Thursday, 18 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 18 September 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात जीएसटी सुधारणांची घोषणा केली. त्यानुसात जीएसटी परिषदेनं कररचनेत महत्वाचे बदल केले आहेत. जीएसटी सुधारणांअंतर्गत, सरकारने वस्त्रोद्योगावरील करात लक्षणीय घट केली असून, सामान्य माणसावरील आर्थिक भार कमी झाला आहे. नवीन कर रचनेत मानवनिर्मित धाग्यांवरील जीएसटी दर १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. या निर्णयामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातला खर्च कमी होईल, ज्यामुळे मागणी वाढेल आणि निर्यात वाढेल अशी अपेक्षा आहे. तयार कपड्यांवरील जीएसटी देखील कमी करण्यात आला आहे. प्रति तुकडा अडीच हजार रुपयांपर्यंतच्या कापडांसाठी कर दर आता ५ टक्के करण्यात आला आहे, ज्यामुळे टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये मागणी वाढेल आणि श्रम-केंद्रित वस्त्रोद्योग युनिट्सना प्रोत्साहन मिळेल.

जीएसटी दरात कपात केल्याने लोकांची बचत लक्षणीयरीत्या वाढेल. अन्न, इलेक्ट्रॉनिक्स किंवा कापड असो, सर्वत्र जीएसटी दरांमध्ये काही बदल झाले आहेत. सरकारने कापडांवरील १२ टक्के जीएसटी ७ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. पॅकेजिंग साहित्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बॉक्स आणि कार्टन देखील १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे, या घटकांमुळे व्यापाऱ्यांना येणाऱ्या जीएसटी परताव्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात दूर होतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

२०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने वेगाने प्रगती होत असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं काल ग्लोबल कॉम्पिटन्स सेंटर-जीसीसी बिझनेस समिटमध्ये त्या बोलत होत्या. जीसीसी देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतील, विशाखापट्टणममध्ये जीसीसीच्या स्थापनेचं स्वागत करुन, त्यांनी हा एक सकारात्मक विकास असल्याचं नमूद केलं. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यावेळी उपस्थित होते.

****

सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत, नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत काल स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानात सहभागी स्वच्छता कामगारांचा विशेष सन्मान करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे यावेळी उपस्थित होते.

****

परभणी जिल्ह्यात सेलू आणि जिंतूर इथल्या कुणबी नोंदी सापडलेल्या प्राथमिक दहा जणांना पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते आज प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं. ज्यांच्या नोंदीचा सबळ पुरावा सापडल्या आहेत त्यांनाच कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल, आतापर्यंत जिल्ह्यात १३ हजार कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले असून, हैदराबाद गॅझेटमधल्या नोंदी सापडतील तसं जात प्रमाणपत्र वितरण करण्यात येईल, असं बोर्डीकर यावेळी म्हणाल्या.

****

परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातल्या हदगाव आणि कासापुरी मंडळात आज सकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली असून, सखल भागातल्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे.

दरम्यान, पाथरी मतदार संघाचे आमदार राजेश विटेकर यांनी मागील आठवड्यापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती, घरे आणि रस्त्यांची पाहणी केली. याबाबत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सरसकट मदत देण्याची मागणी केल्याची माहिती त्यांनी पत्रकाद्वारे दिली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बरकतपूर इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या भागांची आमदार संजना जाधव यांनी काल पाहणी केली. शेतातलं उभं पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून, जनावरांनाही फटका बसला आहे. या गंभीर परिस्थितीत प्रशासनाला तातडीने पंचनामे करून मदत करण्याच्या सूचना आमदार जाधव यांनी केल्या.

****

छत्रपती संभाजीनगर विमानतळावर काल, ‘यात्री सेवा दिवस’ साजरा करण्यात आला. प्रवासी-केंद्रित सेवांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणातर्फे हा दिवस साजरा करण्यात येतो. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर महाराष्ट्राची संस्कृती दाखवणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी येणाऱ्या प्रवाशांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं. विमानतळावरच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी एक पेड माँ के नामउपक्रमांतर्गत वृक्षारोपण केलं. 

****

पुण्याच्या मराठवाडा सेवक संघाच्या वतीनं देण्यात येणारे राज्यस्तरीय मराठवाडा सेवारत्न पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. धाराशिवचे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य देविदास पाठक यांना यावेळी या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

****

भारताचे भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि सचिन यादव आज जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणार आहेत. काल झालेल्या उपान्त्य फेरीत नीरजनं पहिल्याच प्रयत्नात ८४ पूर्णांक ८५ शतांश मीटर भाला फेकून अंतिम फेरी गाठली, तर सचिन यादव यानं ८३ पूर्णांक ६७ शतांश मीटर भाला फेकला.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज ग्रूप बी मध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे. सुपर फोर मध्ये जागा मिळवण्यासाठी अफगाणिस्तानच्या संघाला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. काल या स्पर्धेत पाकिस्ताननं संयुक्त अरब अमिरातीचा पराभव करुन भारतासोबत सुपर फोर मध्ये स्थान मिळवलं आहे.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اکتوبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 October-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبر...