Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 05
September 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ सप्टेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा
जन्मदिवस आज राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आहे. यानिमत्त राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केले. देशभरातल्या ६६ शिक्षकांना
यावेळी गौरवण्यात आलं. यामध्ये राज्यातले नांदेडचे डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदोद्दीन, लातूरचे डॉ.
संदीपान जगदाळे आणि मुंबईतल्या सोनिया कपूर यांचा समावेश आहे.
दरम्यान, राष्ट्रपती
मुर्मू यांनी देशभरातल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. विकसित भारताचं ध्येय साध्य
करण्यासाठी जबाबदार, हुशार, आणि कुशल नागरिक तयार करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकला. शिक्षण हे फक्त नोकरी
नसून जीवनपद्धती आहे, शिक्षकांमध्ये राष्ट्र घडवण्याची आणि जीवन परिवर्तन करण्याची
ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलं.
शिक्षकांचं समर्पण आणि कठोर
मेहनतीमुळे उत्कृष्टतेला, तसंच देशाच्या विकासाला चालना मिळत असल्याचं केंद्रीय
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.
****
मुस्लीम धर्मियांचे प्रेषीत
हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलादुन्नबी आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांनी ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोहम्मद पैगंबर यांनी एकता
आणि मानवतेचा संदेश दिला; त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन प्रत्येकानं समाजात
प्रेम आणि बंधुतेची भावना जोपासण्यासाठी प्रयत्न करावेत, असं राष्ट्रपतींनी म्हटलं
आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
खुलताबाद इथं पैगंबर यांचा पवित्र पोशाख तसंच पवित्र केसाचं आज भाविकांना दर्शन घेता
येतं. यासाठी भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल होत आहेत. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर
या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
****
गणेशोत्सवाच्या निमित्तानं
संपूर्ण राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दहा दिवसांच्या या चैतन्य पर्वाची
उद्या शनिवारी अनंत चतुर्दशीला, सांगता होणार आहे. मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन ऐवजी
त्या संकलित करण्याचं आवाहन करण्यात आलं असून, ठिकठिकाणी त्यासाठी संकलन
केंद्र उभारण्यात येणार आहेत. विसर्जन सोहळ्याची प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या
पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर इथं वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. शहरातले
मुख्य रस्ते उद्या सकाळपासून ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी
बंद राहतील. शहरात गणेश विसर्जनाकरता उद्या तीन हजार पोलिस तैनात केली असल्याची माहिती
वाहतूक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी दिली. विसर्जनासाठी शहरात १४ ठिकाणी व्यवस्था
करण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिस आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन प्रशासनानं
केलं आहे.
लातूर शहरातलेही मुख्य रस्ते
उद्या वाहतुकीसाठी बंद असतील. नागरिकांनी या काळात पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असं आवाहन
शहर पोलिस प्रशासनानं केलं आहे. लातूर महानगरपालिकेनं १५ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र
उभारले असून, यासाठी ४३० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेश
मंडळांना मोठ्या मूर्तींचं विसर्जन १२ नंबर पाटी जवळील खदानीत करता येणार आहे.
नांदेड जिल्ह्यात गणेश विसर्जन
व्यवस्थेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी
पोलिस प्रशासनानेही चोख बंदोबस्त लावला आहे.
****
बीड जिल्ह्यात सण-उत्सव शांततेत, सौहार्दपूर्ण
वातावरणात साजरे करण्याचं आवाहन पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी केलं आहे. उत्सवासाठी
कोणीही नागरिक किंवा व्यापाऱ्याकडून वर्गणीची सक्ती झाल्यास संबंधित व्यक्ती, मंडळ किंवा
समितीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
****
जीएसटी कर कपातीमुळे शेतकऱ्यांच्या
आर्थिक प्रगतीला चालना मिळणार असल्याचं राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी
म्हटलं आहे. कर रचनेतील कपात, मध्यस्थांवरील नियंत्रण आणि बाजारपेठेतील स्पर्धात्मक
वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळेल, असं त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया
देताना नमूद केलं.
****
बीड इथं बनावट नोटा बाळगून
त्याचा वापर करणाऱ्या दोन आरोपींना शिवाजीनगर पोलीसांनी जेरबंद केलं. शहरातल्या एचडीएफसी
बँकेच्या सीडीएम मशिनमध्ये ५०० रुपयाच्या सात बनावट नोटा भरल्याची तक्रार बँकेकडून
दाखल करण्यात आली होती. बापुराव परजने असं या आरोपीचं नाव असून, त्याच्याकडून
५०० रुपयाच्या ३० आणि १०० रुपयाच्या १९ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
****
नंदुरबार जिल्ह्यात तोरणामाळला
जाणाऱया रस्त्यावर दरड कोसळून हा रस्ता वाहतूकीसाठी बंद झाला आहे. कालपासूनच या परिसरात
मुसळधार पाऊस सुरु आहे. दरड हटवण्याचं काम सुरु करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
पैठणच्या जायकवाडी धरणाची
पाणीपातळी ९८ टक्के झाली आहे. धरणात सध्या नऊ हजार ३३७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची
आवक आहे.
****
No comments:
Post a Comment