Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 25 September 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ सप्टेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट मदत -नुकसानीच्या पाहणीनंतर
मुख्यमंत्र्यांची घोषणा
·
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह विविध
मंत्र्यांकडून मराठवाड्यात नुकसानीची पाहणी
·
नांदेड इथल्या विष्णुपुरी प्रकल्पातून मोठा विसर्ग, शहरातल्या
अनेक सखल भागात पाणी शिरलं
आणि
·
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशचा पराभव करत भारत
अंतिम फेरीत
****
अतिवृष्टीग्रस्तांना
सरसकट मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. काल लातूर तसंच
सोलापूर इथल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर, ते बोलत होते.
राज्य शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या पाठीशी असून नागरिकांना सर्वोतोपरी मदत केली
जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. टंचाईच्या वेळी केल्या जाणाऱ्या सर्व उपाययोजना
राबवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पंचनाम्यांसाठी
ज्या ठिकाणी पोहोचणं शक्य नाही, अशा ठिकाणी ड्रोनद्वारे केलेले पंचनामे
ग्राह्य धरण्यात येतील, मोबाईलवरील फोटोही स्वीकारण्यात येतील,
असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, तेरणा आणि
मांजरा नदीच्या संगमावर असलेल्या औराद शहाजानी इथल्या नुकसानग्रस्त भागाचीही मुख्यमंत्र्यांनी
पाहणी केली. याठिकाणी पूर संरक्षक भिंत बांधण्यात येईल, तसंच
जुन्या बॅरेजसला आधुनिक पद्धतीचे दरवाजे बसवण्यात येतील, असंही
त्यांनी सांगितलं.
**
दरम्यान, राज्यात अतिवृष्टीमुळे
बाधित झालेल्या भागात नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुखयमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री आणि
इतर मंत्र्याचे दौरे सुरु झाले आहेत. मराठवाडा, सोलापूर,
अहिल्यानगर इथं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे
शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं.
**
उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यात नुकसानीची पाहणी केली. तत्काळ पंचनामे
करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला यावेळी दिले. सोलापूर जिल्ह्यात
करमाळा, माढा, मोहोळ या भागांत देखील पवार यांनी
पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. करमाळा इथल्या तात्पुरत्या पुनर्वसन केंद्राला भेट
देऊन, तिथल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.
**
उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी काल धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या पुरबाधित करंजा गावाच्या
शिंदेवस्ती आणि करळेवस्तीला भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली, तसंच नागरिकांना
मदतीबाबत आश्वस्त केलं. यावेळी आपत्तीग्रस्तांना आवश्यक साहित्याचं, तर अनेक कुटुंबांना किराणा साहित्याचं वितरण करण्यात आलं.
**
जालना जिल्ह्यात
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातल्या शेत शिवाराची काल कृषीमंत्री दत्तात्रय
भरणे यांनी पाहणी केली. एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असं सांगतानाच
तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला
दिले.
****
राज्याच्या
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी काल बीड जिल्ह्याच्या गेवाराई तालुक्यात शेतीच्या
नुकसानाची पाहणी करून, बाधीतांना तात्काळ मदतीचं आश्वासन दिलं. परभणीच्या पालकमंत्री
मेघना बोर्डीकर यांनीही जिल्ह्यात पूरग्रस्त भागात पाहणी करून आपदग्रस्तांना धीर दिला.
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यात इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे
यांनी, तर गंगापूर तसंच खुलताबाद तालुक्यात झालेल्या नुकसानाची आमदार
प्रशांत बंब यांनी काल पाहणी करून नुकसानग्रस्तांना दिलासा दिला.
****
शिवसेना
तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्री तसंच आमदारांनी, मराठवाड्यातल्या
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी आपलं एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री निधीस देण्याचा
निर्णय घेतला आहे.
****
नांदेड
इथल्या विष्णुपुरी प्रकल्पातून होत असलेला पाण्याचा मोठ्या प्रमाणातल्या विसर्गामुळे
गोदावरी नदीला पूर आला आहे. प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या सुमारे
अडीच लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी नदीपात्रात पाणी सोडलं जात असून शहरातल्या अनेक
सखल भागात पाणी शिरलं आहे. शेख मिन्हाज शेख साजिद या सोळा वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून
मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला.
****
लातूर तालुक्यातल्या
सारसा या गावात मांजरा नदीच्या पुरात विविध ठिकाणी अडकलेल्या २५ नागरिकांची यशस्वी
सुटका करण्यात आली. स्थानिक शोध आणि बचाव पथकाद्वारे ही मोहिम राबवण्यात आली. लातूर
तालुक्यातील महापूर इथंही एक वृद्ध व्यक्ती मांजरा नदीच्या पुरात अडकले होते. त्यांचीही
सुटका करण्यात आली.
****
ज्येष्ठ
साहित्यिक पद्मभूषण एस. एल. भैरप्पा यांचं काल म्हैसूर इथं निधन झालं, ते ९४ वर्षांचे
होते. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार तसंच साहित्य अकादमी फेलोशीपसह विविध पुरस्कारांनी
गौरवण्यात आलं होतं. भैरप्पा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं.
****
सेवा आणि
सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार
परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स
एक्सलन्स - iDEX द्वारे सरकार देशाच्या संरक्षण नवोपक्रम परिसंस्थेला बळकटी
देतआहे. सेवापर्व निमित्तच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात त्याविषयी जाणून घेऊ.
पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं
गेल्या ११ वर्षात संरक्षण क्षेत्रातील नवोपक्रमावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे.
इनोव्हेशन्स फॉर डिफेन्स एक्सलन्स अर्थात आयडेक्स हा उपक्रम
एप्रिल २०१८ मध्ये सुरू करण्यात आला.
नवोपक्रमाला चालना देणारी परिसंस्था तयार करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
संशोधन आणि विकास संस्था, शैक्षणिक संस्था, उद्योग, स्टार्टअप्स
आणि अगदी वैयक्तिक नवोपक्रमकांना यात सहभागी
करून संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान विकासाला प्रोत्साहन दिला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाची सुरुवात करताना यासाठी
सरकारच्या पाठिंब्याचे महत्त्व अधोरेखित केले होते.
बाईट - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
सुक्ष्म, लघु आणि
मध्यम उद्योग, स्टार्टअप्स, वैयक्तिक
नवोन्मेषक, संशोधन आणि विकास संस्था आणि शैक्षणिक संस्थांना
सहभागी करून, आयडेक्सने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी दीड कोटी
रुपयांपर्यंतचे अनुदान दिलं आहे. या
उपक्रमाला बळकटी देत, सशस्त्र दलांनी
आयडेक्स-समर्थित स्टार्टअप्स आणि एमएसएमईकडून २४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची
संरक्षण उत्पादनं खरेदी केली आहेत.
गेल्या काही वर्षांत
झालेल्या बदलांमुळे देशात एक नाविन्यपूर्ण
संस्कृती निर्माण झाली आहे आणि देश
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने
वेगानं वाटचाल करत आहे.
****
केंद्र
सरकारने गेल्या ११ वर्षांत पायाभूत सुविधा क्षेत्राचा मोठा विकास केला. सामान्य नागरिकांना
याचा मोठा लाभ होत असल्याचं, ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी म्हटलं
आहे...
बाईट
- राम भोगले
भोगले यांनी
या विषयाचं केलेलं सविस्तर विवेचन, सेवापर्व निमित्त आकाशवाणीच्या विशेष
प्रासंगिक या कार्यक्रमात आज सकाळी ११ वाजून ०५ मिनिटांनी आपण ऐकू शकता.
****
सेवा पर्व
उपक्रमाच्या अनुषंगाने 'एक दिवस, एक तास, एक
साथ,' या श्रमदान उपक्रमात आज महाश्रमदान अभियानाचं नियोजन देशभरात
करण्यात आलं आहे. अतिवृष्टीमुळे साथ रोग पसरण्याची शक्यता असलेले पिण्याच्या पाण्याचे
स्त्रोत तसंच सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता होणं आवश्यक आहे. अशा ठिकाणी श्रमदानातून
स्वच्छता करण्यासाठी सहभाग घेण्याचं आवाहन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
जितीन रहमान यांनी केलं आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं जिल्हा रुग्णालयात नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियानाला काल प्रारंभ
झाला. पहिल्याच दिवशी ४० हून अधिक नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली.
****
आशिया चषक
क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर मधल्या दुसर्या सामन्यात भारताने बांग्लादेशवर ४१ धावांनी
विजय मिळवत, अंतिम फेरीत धडक मारली. काल झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत
भारतीय संघाने निर्धारित षटकात सहा बाद १६८ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेला बांग्लादेशचा
संघ १२७ धावाच करु शकला. ७५ धावा करणारा अभिषेक शर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी
ठरला. आज या स्पर्धेत बांग्लादेश आणि पाकिस्तानदरम्यान सामना होणार असून, विजेता संघ अंतिम फेरीत भारतासोबत खेळणार आहे.
****
धनगर समाजाला
अनुस्यचित जाती प्रवर्गात आरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी काल जालन्यात धनगर समाजाच्या
वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो धनगर समाज बांधव सहभागी झाले होते.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं काल नियमभंग करणाऱ्या सुमारे ३६७ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली, तर २६ रिक्षा
जप्त करण्यात आल्या. या सर्व रिक्षाचालकांना तीन लाख ८४ हजार रुपये दंड ठोठावण्यात
आला.
****
No comments:
Post a Comment