Wednesday, 24 September 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 24.09.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 24 September 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ सप्टेंबर २०२ सकाळी.०० वाजता

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील आज मराठवाडा दौऱ्यावर असून, ते धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

दरम्यान, पवार यांनी आज सकाळी सोलापूर जिल्ह्यात वीट या गावात पूर परिस्थितीची पाहणी केली. शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये, शक्य ती सर्व मदत सरकार करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. प्रशासनाला तातडीनं मदतकार्य राबवण्याचे आणि नुकसानभरपाईसाठी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यातल्या गोळेगाव इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकसानीची पाहणी केली. गोळेगावात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे गावातल्या नागरिकांना लोणी या गावात स्थलांतरित करण्यात आलं.

****

मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागात पूर परिस्थिती कायम असून, प्रशासनाकडून बचावकार्य करण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आलेल्या महापुरामध्ये कन्नड तालुक्यात एक शेतकरी काल वाहून गेला. तर वैजापूर तालुक्यात ढेकू नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याला गावातल्या तरुणाच्या सतर्कतेने वाचवण्यात यश आलं.

****

विभागातले जवळपास सर्वच जलप्रकल्प पूर्ण भरले असून, मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे.

नांदेडमध्ये विष्णुपुरी प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडण्यात आले असून, सुमारे अडीच लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं विसर्ग केला जात आहे. परिणामी नांदेड शहरातल्या अनेक सखल भागात पाणी शिरलं आहे. गोदावरी काठच्या शंभरहून अधिक कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. नांदेडमध्ये महापालिकेने आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत स्थलांतरणाची संपूर्ण तयारी ठेवली असल्याची माहिती आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. जिल्ह्यात ग्रामीण भागातही गोदावरी काठच्या अनेक गावातली पिकं पाण्याखाली गेली आहेत.

**

माजलगाव धरणातून २१ हजार ७०४, सिना कोळेगाव प्रकल्पातून ६४ हजार ७००, तेरणा मध्यम प्रकल्पातून २२ हजार ६२१, तर येलदरी धरणातून २७ हजार ९९० दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

**

पैठणच्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९८ पूर्णांक ९० टक्के इतका झाला आहे. धरणात सध्या ६६ हजार ७६९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु असून, विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या धरणातून १८ हजार ८६४ दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

****

अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यभरात सुमारे १४३ लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ५० हजार रुपये तातडीनं द्यावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल केली. राज्य सरकार पोकळ आश्वासनं देत असल्याची टीका त्यांनी केली.

****

विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांच्या दाव्यापोटी मिळणाऱ्या रक्कमेचा विनियोग राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या राखीव निधीसाठी केला जाणार आहे. गरजू रुग्णांसाठी, पाच लाखांपेक्षा जास्त खर्च असणाऱ्या नऊ प्रकारच्या दुर्मिळ आजारांवरील खर्च या राखीव निधीतून करण्याच्या प्रस्तावाला काल राज्य मंत्रिमंडळानं मंजूरी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक रोड शाखेला कार्यालयासाठी सवलतीच्या दरात भूखंड देणं, सोलापुरात कुंभारी इथं बांधण्यात आलेल्या विडी कामगारांच्या घरांच्या जागेवरील नोंदणी शुल्क आणि गृहनिर्माण संस्थेतील घरांवरील मुद्रांक शुल्कात सवलत देणं यासह अन्य काही प्रस्तावांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

****

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या वाशिम इथल्या कांरजालाड आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर इंटरचेंज इथले सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहे. राज्यभरात द्रुतगती मार्गाच्या निर्मिती बरोबर आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ सौरऊर्जा ‍निर्मितीसाठी देखील ओळखलं जाणार आहे. सौरऊर्जा निर्मितीमुळे समृद्धी महामार्ग हा देशातला पहिलाच पथदर्शी प्रकल्प ठरला आहे. सौरऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून कार्बन क्रेडिट हे देखील महामंडळांच्या खात्यात जमा होणार असून, हा लाभ पायाभूत प्रकल्पासाठी कर्ज घेण्यासाठी होईल, असं महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक मनुज जिंदल यांनी संगितलं.

****

कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिंधुदुर्ग जिल्ह्यानं तयार केलेलं एआय सिंधुदुर्ग मॉडेल, आता राष्ट्रीय पातळीवर स्वीकारलं जाणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात नीती आयोगाचे सदस्य जिल्ह्याला भेट देऊन इथं विकसित करण्यात आलेल्या कृत्रिम बुध्दीमत्तेवर आधारित प्रारुपाचा प्रत्यक्ष अभ्यास करणार आहेत.

****

नांदेड शहरात मगनपुरा भागात दोघाजणांकडून पाचशे रुपयांच्या २६७ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून एक लाख ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

****

No comments: