Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 06 September 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ सप्टेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
चैतन्यपर्व गणेशोत्सवाची आज सांगता-विसर्जन व्यवस्थापनासाठी
प्रशासकीय यंत्रणा सज्ज
·
‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या
विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
·
अतिवृष्टीबाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही-कृषी
मंत्र्यांची ग्वाही
·
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान-मराठवाड्यातल्या
दोन शिक्षकांचा सन्मान
आणि
·
महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेत थायलंडवर मात करत भारताची
विजयी सलामी
****
चैतन्यपर्व
गणेशोत्सवाची आज सांगता होत आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी तसंच चौकाचौकात स्थापन
झालेल्या गणेशाच्या पार्थिव म्हणजेच मातीच्या मूर्तींचं आज अनंत चतुर्दशीला विसर्जन
केलं जातं. ढोल ताशांच्या गजरात आयोजित होणाऱ्या या विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर
राज्यभरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याऐवजी
त्या संकलित करण्याचं आवाहन करण्यात आलं असून, त्यासाठी ठिकठिकाणी संकलन केंद्र उभारण्यात
येणार आहेत. विसर्जनाच्या तयारीचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत...
‘‘गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर
शहरातले मुख्य रस्ते आज सकाळपासून ते विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी
बंद राहतील. महानगरपालिकेने शहरात २१ ठिकाणी विसर्जन विहिरींची
तसंच कृत्रीम तलावांची व्यवस्था केली असून, ४१ ठिकाणी गणेशमूर्ती
संकलन केंद्रं उभारली आहेत.
लातूर शहरातलेही मुख्य रस्ते
आज वाहतुकीसाठी बंद असतील. नागरिकांनी या काळात पर्यायी रस्त्यांचा
वापर करावा, असं आवाहन शहर पोलिस प्रशासनानं केलं आहे.
लातूर महानगरपालिकेनं १५ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारले असून,
मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन १२ नंबर पाटी जवळील खदानीत करता
येणार आहे.
नांदेड शहरात २८ ठिकाणी मूर्ती
संकलन केंद्र राहणार आहेत. सहा फुटांवरील मूर्तींचं विसर्जन झरी
आणि पुयणी इथल्या तलावात केलं जाणार आहे. विसर्जन मिरवणुका शांततेत
पार पडाव्यात यासाठी पोलिस प्रशासनानेही चोख बंदोबस्त लावला आहे.’’
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात
हदगाव तसंच यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड इथलं गणपती विसर्जन दरवर्षी पैनगंगा नदीत होते.
या पार्श्वभूमीवर उमरखेड इथून हदगावकडे येणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात येणार
आहे.
जालना इथं
छत्रपती संभाजी महाराज विसर्जन कुंडाचं काल आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते लोकार्पण
झालं. गणपतीसह दुर्गादेवी विसर्जन तसंच छटपुजेसाठी हे कुंड वापरता येणार आहे.
बीड जिल्ह्यात
सण-उत्सव शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्याचं आवाहन पोलिस अधीक्षक नवनीत
कॉंवत यांनी केलं आहे. उत्सवासाठी वर्गणीची सक्ती झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
त्यांनी दिला.
****
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष
उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये
२८ ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान घेतलेल्या सात हजार १५९ आरोग्य शिबिरांतून तीन लाख
२६ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैकी नऊ हजार ९६० रुग्णांना पुढील उपचारासाठी
तज्ज्ञांकडे पाठवण्यात आलं. या रुग्णांना पुढील उपचारही मोफत पुरवले जाणार असल्याचं
मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, यांनी सांगितलं
आहे.
****
मुस्लीम
धर्मियांचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद ए मिलादुन्नबी काल भक्तीभावानं
साजरी झाली. या निमित्त छत्रपती संभाजीनगर इथं अन्नदान आणि रक्तदान शिबीरं घेण्यात
आली. दरवर्षी ईदच्या दिवशी विशेष मिरवणूक काढली जाते. यंदा ही मिरवणूक परवा सोमवारी
८ सप्टेंबर रोजी काढण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात खुलताबाद इथं हजरत पैगंबर यांचा
पवित्र पोशाख तसंच त्यांच्या पवित्र केसाचं दर्शन घेण्यासाठी काल मोठी गर्दी झाली होती.
ईदनिमित्त
हिंगोलीत भव्य मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आलं. ४६० रुग्णांनी याचा लाभ घेतला.
****
राज्यातील
शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या
अध्यक्षतेखाली स्थापन समितीत सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीमध्ये डॉ.
सदानंद मोरे, डॉ. वामन केंद्रे, छत्रपती संभाजीनगर इथल्या
शिक्षणतज्ज्ञ डॉ. मधुश्री सावजी, आदींचा समावेश आहे.
****
अतिवृष्टीबाधित
एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
यांनी दिली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह राज्याच्या २९
जिल्ह्यांमधल्या १९१ तालुक्यांमध्ये १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्रावरील पीक बाधित
झालं आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक सहा लाख २० हजार ५६६ हेक्टर क्षेत्रावरील
पिकांचं नुकसान झालं असून, धाराशिव जिल्ह्यात एक लाख ५० हजार
७५३ हेक्टर तर हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी ४० हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान
झालं आहे.
****
न्यायमूर्ती
चंद्रशेखर यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. मुंबईत
राजभवनात, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्यायमूर्ती चंद्रशेखर यांना
पदाची शपथ दिली.
****
मुलींच्या
शिक्षणातली गुंतवणूक ही कुटुंब, समाज आणि देशाच्या उभारणीत अनन्यसाधारण
भूमिका बजावते, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी
केलं आहे. काल नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक
पुरस्कारांचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या
बोलत होत्या. पुरस्कारविजेत्या शिक्षकांमध्ये महिलांची, तसंच
ग्रामीण भागातल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय असल्याचा उल्लेख करत, आधुनिक भारताच्या उभारणीत सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा राष्ट्रपतींनी
गौरवपूर्ण उल्लेख केला. त्या म्हणाल्या..,
बाईट
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
राष्ट्रपतींनी
देशातल्या ६६ शिक्षकांचा यावेळी पुरस्कार देऊन गौरव केला, त्यात राज्यातल्या
सहा शिक्षकांचा समावेश आहे. यामध्ये बारामतीचे प्राध्यापक पुरुषोत्तम पवार मुंबईच्या
डॉ. नीलाक्षी जैन आणि सोनिया कपूर, नागपूरचे अनिल जीभकाटे,
नांदेडचे डॉ.शेख मोहम्मद वकीउद्दीन आणि लातूरचे प्राध्यापक डॉ. संदिपान
जगदाळे यांचा समावेश आहे.
मराठवाड्यातल्या
शिक्षकांच्या कार्याची संक्षिप्त माहिती देणारा हा वृत्तांत...
‘‘नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर
जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आणि विज्ञान विषयाचे शिक्षक डॉ. शेख मोहम्मद
वकीउद्दीन यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेला शिक्षणासोबतच सामाजिक
सुधारणांचं केंद्र करण्याचं काम केलं. त्यांनी मुलींसाठी तात्पुरत्या स्वरुपात
शाळेची शाखा सुरु केली. ५ लाख सॅनीटरी नॅपकीन उपलब्ध करुन दिले तसंच सामाजिक
सहकार्यानं निधी उभारून शिक्षणासाठीची डिजीटल सामग्री उपलब्ध करून दिली.
लातूरच्या दयानंद कला
महाविद्यालयातले संगीत विषयाचे प्राध्यापक डॉ. संदिपान जगदाळे यांनी संगीत
विषयाच्या अध्यापनाला शास्त्रीय ज्ञानासोबतच, नाविन्यपूर्ण
प्रयोगांची जोड दिली. त्यांनी ब्रेल लिपीत संगीत अभ्यासक्रमाची पुस्तकं तयार केली
तसंच QR कोड आधारित अभ्यास साहित्य विकसित करून संगीत शिक्षण
अधिक सुलभ आणि परिणामकारक केलं. त्यांनी गोंड आदिवासी वस्त्यांमध्ये जाऊन
शिक्षणाचा प्रसार केला, तसंच एचआयव्ही बाधित विद्यार्थी तसंच
दिव्यांग विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व घेतलं आहे.’’
****
आदर्श राज्य
शिक्षक पुरस्कार आता “डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार” या नावाने देण्यात
येणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत ही घोषणा
केली. या पुरस्काराची निवड प्रक्रिया तसंच निकषांत सुधारणा करून शासन निर्णय जाहीर
करण्यात आला आहे.
****
धाराशिव
इथं काल ३५ शिक्षकांना तसंच विविध १५ अधिकारी कर्मचाऱ्यांना गौरवण्यात आलं. १२ शाळांना
गेल्या दोन वर्षाचे "मुख्यमंत्री माझी समृद्ध शाळा" पुरस्कार काल प्रदान
करण्यात आले. मुख्यमंत्री माझी शाळा अंतर्गत धाराशिव तालुक्यातून प्रथम आलेल्या बावी
इथल्या जवाहर आश्रम शाळेचाही सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून दिल्या जाणाऱ्या आदर्श पुरस्काराची
घोषणा करण्यात आली आहे, यंदा जिल्ह्यात नऊ प्राथमिक आणि सहा माध्यमिक अशा एकूण १५ शिक्षकांना
आदर्श पुरस्कार जाहीर झाले आहेत. येत्या १३ तारखेला हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान
करण्यात येणार आहेत.
****
महिला आशिया
चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने थायलंडचा ११ - शून्य असा पराभव करत या स्पर्धेत विजयी
सलामी दिली. या स्पर्धेत भारताचा आज जपान संघासोबत सामना होणार आहे. या स्पर्धेच्या
पुरुष गटात आज भारताचा सुपर फोर गटातला अखेरचा सामना चीनसोबत होणार आहे.
****
मराठा आरक्षणासाठी
हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या शासन निर्णयाविरोधात हिंगोली जिल्ह्यात ओबीसी समाजानं
काल रास्ता रोको आंदोलन केलं. हा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
****
नाशिक जिल्ह्यात
पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातल्या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता
आहे. सध्या पैठणच्या जायकवाडी धरणात सुमारे सात हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं
पाण्याची आवक होत असून, साडे नऊ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे.
नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सध्या सहा हजार तर नागमठाण धरणातून साडे बारा हजार दशलक्ष
घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे.
****
हवामान
बंगालच्या
उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत असल्यानं मुंबई, ठाणे आणि
उपनगरांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, पालघर,
नंदुरबार, नाशिक आणि पुणे घाट परिसरासाठी,
हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
****
No comments:
Post a Comment