्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पैठण इथल्या जायकवाडी धरणातून सध्या सुमारे साडे चौदा हजार, हिंगोली जिल्ह्यातल्या सिद्धेश्वर
धरणातून सुमारे आठ हजार, नांदेड जिल्ह्यातल्या इसापूर धरणातून सुमारे साडे अकरा हजार तर परभणी जिल्ह्यातल्या
येलदरी धरणातून सुमारे सात हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु
आहे.
****
No comments:
Post a Comment