Thursday, 18 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 18 September 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ सप्टेंबर २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून देशात कालपासून सेवा पंधरवड्याचा प्रारंभ करण्यात आला. महात्मा गांधी जयंतीपर्यंत म्हणजेच येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत देशभरात ठिकठिकाणी सेवा पंधरवड्यानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत. राज्यातल्या सेवा पंधरवड्याचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आला. सामान्य माणसाचं जीवन अधिक सुलभ करण्यासाठी सेवा हमी कायद्याअंतर्गत अकराशे सेवा येत्या एक मेपर्यंत डिजिटल पद्धतीनं उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार मेधा कुलकर्णी, अभिनेते नाना पाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

****

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरच्या मतपत्रिकांवर उमेदवारांचे आणखी मोठे आणि रंगीत फोटो लावायचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. निवडणूक नियमांअंतर्गत येणाऱ्या दिशानिर्देशांमध्ये आयोगानं सुधारणा केल्या आहेत. सुधारित ईव्हीएम मतपत्रिका बिहार विधानसभा निवडणुकीपासून पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये वापरल्या जातील, अशी माहिती आयोगानं दिली आहे. जास्तीत जास्त १५ उमेदवारांची नावं एका मतपत्रिकेवर असावीत आणि सर्वात शेवटच्या नावानंतर नोटा हा पर्याय असावा, अशा सूचना आयोगानं केल्या आहेत.

****

छत्तीसगच्या बिजापूर जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत काल दोन नक्षलवादी मारले गेले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी काही दारुगोळा आणि शस्त्र जप्त केली आहेत. नारायणपूर जिल्ह्यात काल १२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून सुकमा जिल्ह्यात पोलिसांनी ४ नक्षलवाद्यांना अटक केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात मोडस्के जंगलात काल दुपारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन नक्षली महिलांना ठार केलं.

****

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजाननराव मेहेंदळे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.  मेहेंदळे यांचं लेखन हे प्रामुख्याने शिवरायांच्या युद्धशास्त्रावर आधारित होतं, शिवचरित्र इंग्रजीत लिहून त्यांनी दिलेलं योगदान निश्चितच मोठं असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मेहेंदळे यांचं काल पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज पुण्यात अंत्यदर्शन करण्यात येणार आहे.

****

भविष्यात जलसमृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलं आहे. नदीजोड प्रकल्पासंदर्भात काल मुंबईत गुंतवणूकदारांसोबत झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. या महत्त्वकांक्षी प्रकल्पांत तज्ज्ञ, खाजगी भागीदार, वित्तीय संस्था तसच जनतेचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचं विखे पाटील यांनी नमूद केलं.

****

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात अतिवृष्टीमुळे शेतातलं पीक देखील हातातून गेल्यामुळे, बळीराजा अडचणीत आला आहे. म्हणून राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

****

राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातला अहवाल पाच डिसेंबरपर्यंत सादर करण्याचा मानस असल्याचं समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी काल मुंबईत सांगितलं. त्रिभाषा सुत्र समितीद्वारे वेबसाईट आणि विशेष लिंक तयार करण्यात येणार आहे, त्यावर त्रिभाषा धोरणा संदर्भात मत मांडता येईल, असं ते म्हणाले. राज्यातल्या आठ शहरात जाऊन स्थानिकांच्या तसंच राजकीय नेत्यांची भेटीही घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

 

 

छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकातल्या राणी लक्ष्मीबाई उद्यानात ‘परमवीर चक्र गॅलरी’चं लोकार्पण काल महापालिकेचे प्रशासन तथा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते झालं. या चित्रप्रदर्शनातून सैनिकांच्या शौर्य, पराक्रम आणि बलिदानाचं प्रेरणादायी दर्शन होणार आहे.

****

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी लागू केलेले हैद्राबाद गॅझेट रद्द करा, या प्रमुख मागणीसाठी ओबीसी बांधवांनी काल हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं भव्य एल्गार मोर्चा काढला. ओबीसींवर होणार अन्याय सहन केला जाणार नाही, आरक्षणाबाबत कुणाचीही अरेरावी सहन केली जाणार नाही, असा इशारा ओबीसी नेत्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, सोलापूर इथं काल बंजारा समाजाच्या वतीने अनुसूचित जमातीचे दाखले तसंच सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. 

****

भारताचे भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि सचिन यादव यांनी जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. नीरजनं पहिल्याच प्रयत्नात ८४ पूर्णांक ८५ शतांश मीटर भाला फेकला आणि तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. सचिन यादव यानं ८३ पूर्णांक ६७ शतांश मीटर भाला फेकून अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं. स्पर्धेची अंतिम फेरी आज होणार आहे.

****

No comments: