Tuesday, 16 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 16.09.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 16 September 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १७ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 

·      उद्या हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन-मराठवाड्यात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन

·      श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्यातील प्रमुख महोत्सवाचा दर्जा

आणि

·      संपूर्ण राज्यभरात आज पावसाचा यलो अलर्ट

****

राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निवडणुका घेण्यासाठी आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही, असंही न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं स्पष्ट करत, यापूर्वीच्या निर्देशांचं पालन न केल्याबद्दल राज्यसरकारवर ताशेरे ओढले. या निवडणुका चार महिन्यांच्या आत घ्यायचे निर्देश न्यायालयानं ६ मे रोजी दिले होते. प्रभाग पुनर्रचनेची प्रक्रिया या वर्षीच्या ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

****

अंमली पदार्थांविरुद्ध केंद्र सरकार, राज्यसरकारं आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन लढा देणं आवश्यक असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थविरोधी दलांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रसरकारने सुरु केलेली नशामुक्त भारत योजना देशातल्या ३७२ जिल्ह्यांमधे राबवण्यात येत असून सुमारे १० कोटी लोक आणि तीन लाख शैक्षणिक संस्था त्यात भाग घेत आहेत.

****

सेवा पर्व पंधरवड्याला उद्यापासून प्रारंभ होत आहे. सेवा पंधरवाड्यानिमित्त राज्यात भारतीय जनता पक्षातर्फे विविध ठिकाणी एक लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, मोदी विकास मॅरेथॉन, यासारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मुंबईत ही माहिती दिली.

सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवा पर्वानिमित्तच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात जागतिक सौर आघाडीच्या माध्यमातून भारताच्या जागतिक नेतृत्वाविषयी जाणून घेऊ.

हवामानविषयक उपाययोजनांपासून ते हरित ऊर्जेपर्यंत, भारतानं आपले राष्ट्रीय हित अग्रस्थानी ठेवून आंतरराष्ट्रीय चर्चा घडवून आणली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाने या प्रयत्नांना जबाबदारी आणि समावेशकता मिळवून दिली आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या माध्यमातून हवामान कृती प्रयत्नांमध्ये या भूमिकेचे प्रतिबिंब दिसून येतं. नोव्हेंबर २०१५ मध्ये पॅरिस इथं झालेल्या COP21 या हवामान बदलावरच्या जागतिक परिषदेत पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोइस ओलांद यांनी ISA चा शुभारंभ केला. १२० सदस्य देश असलेल्या ISA ची २०३० पर्यंत एक हजार अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक सौर गुंतवणूक करण्याचं उद्दिष्ट आहे. नवी दिल्ली इथं  आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या पहिल्या संमेलनाचं उद्घाटन करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जगासाठी आशेचा एक मोठा किरण म्हणून उदयास आल्याचं नमूद केलं होतं.

 

आज इंटरनॅशनल सोलर अलायंस दुनिया के लिये उम्मीद की एक बडी किरण बनके सामने आया है। मुझे लगता है, जब भी भविष्य में इकीसवी सदी मे स्थापित मानव कल्याण के बडे संघटनों की चर्चा होगी तो ISA का नाम उसमें सबसे उपर होगा।

 

अल्प विकसित देश, लहान देश यावर विशेष लक्ष केंद्रित करून, ISA किफायतशीर आणि परिवर्तनकारी ऊर्जा उपायांद्वारे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतानं सुरू केलेल्या 'एक सूर्य, एक जग, एक ग्रिड' या उपक्रमात जागतिक सौर ग्रिडची कल्पना आहे. दक्षिण आशियापासून आफ्रिका आणि युरोपपर्यंत सौर संसाधनं जोडणं हे याचं उद्दिष्ट आहे.

****

हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन उद्या साजरा होत आहे. मराठवाड्यात या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतिस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे, परभणी-पालकमंत्री मेघना बोर्डीकर, हिंगोली-पालक मंत्री नरहरी झिरवाळ, नांदेड-पालकमंत्री अतुल सावे, लातूर- पालकमंत्री शिवेंद्र राजे भोसले तर धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनार्इक यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार आहे.

 

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ होणार आहे.

 

मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौक इथं ‘परमवीर चक्र गॅलरी’ उभारण्यात आली आहे. याठिकाणी देशातल्या ‘परमवीर चक्र’ प्राप्त २१ वीरांचे छायाचित्र, त्यांच्या शौर्यकथांचा तपशील तसंच युद्ध प्रसंगांचे वर्णन दृश्यात्मक स्वरूपात सादर केलं जाणार आहे.

****

मराठवाड्याच्या विकासकामांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेल्या घोषणांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.

****

महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आलं. राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापुढे ही उपसमिती, मंत्रिमंडळ समिती म्हणून काम करेल.

मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांचा दैनंदिन निर्वाह भत्ता आणि विद्यार्थिनींच्या स्वच्छता-प्रसाधन भत्त्यात दुपटीनं वाढ करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला पुढच्या दोन वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली. राज्यभरात ११६ बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी आणि असलेल्या भवनांच्या दुरुस्तीसाठी एकंदर १३२ कोटी ४८ लाखांचा खर्च येणार आहे. तसंच विविध ठिकाणी ७९ नवीन शेतकरी भवनं उभारण्याचे प्रस्ताव आहेत.

****

वस्तू आणि सेवा कर परिषदेने नुकत्याच जीएसटी कररचनेत सुधारणा केल्या. यात नवीन आणि नवीकरणीय उर्जा क्षेत्राच्या वाढीसाठी या क्षेत्राशी संबंधित विविध सामग्रीवरच्या करात कपात करण्यात आली आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

केंद्र सरकारच्या स्वच्छ उर्जा उत्पादन धोरणाला आणखी मजबूत करण्यासाठी आणि अपारंपरिक उर्जास्रोतांच्या वापराला चालना देण्याच्या उद्देशाने वस्तू आणि सेवा कर परिषदेने जीएसटी दरात कपात केली आहे. यात सौर कुकर, बायोगॅस प्रकल्प, सौर उर्जा निर्मितीसाठीची उपकरणं, सौर विद्युत जनित्र, सौरपंप, पवनचक्की आणि पवनउर्जेवर चालणारी जनित्र, सौर दिवे, जलविद्युत निर्मिती उपकरणं आणि प्रकल्प यांवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के इतका खाली आणण्यात आला आहे. यामुळे या उपकरणांवरच्या खर्चात कपात होऊन पारंपरिक वीजनिर्मितीवरचा ताण कमी होईल, तसंच वीजदरही घटतील. सौरपंपामुळे शेतीच्या सिंचनावरच्या खर्चातही घट होणार आहे.

****

तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्यातील प्रमुख महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली. हा महोत्सव यंदा २२ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत साजरा होत आहे. या महोत्सवादरम्यान स्थानिक लोककला, गोंधळी गीत, भारुड, जाखडी नृत्य यांसारख्या पारंपरिक कलांचं सादरीकरण होईल. तसंच गोंधळ, भजन आणि कीर्तनाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातील, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं. नवरात्र संकल्पनेवर आधारित ३०० ड्रोनद्वारे साकारलेला भव्य लाईट शो हे या महोत्सवाचं प्रमुख आकर्षण असणार आहे.

****

मराठवाड्यातल्या विविध विकास कामांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेली मराठवाडा स्वाभिमान जागर यात्रा आज लातूर इथं पोहोचली. उद्या ही यात्रा बीड मार्गे छत्रपती संभाजीनगर इथं येऊन या मागण्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार आहे. 

****

बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे या मागणीसाठी आज हिंगोली जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तर लातूर जिल्ह्यात उदगीर इथं उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत, मागण्यांचं निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.

****

राज्यात आज विदर्भातले काही जिल्हे तसंच कोल्हापूर जिल्हा वगळता, संपूर्ण राज्यभरात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरात काल रात्री सुरू झालेला पाऊस आज दुपारपर्यंत सुरू होता. जिल्ह्यात सिल्लोड, कन्नड आणि लासूर स्टेशन परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.

परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

****

जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांबरोबरच काही ठिकाणी घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. जिल्ह्यात विविध घटनांमध्ये दोन महिला आणि एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 01.01.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 January 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती स...