Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 September
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
· नारीशक्ती हा देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार-स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन
· हैदराबाद मुक्ती दिवस सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा-गोदावरी
खोऱ्यातली पाण्याची तूट दूर करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
· बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
आणि
· मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला आजपासून प्रारंभ
****
नारीशक्ती हा देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार असल्याचं प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्यप्रदेशात धार इथं आज स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान आणि आठव्या राष्ट्रीय पोषण मासाचा प्रारंभ करतांना पंतप्रधान, बोलत होते. कुटुंबातली आई सुदृढ असेल, तर
संपूर्ण कुटुंब सुदृढ असतं, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं, ते म्हणाले -
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दोन ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या उपकम्रांतर्गत सर्व महिलांना
मोफत वैद्यकीय तपासणीची सुविधा आणि औषधं मिळणार आहेत. मध्यप्रदेशात आदि सेवा पर्व आणि
देशातल्या पहिल्या पीएम मित्र पार्कची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते झाली.
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष राष्ट्रीय अभियानाला
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्रात प्रारंभ झाला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री प्रतापराव जाधव या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दोन ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या
या अभियानात सर्व महिला आणि बालकांनी सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात
आलं आहे.
****
हैदराबाद मुक्ती दिवस आज साजरा होत आहे. यानिमित्तानं सर्वत्र
ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम घेण्यात आले. पंतप्रधानांनी आजच्या दिवशी तत्कालीन गृहमंत्री
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचं स्मरण केलं –
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
गोदावरी खोऱ्यातली पाण्याची तूट दूर करून मराठवाड्यात प्रत्येक
शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आज हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात
मुख्यमंत्र्याच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं, त्यावेळी
ते बोलत होते. राज्याच्या विविध नद्यांमधलं वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवलं
जाणार असून,
या कामाला पुढच्या सहा महिन्यात प्रत्यक्ष प्रारंभ होणार असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
मराठवाड्यात उद्योग, पाणी
पुरवठा,
रस्ते बांधणी आदी क्षेत्रात होणाऱ्या विकासकामांचा मुख्यमंत्र्यांनी
आढावा घेतला. त्यापूर्वी त्यांनी मुक्तीसंग्रामाचं प्रतीक असलेल्या हुतात्मा स्तंभाला
पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, खासदार कल्याण काळे, राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी, यांच्यासह
जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
****
बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते
ध्वजारोहण झालं. या स्वातंत्र्यलढ्यात प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीरांचं योगदान अमूल्य
असून,
त्यांचं स्मरण हेच आपल्या देशभक्तीचं बळ आहे, असं त्यांनी नमूद केलं. आरक्षणाच्या मुद्यावरून होणारी आंदोलनं आणि त्याअनुषंगाने
बोलतांना,
पवार यांनी, नागरिकांना एकोप्यानं राहण्याचं
आवाहन केलं. ते म्हणाले –
बाईट - पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री
अजित पवार
****
जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते, लातूर
इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे यांच्या हस्ते, नांदेड
इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते तर धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या
हस्ते ध्वजारोहण झालं. जिल्ह्याला आधुनिक, डिजिटल
आणि प्रगत करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचं, सरनाईक यांनी नमूद केलं. या वेळी प्रातिनिधिक स्वरुपात कुणबी जात प्रमाणपत्रांचं
वाटप करण्यात आलं.
****
परभणी इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण
करण्यात आलं. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांच्या प्रेरणेने जिल्ह्याच्या
सर्वांगिण प्रगतीसाठी आपण वाटचाल करुयात, असं त्या म्हणाल्या.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना तातडीने मदत केली जाईल, असं
आश्वासनही बोर्डीकर यांनी दिलं. त्या म्हणाल्या –
बाईट - मेघना बोर्डीकर, पालकमंत्री
****
बीड इथं आज परळी-बीड-अहिल्यानगर या रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं. बीडला रेल्वे आल्याने गोपीनाथ मुंडें
यांचं स्वप्न साकार झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. आपण सर्वजण बीड जिल्ह्याच्या
सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन आणि जिल्ह्याचा कायापालट करु, फडणवीस यांनी सांगितलं. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक
नेते उपस्थित होते.
****
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला आजपासून प्रारंभ झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानाचा
राज्यस्तरीय शुभारंभ केला. समृद्ध महाराष्ट्र घडवायचा असेल तर तो समृद्ध गावातूनच होऊ
शकतो,
समृद्ध राज्यासाठी विविध योजना सरकार राबवत असून, या योजनांच्या लाभापासून कोणतंही गाव वंचित राहू नये, यासाठी
हे अभियान राबवण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या सर्व २८
हजार ग्रामपंचायती मॉडेल ग्रामपंचायती करण्याचं उद्दीष्ट असून, यासाठी सात स्तंभ निश्चित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील कोक इथं पालकमंत्री मेघना
साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते या अभियानाला प्रारंभ करण्यात आला. गावाच्या विकासासाठी
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानात जिल्ह्यातील
ग्रामस्थांनी सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
नांदेड जिल्ह्यात पिंपळगांव इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्याहस्ते
या अभियानाला प्रारंभ झाला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गावस्तरावरील प्रत्येक नागरिकाने
यात सहभाग नोंदवावा, असं आवाहन सावे यांनी केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वयंभू नेते असल्याचं पत्रकार शेखर
गुप्ता यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्तानं ते बोलत होते.
बाईट – शेखर गुप्ता
****
भविष्यात जलसमृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित
प्रयत्न करुयात,
असं, आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण
विखे-पाटील यांनी केलं आहे. नदीजोड प्रकल्पा संदर्भात गुंतवणूकदारांशी चर्चा करण्यासाठी
मुंबई इथं आज झालेल्या चर्चासत्रात विखे-पाटील बोलत होते. या महत्वाकांक्षी प्रकल्पांत
तज्ज्ञ,
खाजगी भागीदार, वित्तीय संस्था तसच जनतेचा
सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचं विखे पाटील यांनी नमूद केलं.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात मोडस्के जंगलात आज
दुपारी झालेल्या पोलिस आणि नक्षलवादी चकमकीत दोन नक्षलवादी महिला ठार झाल्या. घटनास्थळावरुन
पोलिसांनी स्वयंचलित रायफलीसह मोठ्या प्रमाणावर दारुगोळा ताब्यात घेतला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची पालकमंत्री नरहरी झिरवाळ
यांनी आज पाहणी करून, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश
दिले. वसमत तालुक्यातल्या गुंडा इथं पुरात वाहून मृत्यू झालेल्या दोन महिला शेतकऱ्यांच्या
कुटुंबीयांची पालकमंत्री झिरवाळ यांनी भेट घेत सांत्वन केलं
****
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लागू केलेलं हैद्राबाद गॅझेट रद्द
करा,
या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं ओबीसी बांधवांनी
आज एल्गार मोर्चा काढला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रमुख उपस्थिती होती.
****
No comments:
Post a Comment