Saturday, 6 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.09.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 06 September 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०६ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता-ढोल ताशांच्या गजरात गणरायाला निरोप

·      सार्वजनिक गणेशमंडळांच्या शिस्तबद्ध मिरवणुकांना प्रारंभ-पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

·      छत्रपती संभाजीनगर मनपाचा अभिनव उपक्रम-निर्माल्य जमा करणाऱ्यांना सेंद्रीय खताची भेट

·      हैदराबाद गॅझेटियर विरोधात ओबीसी संघटनांचा पुढच्या महिन्यात महामोर्चाचा इशारा

आणि

·      ज्येष्ठ साहित्यिक बी रघुनाथ यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन

****

दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. या गणेशमूर्ती विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई-पुण्यासह छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासनानं सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणपूरक व्यवस्थेची काटेकोर आखणी केली आहे.

मुंबई महानगरपालिकेनं श्री गणरायला निरोप देण्यासाठी विविध सोयी-सुविधांसह सुसज्ज ७० नैसर्गिक जलस्रोत आणि सुमारे २९० कृत्रिम तलाव उपलब्ध करुन दिले आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्यासह दहा हजार अधिकारी-कर्मचारी ही व्यवस्था सांभाळत आहेत. मुंबईत यासाठी २४५ नियंत्रण कक्ष कार्यरत असून निर्माल्य कलश, नियंत्रण कक्ष, निरीक्षण मनोरे, विद्युत व्यवस्था, रुग्णवाहिका या सुविधा भक्तांसाठी सज्ज आहेत.

पुण्यातल्या विसर्जन मिरवणुका मोठ्या जल्लोषात सुरू आहेत. मानाच्या पाच गणपतींच्या पाठोपाठ इतरही मोठ्या मंडळांचे गणपती विसर्जन स्थळाकडे मार्गक्रमण करत आहेत. ढोल ताशांच्या तालावर गणरायाला निरोप दिला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामदैवत संस्थान गणपतीची महाआरती करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला, त्यानंतर शहरातल्या इतर मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला. दरम्यान, घरगुती गणपतींचं विसर्जन सकाळपासूनच सुरू झालं. महानगरपालिकेने शहरात २१ ठिकाणी विसर्जन विहिरींची तसंच कृत्रीम तलावांची व्यवस्था केली असून, ४१ ठिकाणी गणेशमूर्ती संकलन केंद्रं उभारली आहेत. मूर्ती संकलन केंद्रात गणेश मूर्ती तसंच निर्माल्य जमा करणाऱ्या भक्तांना महापालिकेकडून ओल्या कचऱ्यापासून केलेल्या सेंद्रीय खताची पिशवी भेट म्हणून देण्यात आली.

छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या डीजे बंदीच्या आवाहनाला सर्व सार्वजिनक गणेश मंडळांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. ढोल- ताशे, लेझीम आणि झांज वादनाच्या पार्श्वभूमीवर निघालेल्या मिरवणुका सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. पोलिस प्रशासनाच्या वतीने कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नांदेड शहर आणि जिल्ह्यातही श्री गणेश विसर्जन उत्साहात सुरू आहे. शहरात महापालिकेच्या वतीनं २८ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र स्थापन केली असून, महापालिकेनं निर्माल्य संकलन केंद्रांचीही व्यवस्था केली आहे. सहा फुटांहून अधिक उंचीच्या श्री मूर्तींचं दोन मोठ्या तलावात विसर्जन केलं जात आहे. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

धाराशिव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत देशभक्तीपर देखाव्यामधून नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना रुजवली जात आहे. शहरातील लोकमान्य टिळक गणेश मंडळानं गणेश विसर्जन मिरवणुकीत भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर देशभरात उसळलेली संतापाची लाट आणि देशभक्तीच्या भावना देखाव्यामधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते विशाल गणपतीची आरती करून विसर्जनास प्रारंभ झाला. महापालिकेच्या वतीनं अहिल्यानगर मध्यवर्ती शहरासह सावेडी, केडगाव, बोल्हेगाव आदी १७ ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी व्यवस्था केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातही १ हजार ३८५ सार्वजनिक मंडळांकडून विसर्जन मिरवणुकी दरम्यान विविध देखावे सादर करत गणपती विसर्जन मिरवणुका शांततेत सुरू आहेत.

गोंदिया शहरात देखील घरगुती गणपती बापाचे विसर्जन इको फ्रेंडली पद्धतीने करण्यात आले असून गोंदिया शहरात दोन ठिकाणी विसर्जना साठी व्यवस्था करण्यात आली आहे.

वाशीम शहरात खासदार संजय देशमुख यांच्या शुभहस्ते मानाचा गणपती शिवशंकर गणेश मंडळ यांची पारंपरिक पद्धतीनं पूजा आरती करुन विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व गणेश मंडळांच्या प्रतिनिधी आणि भाविकांची मोठी उपस्थिती होती.

रायगड जिल्ह्यातही आज गणरायाला मोठ्या उत्साह आणि आनंदात निरोप दिला जात आहे. जिल्ह्यात आज १६९ सार्वजनिक आणि १८ हजार ४२ खाजगी गणपतींचं विसर्जन करण्यात येत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

 

नाशिक शहरातही मुख्य गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष यावेळी उपस्थित होते. दरम्यान, गोदावरी नदीला पाणी वाढल्यानं नागरिकांनी नदीपात्रात जाऊन मूर्ती विसर्जन करण्याबाबत सतर्कता बाळगावी असं आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे.

****

नवी दिल्लीतही महाराष्ट्रातून स्थलांतरित झालेले अनेक भाविक दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतात. आज नवी दिल्लीत लोधी कॉलनीतल्या गणेश विसर्जन सोहळ्याला राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी महाराष्ट्रातील भाविकांची भेट घेऊन, गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

****

वस्तू आणि सेवा कर -जीएसटीच्या पुनर्चरनेमुळे वस्त्र आणि पादत्राणं स्वस्त झाली आहेत. हाताने विणलेले कपडे आणि भरतकाम केलेल्या शाली यांच्यावर पूर्वी १२ टक्के कर आकारला जात होता, तो आता ५ टक्के करण्यात आला आहे. यासंदर्भात पैठणी विणकर कविता ढवळे यांनी आपलं मत या शब्दांत नोंदवलं...

बाईट – कविता ढवळे, पैठणी विणकर

 

टोप्या तसंच छत्र्यांवरचा करही १२ वरून ५ टक्के झाला आहे. त्यामुळे या वस्तू ग्राहकांना स्वस्त मिळणार आहेत. अडीच हजारांपेक्षा कमी दर असलेल्या पादत्राणांवरच्या करात कपात करून ते पाच टक्के करण्यात आले आहेत. तर अडीच हजारांपेक्षा जास्त दर असलेल्या कपड्यांवरचा कर १२ टक्क्यावरून वाढवून १८ टक्के झाला आहे.

****

मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या राज्यशासनाच्या निर्णयाविरोधात ओबीसी संघटनांनी महामोर्चाचा इशारा दिला आहे. विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांच्या ओबीसी संघटनांची आज नागपूर इथं बैठक झाली, ओबीसी नेते तथा काँग्रेसचे विधान सभेतले पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या शासन निर्णयात पात्र असा शब्द वापरला होता. मात्र नंतर दुसरा शासन निर्णय काढून पात्र हा शब्द वगळण्यात आला. याविरोधात ऑक्टोबर महिन्यात नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं बी. रघुनाथ स्मृती सोहळ्याचं उद्या रविवारी आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी प्रसाद कुमठेकर यांच्या 'इतर गोष्टी' या कथा संग्रहाला बी. रघुनाथ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी मान्यवर कवींच्या कवितांवर आधारीत शताब्दी कवितांचं सादरीकरणही केलं जाणार आहे. शहरात टिळक नगरातील ग्रंथमित्र भास्करराव आर्वीकर सभागृहात आयोजित हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेची परभणी शाखा आणि अक्षर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं प्रसिद्ध साहित्यिक बी.रघुनाथ यांच्या पुण्यतिथीनिमित्त कविसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या रविवारी सायंकाळी ५ वाजता बी. रघुनाथ महाविद्यालयात हे कविसंम्मेलन होणार आहे. साहित्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

****

आशिया करंडक हॉकी स्पर्धेत सुपर फोरमध्ये आज भारताचा सामना चीनसोबत होणार आहे. सुपर फोरच्या पदकतालिकेत भारत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारत अजेय राहिल्यानं आशिया करंडकासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे.

****

मुंबईत आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणायची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेनं उत्तर प्रदेशच्या नोयडा इथून अटक केली. गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि सिमकार्डही पोलिसांनी जप्त केलं. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप हेल्पलाइनवर काल हा मेसेज आला होता. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.

****

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा दीड हजारावा जन्मोत्सव अर्थात ईद-ए-मिलाद काल नाशिक शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. पारंपरिक प्रथेनुसार दुपारी साडे तीन वाजता जुने नाशिकमधील चौकमंडई इथून मुख्य ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ची मिरवणूक काढण्यात आली.

****

सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि भीमा नदीला आलेल्या पुरामुळं जिल्ह्यातील ५९ कोटी ७९ लाख १६ हजार रुपयांच्या शेत पिकांचं नुकसान झालं आहे. जिल्ह्यात एकूण ५९ हजार ११० शेतकरी बाधित झाले असून, ५६ हजार ९६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे. याचा सर्वाधिक फटका उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी आणि अक्कलकोट तालुक्याला बसला आहे, त्यासाठी नुकसानभरपाई मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनाकडं पाठवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

****

No comments: