Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 05 September 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ सप्टेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
येत्या काळात जगाच्या सागरी अर्थव्यवस्थेत भारत महत्त्वाची
भूमिका बजावेल-जेएनपीटी दोन च्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
·
जीएसटी कररचनेतल्या सुधारणांचं उद्योग क्षेत्रासह समाजाच्या
सर्व स्तरातून स्वागत
·
मराठवाडा साहित्य परिषदेचा पहिला रघुनाथ शिवराम बोरसे
विशेष बालवाङ्गमय पुरस्कार पत्रकार संजय ऐलवाड यांना जाहीर
·
आज शिक्षक दिन-राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं दिल्लीत
राष्ट्रपतींच्या हस्ते आज वितरण
·
ईद ए मिलादनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आज सर्वत्र
आयोजन
आणि
·
आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताचा मलेशियावर चार - एक असा
विजय
****
येत्या
काळात जगाच्या सागरी अर्थव्यवस्थेत भारत महत्त्वाची भूमिका बजावेल, आणि तो प्रवास
आजपासून सुरू झाला आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी केलं आहे. काल नवी मुंबईत उरण इथल्या जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या टर्मिनल
दोन चं, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स
वाँग यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे लोकार्पण केलं, त्यावेळी मुख्यमंत्री
बोलत होते. केंद्रीय बंदरे आणि जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल, राज्यमंत्री शांतनू ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ही
गोदी पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी असून विशेष मार्गिका असलेल्या पोर्टवरील हे देशातलं
सर्वात मोठं पहिलं कंटेनर टर्मिनल आहे. या टर्मिनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या
अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त
केला. ते म्हणाले...
बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
****
जीएसटी
कर रचनेतल्या सुधारणांचं उद्योग क्षेत्रासह समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
जीएसटीमधली सुधारणा हे एक परिवर्तनकारी पाऊल असून, शेतकरी,
एमएसएमई, महिला, तरुण,
मध्यमवर्गीय या सर्वांनाच दिलासादायक असल्याचं, केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
जीएसटी
कर रचनेतल्या सुधारणेमुळे देशातल्या प्रत्येक कुटुंबाला मदत होणार असल्याची प्रतिक्रिया, माहिती आणि
प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते म्हणाले...
बाईट
- अश्विनी वैष्णव, माहिती आणि प्रसारण मंत्री
जीएसटी
सुधारणांमुळे सर्वसामान्यांना दिलासा, महागाईवर नियंत्रण आणि लहान उद्योगांना
मजबुती असे अनेक उद्देश साध्य झाले आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.
चिदंबरम यांनीही या सुधारणांचं स्वागत केलं, तर काँग्रेस पक्ष
दीर्घकाळपासून याची मागणी करत होता, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून
खरगे यांनी म्हटलं आहे.
****
ही केवळ
कर आकारणीत सुधारणा नाही तर ती सहजतेने राहणीमानात सुधारणा असल्याचं सांगून, मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं, तर या सुधारणांचा
लाभ सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचं,
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
**
जीवन विमा
तसंच आरोग्य विमा योजनांना जीएसटी कररचनेतून सूट देण्यात आली आहे. यामुळे पॉलिसीधारकांना
मिळणाऱ्या लाभाबाबत छत्रपती संभाजीनगर इथल्या विमा प्रतिनिधी अंजली खंडाळीकर यांनी
माहिती दिली...
बाईट - विमा प्रतिनिधी अंजली खंडाळीकर
**
जीएसटी
सुधारणांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्नवाढीला चालना मिळणार असून, केंद्र सरकारचा
हा निर्णय हे शेतकरी-केंद्रित धोरणांचं स्पष्ट उदाहरण आहे, असं
भाजपाचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
****
न्यायमूर्ती
श्री चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करायला
केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल
यांनी समाजमाध्यमावरून ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने २४ ऑगस्ट
रोजी चंद्रशेखर यांच्या नावाची शिफारस केली होती.
****
शिक्षक
दिन आज साजरा होत आहे. देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस
शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय
शिक्षक पुरस्कारांचं वितरण आज राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. राज्यातल्या तीन शिक्षकांचा
यावेळी गौरव करण्यात येणार असून, यामध्ये नांदेडचे डॉ. शेख मोहम्मद
वकीउद्दीन शेख हमीदोद्दीन, लातूरचे डॉ. संदीपान जगदाळे आणि मुंबईतल्या
सोनिया कपूर यांचा समावेश आहे.
दरम्यान, पंतप्रधान
मोदी यांनी काल राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधला. देशभरातल्या सर्व
शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची बीजं पेरण्याचं आणि त्याचं महत्त्व
स्थानिक बोलीभाषेत सांगण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
मुस्लीम
धर्मियांचे प्रेषीत हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलादुन्नबी आज साजरी होत
आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद इथं पैगंबर यांचा पवित्र पोशाख तसंच पवित्र केसाचं आज
भाविकांना दर्शन घेता येतं. यासाठी भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल होत आहेत.
या गर्दीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
****
मराठवाडा
साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे विशेष बालवाङ्गमय पुरस्कार दैनिक केसरीचे पत्रकार
संजय ऐलवाड यांना झिब्राच्या कथा या संग्रहासाठी जाहीर झाला आहे. ११ हजार रुपये आणि
सन्मानचिन्ह या स्वरुपाचा हा पुरस्कार येत्या २७ सप्टेंबर रोजी ऐलवाड प्रदान करण्यात
येणार आहे. उदगीर तालुक्यातल्या एकुर्का रोड इथले रहिवासी असलेले ऐलवाड यांचे दोन कथासंग्रह, दोन बालकवितासंग्रह,
तीन बालकथासंग्रह, यांसह एकूण बारा पुस्तकं प्रसिद्ध
आहेत.
****
हैदराबाद, सातारा गॅझेटियर
शोधून मराठा कुणबी जात पडताळणी, प्रमाणपत्र देण्याचं काम कालबद्ध
मर्यादेत करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं, यासंदर्भात
स्थापन उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर
इथं आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर बोलत होते. आरक्षणासंदर्भात
समाजात संभ्रम न पसरवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
नागपुरात
सुरू असलेल्या ओबीसी महासंघाच्या आंदोलनाला मंत्री अतुल सावे यांनी काल भेट दिली. सहा
दिवसाच्या या उपोषण काळात ओबीसींच्या १२ मागण्या पूर्ण झाल्या असून, पुढच्या महिनाभरात
१२ विषय स्पष्ट होतील असं सावे यांनी सांगितलं. मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणाला
धक्का लागणार नाही, असंही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट
केलं.
दरम्यान, बीड जिल्ह्यात
माजलगाव शहरात तहसील कार्यालयाबाहेर आरक्षणाच्या संरक्षणासाठी ओबीसी समाज बांधवांनी
काल आंदोलन केलं. यावेळी हैद्राबाद गॅझेटियर शासन परिपत्रकाची होळी करण्यात आली.
****
गणेशोत्सवाच्या
निमित्तानं संपूर्ण राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दहा दिवसांच्या
या चैतन्य पर्वाची उद्या शनिवारी अनंत चतुर्दशीला, सांगता होणार आहे.
मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन ऐवजी त्या संकलित करण्याचं आवाहन करण्यात आलं असून,
ठिकठिकाणी त्यासाठी संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत.
लातूर महानगरपालिकेनं
१५ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारले असून, सार्वजनिक गणेश मंडळांना मोठ्या मूर्तींचं
विसर्जन १२ नंबर पाटी जवळील खदानीत करता येणार आहे.
गणेश विसर्जन
मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातले मुख्य रस्ते शनिवारी सकाळपासून रात्री ११
वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असतील.
छत्रपती
संभाजीनगर इथंही शहरातले मुख्य रस्ते शनिवारी सकाळपासून ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत
सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहतील. नागरिकांनी या काळात पर्यायी रस्त्यांचा वापर
करावा, असं आवाहन शहर पोलिस प्रशासनानं केलं आहे.
धाराशिव
इथल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीने गौरी पूजन काळात बालिका जन्मोत्सव साजरा
करण्यात आला.
****
ईद ए मिलादनिमित्त राज्य सरकारने आजची सुटी रद्द करून आठ तारखेला सुटी जाहीर केली आहे. रिजर्व्ह बँकेनेही आज सर्व आर्थिक व्यवहार सुरू ठेवण्याबाबत सूचित केलं असून, सोमवारी आठ तारखेला सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचं सांगितलं आहे. सोमवारचे सर्व व्यवहार आता मंगळवारी होतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
ईद-ए-
मिलादनिमित्त लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयातला
बाह्यरुग्ण विभाग आज बंद राहणार आहे. उद्यापासून बाह्यरुग्ण विभाग नियमित
वेळेप्रमाणे सुरु राहील.
****
आशिया चषक
हॉकी स्पर्धेत काल बिहारमधल्या राजगीर इथं झालेल्या सामन्यात भारताने मलेशियाचा चार
- एक असा पराभव केला. या विजयोसबत भारत सुपर फोर गटात पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
****
No comments:
Post a Comment