Thursday, 18 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.09.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 18 September 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ सप्टेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      नारीशक्ती देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार, पंतप्रधानांचं प्रतिपादन, स्वस्थ नारी- सशक्त परिवार अभियान आणि आठव्या राष्ट्रीय पोषण महिन्याचा शुभारंभ

·      मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारच्या ठोस उपाययोजना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हैदराबाद मुक्ती दिवस कार्यक्रमात घोषणा

·      मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा आरंभ, जिल्हा बँकांमार्फत लाडक्या बहिणींना मिळणार एक लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज

·      ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचं निधन

आणि

·      मराठवाड्यात आज बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

****

नारीशक्ती हा देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल मध्यप्रदेशात धार इथं स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान आणि आठव्या राष्ट्रीय पोषण मासाचा प्रारंभ करतांना ते बोलत होते. कुटुंबातली आई सुदृढ असेल, तर संपूर्ण कुटुंब सुदृढ असतं, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं.

या अभियानाअंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिरं आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये एक लाखापेक्षा जास्त आरोग्य शिबिरं आयोजित केली जाणार आहेत. महिलांमध्ये आढळणारे ॲनिमिया, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोगासारख्या रोगांची तपासणी आणि निदान या शिबिरांमध्ये होईल, तसंच माता आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण आणि पोषणावर भर देण्याचाही या अभियानाचा उद्देश आहे.

मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्रात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत या अभियानाला प्रारंभ झाला.

****

हैदराबाद मुक्ती दिवस काल साजरा झाला. यानिमित्तानं सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम घेण्यात आले. पंतप्रधानांनी या अनुषंगाने तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचं स्मरण करून, हा दिवस साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले..

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

मराठवाड्यात सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी काल मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी, गोदावरी खोऱ्यातली पाण्याची तूट दूर करून मराठवाड्यात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याची ग्वाही दिली. राज्याच्या विविध नद्यांमधलं वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवलं जाणार असून, या कामाला पुढच्या सहा महिन्यात प्रत्यक्ष प्रारंभ होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मराठवाड्यात उद्योग, पाणी पुरवठा, रस्ते बांधणी आदी क्षेत्रात होणाऱ्या विकासकामांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, खासदार कल्याण काळे, राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी, यांच्यासह जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे, परभणी इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर, हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवळ, लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे तर धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.

****

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचं काल पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते.

मेहेंदळे यांनी गेली ५० वर्षे इतिहासाच्या संशोधन कार्याला स्वत:ला वाहून घेतलं होतं. शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्रजीमध्ये खूप मोठे ग्रंथ लिहिले आहेत, जे आज इतिहास क्षेत्रामध्ये जगप्रसिद्ध आहेत. फारसी, मोडी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन अशा विविध भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. सध्या ते इस्लामची ओळख आणि औरंगजेब या विषयावर संशोधन आणि लिखाण करत होते. १९७१ च्या युद्धात बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही सीमेवर युद्ध पत्रकार म्हणून ते हजर होते, आणि त्यांचा त्यावरही अभ्यास होता. शिवाजी झाला नसता तर, टिपू ॲज अ वॉर, शिवाजी लाईफ अँड टाईम, शिवचरित्र, मराठ्यांचे आरमार अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. मेहेंदळे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज भारत इतिहास संशोधक मंडळात ठेवण्यात येणार आहे.

****

बहुप्रतीक्षित बीड - अहिल्यानगर रेल्वेला कालपासून प्रारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवरांनी, बीड रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही रेल्वे अहिल्यानगरकडे रवाना झाली. या मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पुढच्या तीन ते चार महिन्यांत पूर्ण होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. याबाबत आमचे वार्ताहर रवी उबाळे यांचा हा विशेष वृत्तांत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलेल्या भाषणात सध्या सुरु असलेल्या पितृ पंधरवड्याच्या अनुषंगाने दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली ही रेल्वे सेवा, त्यांच्या स्मृतीला अर्पण करत असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले...

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. आपल्या भाषणात पवार यांनी हा दिवस बीड तसंच अहिल्यानगर या दोन्ही गावच्या नागरिकांसाठी स्वप्नपूर्तीचा क्षण असल्याचं सांगितलं. ते म्हणाले...

बाईट - उपमुख्यमंत्री अजित पवार

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केलेल्या भाषणात श्रेयवाद टाळण्याचं आवाहन केलं. त्या म्हणाल्या...

बाईट - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

खासदार बजरंग सोनवणे, रजनी पाटील, आमदार धनंजय मुंडे, आमदार नमिता मुंदडा, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य नागरिक हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.

****

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला कालपासून प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री तालुक्यात किनगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ केला. प्रत्येक गावात जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचं कर्ज देऊन शासन त्यांना आर्थिक पाठबळ देईल. त्यातून उद्योग व्यवसाय करुन त्या स्वावलंबी बनतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या कोक इथं पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते तर नांदेड जिल्ह्यात पिंपळगांव इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या अभियानाला प्रारंभ झाला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम’ आणि ‘नमो पर्यटन माहिती आणि सुविधा केंद्र’ पाच ठिकाणी उभारण्यात आले आहेत. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली.

****

हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी काल पाहणी करून, तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. वसमत तालुक्यातल्या गुंडा इथं पुरात वाहून मृत्यू झालेल्या दोन महिला शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेऊन सांत्वन केलं.

****

लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पूर परिस्थितीचा आढावा घेतला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, असं आश्वासन त्यांनी दिलं.

****

विभागात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातून सध्या नऊ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग सुरू आहे. इसापूर धरणातून १५ हजार, माजलगाव दहा हजार, तर विष्णुपुरी धरणातून सुमारे दीड लाख घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

****

हवामान

राज्यात आज खान्देश वगळता, बहुतांश भागात हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात जालना, परभणी तसंच हिंगोली वगळता सर्वच जिल्ह्यात आज जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे.

****

No comments: