Tuesday, 16 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 16 September 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन उद्या साजरा होत आहे. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. 'ऑपरेशन पोलो' या लष्करी कारवाईद्वारे भारतीय सैन्याने हैदराबाद ताब्यात घेऊन निजामाचा पराभव केला. हैदराबाद प्रांतातला मराठवाडा हा भागही मुक्त होऊन, भाषेच्या आधारे तो महाराष्ट्रात सामील करण्यात आला. मराठवाड्यात सर्वत्र हैदराबाद मुक्तिसंग्रामदिन विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होतो.

छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतिस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. विभागात इतर जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ होणार आहे.

****

मराठवाड्याच्या विकासकामांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेल्या घोषणांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. २०२३ मध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाड्याचं मागासलेपण दूर करण्याच्या हेतूने मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत करण्यात आलेल्या घोषणा अद्यापही पूर्ण झाल्या नसल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

****

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष राष्ट्रीय अभियानाला उद्यापासून सुरूवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदूर इथं या अभियानाची सुरूवात होणार आहे. तसंच मुंबईत यशवंतराव चव्‍हाण सेंटर इथं या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ होणार आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्हा आणि महापालिका स्तरावर महिला आणि बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं असून, यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ देण्यात येणार आहे. हे अभियान दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार असून, सर्व महिला आणि बालकांनी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

****

मुंबईत जिओ वर्ल्ड कन्वेक्शन सेंटर इथं आयोजित जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. राज्य शासन कौशल्य विद्यापीठाअंतर्गत 'जेम्स अँड ज्वेलरी' क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करेल, ज्यामुळे निश्चितच या क्षेत्राच्या प्रगतीत सातत्य कायम राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

****

जागतिक ओझोन दिवस आज साजरा केला जात आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीचं रक्षण करण्यात ओझोन वायूचा थर अत्यंत महत्वाचा आहे. ‘विज्ञानातून वैश्विक कार्यवाही’, ही यंदाच्या ओझोन दिनाची संकल्पना आहे.

****

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं २०२५-२६ या वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत आज एका दिवसानं वाढवली आहे. काल ही मुदत संपणार होती. चालू वर्षासाठी सात कोटीहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्र दाखल झाल्याचं कर विभागानं सांगितलं.

****

परभणी जिल्ह्यात हदगाव आणि खड्का इथल्या महावितरणच्या उपकेंद्रासाठी अतिरिक्त पॉवर ट्रान्स्फफॉर्मर - रोहित्र मंजूर झाले आहेत. या ३३ केव्ही उपकेंद्रावर अधिक भार झाला असून, इथून शेती पंपासाठी आणि घरगुती वापरासाठी होणार्या विद्युत पुरवठ्यामध्ये वारंवार खंड पडत आहे. त्यामुळे या उपकेंद्रात अतिरिक्त रोहित्राची मागणी आमदार राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. उर्वरित वाघाळा, पाळोदी, रामेटाकळी, आणि शिंगणापूर इथल्या उपकेंद्रासाठी देखील लवकरच अतिरिक्त पॉवर ट्रान्स्फफॉर्मर मंजूर होतील अशी माहिती, विटेकर यांनी दिली.

****

परभणी जिल्ह्यात 'स्वच्छता ही सेवा' अभियान १७ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या अभियानात सर्व नागरिक, शैक्षणिक संस्था, महिला बचत गट तसंच विविध विभागांनी सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक नतिशा माथूर यांनी केलं आहे.

****

नांदेड महापालिकेने आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी घोषित केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर १३९ आक्षेप प्राप्त झाले आहेत. या आक्षेपांची सुनावणी आजपासून २२ सप्टेंबर पर्यंत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे होणार आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण, सिल्लोड, गंगापूर, सोयगाव, खुलताबाद तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातल्या दहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. सिल्लोड तालुक्यातल्या घटनांद्रा इथल्या नदी नाल्यांना पूर आला आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे.

कन्नड तालुक्यात पिशोर इथं काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकी नदीला पूर आला आहे. आसपासच्या परिसरातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं असून, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

****

No comments: