Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 05 September
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०५ सप्टेंबर २०२५ सकाळी ११.०० वाजता
****
शिक्षक दिन आज साजरा होत आहे.
देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून
साजरा केला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशभरातल्या शिक्षकांना शुभेच्छा
दिल्या आहेत. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी जबाबदार, हुशार, आणि कुशल नागरिक तयार करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकला. शिक्षण हे फक्त नोकरी
नसून जीवनपद्धती आहे, शिक्षकांमध्ये राष्ट्र घडवण्याची
आणि जीवन परिवर्तन करण्याची ताकद असल्याचं त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण आज राष्ट्रपतींच्या हस्ते होत आहे. राज्यातल्या
तीन शिक्षकांचा यावेळी गौरव करण्यात येणार असून, यामध्ये नांदेडचे
डॉ. शेख मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीदोद्दीन, लातूरचे डॉ.
संदीपान जगदाळे आणि मुंबईतल्या सोनिया कपूर यांचा समावेश आहे.
****
शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षकांशी नवी दिल्ली इथं संवाद साधला. सशक्त देशाचा
पाया रचण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रुजवण्याचं काम शिक्षकच करू
शकतात, असं ते यावेळी म्हणाले. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यात
स्वावलंबनाची बीजं पेरण्याचं आणि त्याचं महत्त्व सोप्या भाषेत आणि स्थानिक बोलीभाषेत
सांगण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
मुस्लीम धर्मियांचे प्रेषीत
हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलादुन्नबी आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी
मुर्मू यांनी ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोहम्मद पैगंबर यांनी एकता
आणि मानवतेचा संदेश दिला; त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा
घेऊन प्रत्येकानं समाजात प्रेम आणि बंधुतेची भावना जोपासण्यासाठी प्रयत्न करावेत, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
खुलताबाद इथं पैगंबर यांचा पवित्र पोशाख तसंच पवित्र केसाचं आज भाविकांना दर्शन घेता
येतं. यासाठी भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल होत आहेत. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर
या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
****
दरम्यान, ईद निमित्तची मिरवणूक येत्या सोमवारी काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजानं घेतला
आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांमध्ये ईदची सार्वजनिक सुटी आजच्या
ऐवजी येत्या सोमवारी, आठ तारखेला देण्यात येणार आहे.
मात्र हा बदल राज्यातल्या इतर जिल्ह्यांना लागू राहणार नाही, असं शासनानं कळवलं आहे.
****
ओबीसी समाजाच्या बारा मागण्या
तातडीनं मंजूर करून त्याबाबतचा शासन आदेश एका महिन्याच्या आत काढण्याचं आश्वासन
राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिला; त्यानंतर ओबीसी राष्ट्रीय महासंघानं आपलं साखळी उपोषण काल मागे घेतलं. मराठा
समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये आणि मराठा समाजाचा समावेश कुणबी जातीत करू नये या प्रमुख
मागण्यांसाठी नागपूर इथं संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली
गेल्या ३० ऑगस्टपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आलं होतं.
****
बीड इथं बनावट नोटा बाळगून
त्याचा वापर करणाऱ्या दोन आरोपींना शिवाजीनगर पोलीसांनी जेरबंद केलं. शहरातल्या एचडीएफसी
बँकेच्या सीडीएम मशिनमध्ये ५०० रुपयाच्या सात बनावट नोटा भरल्याची तक्रार बँकेकडून
दाखल करण्यात आली होती. बापुराव परजने असं या आरोपीचं नाव असून, त्याच्याकडून ५०० रुपयाच्या ३० आणि १०० रुपयाच्या १९ बनावट नोटा जप्त करण्यात
आल्या.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या
प्रभाग रचनेवर हरकती आणि आक्षेप दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. प्रभाग रचनेवर
एकूण ३५९ हरकती दाखल झाल्याची माहिती, निवडणूक विभाग प्रमुख विकास
नवाळे यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा सहकारी
दुग्ध उत्पादक संघाचा गांधेली इथल्या दुग्ध शाळेला खासदार संदिपान पाटील भुमरे यांनी
काल सदिच्छा भेट दिली. जिल्हा दुग्ध संघ अधिक बळकट होऊन शेतकऱ्यांचं आर्थिक उत्थान
व्हावं, यासाठी खासदार म्हणून कायम कटिबद्ध राहण्याचं आश्वासन, भुमरे यांनी दिलं.
****
इंग्लंडमध्ये लिव्हरपूल इथं
जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या
पवन बर्तवाल या खेळाडूनं ५५ किलो वजनी गटात ब्राझीलच्या खेळाडूचा ३-२ असा पराभव केला.
या स्पर्धेत भारताकडून २० खेळाडूंचा संघ सहभागी झाला आहे.
****
आशिया चषक हॉकी स्पर्धेत काल
बिहारमधल्या राजगीर इथं झालेल्या सामन्यात भारताने मलेशियाचा चार - एक असा पराभव केला.
मनप्रीत सिंह, सुखजीत सिंह, शिलानंद लाकडा
आणि विवेक सागर प्रसाद यांनी हे गोल केले. या विजयोसबत भारत सुपर फोर गटात पहिल्या
स्थानावर पोहोचला आहे. भारताचा पुढचा सामना उद्या चीन सोबत होणार आहे.
****
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत
पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी आणि त्याचा जोडीदार न्यूझीलंडचा मायकल वेनस यांचा
उपान्त्य फेरीत पराभव झाला. काल झालेल्या सामन्यात ब्रिटीश जोडीनं युकी - मायकल जोडीचा
सहा - सात, सात - सहा, सहा - चार असा
पराभव केला.
****
No comments:
Post a Comment