Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 01 November
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०१ नोव्हेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, मध्य प्रदेश, पंजाब आणि पुदुच्चेरी राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त तिथल्या जनतेस शुभेच्छा
दिल्या आहेत. सर्व राज्यांनी देशाच्या प्रगतीत उल्लेखनीय योगदान दिलं असून, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विकास यात्रेत सातत्याने
नवे कीर्तिमान प्रस्थापित व्हावेत, अशी इच्छा मुर्मू यांनी व्यक्त केली. राष्ट्रपतींनी या सर्व राज्यांतील रहिवाशांच्या
चिर समृद्धी आणि कल्याणासाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही
छत्तीसगड, आंध्र प्रदेश सहित सर्व
राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगढ़च्या दौऱ्यावर जाणार
असून, राज्याच्या २५व्या स्थापना
दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. रायपूर इथं रस्ते, उद्योग, आरोग्यसेवा आणि ऊर्जा क्षेत्रातील
१४ हजार २६० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या
हस्ते होणार आहे. 'दिल की बात' या योजनेअंतर्गत ते सत्यसाईं
संजीवनी रुग्णालयात जन्मजात हृदय रोगातून बरे
झालेल्या सुमारे अडीच हजार मुलांशी मोदी संवाद साधतील. ब्रह्माकुमारी या अध्यात्मिक
पंथाच्या शांती शिखर या आध्यात्मिक, शांती आणि ध्यान केंद्राचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होईल. ते रायपूरमधील
छत्तीसगढ़ विधानसभेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करणार असून परिसरात उभारण्यात आलेल्या
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मारकाचं उद्घाटनह करणार आहे.
****
भारत आसियान आणि इतर देशांसोबतच्या संरक्षण सहकार्याकडे
आपण प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि क्षमतावृद्धीमध्ये योगदान म्हणून पाहतो, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते मलेशियातील क्वालालंपूर
इथं होत असलेल्या १२व्या आसियान संरक्षण मंत्री बैठकीत बोलत होते. एडीएमएम-प्लस हा भारताच्या ॲक्ट इस्ट पॉलिसीच्या
व्यापक इंडो-पॅसिफिक दृष्टीकोनाचा अविभाज्य भाग आहे. भारताचा इंडो-पॅसिफिक सुरक्षा
दृष्टीकोन संरक्षण सहकार्याला आर्थिक विकास, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि मानवी संसाधन विकासाशी जोडतो, असं त्यांनी अधोरेखित केलं.
****
पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेचा उठाव दडपण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून मानवी
हक्कांचे उल्लंघन होत आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे, असे सांगत पाकव्याप्त काश्मीरमधील मानवी हक्कांचे उल्लंघन
थांबवण्याची मागणी भारताने केली आहे. संयुक्त राष्ट्र महासभेतील भारताच्या संयुक्त
राष्ट्र मिशनच्या सचिव भाविका मंगलनंदन म्हणाल्या की, गेल्या काही आठवड्यातच, पाकिस्तानी सैन्य आणि इतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पाकव्याप्त
काश्मीरच्या काही भागात त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी निदर्शने
करणाऱ्या अनेक निष्पाप नागरिकांना ठार मारले.
****
मराठी आणि इंग्रजी या भाषा पहिलीपासून आणि हिंदी पाचवीपासून
शिकवण्याची सध्या सुरू असलेली पद्धतच कायम राहावी, असं मत रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर व्यक्त झालं, अशी माहिती त्रिभाषा धोरण समितीचे
अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी दिली. ते काल रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
हिंदी भाषेच्या सक्तीवरून झालेल्या गदारोळानंतर नेमण्यात आलेल्या त्रिभाषा धोरण समितीने
आज रत्नागिरीत विविध क्षेत्रांतल्या नागरिकांची या विषयावरची मतं जाणून घेतली. केवळ
एका ठिकाणी बसून अहवाल तयार करण्यापेक्षा तो सर्वसमावेशक होण्यासाठी राज्यात आठ ठिकाणी
फिरून, विविध स्तरांतल्या नागरिकांच्या
भावना आम्ही जाणून घेत आहोत, असे जाधव म्हणाले.
****
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीचे
अर्ज नियमानुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पध्दतीने स्वीकारण्यात येत आहेत. विभागीय
आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी सूचना दिल्या
आहेत.
****
राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक
बदल घडवून आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असं महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी
आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी म्हटलं आहे. ते काल जळगाव इथं बोलत
होते. सफाई कर्मचाऱ्यांना सर्व मूलभूत सुविधा, आरोग्य सुविधा, गट विमा, आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचे निर्देश दिल्याचं त्यांनी सांगितलं.
****
फलटण इथं झालेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाच्या
चौकशीसाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी पोलिस महासंचालकांना यासंबंधीचे आदेश दिले आहेत.
****
महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत आणि
दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होणार आहे. भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभूत
करीत यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य सामन्यात
ऑस्ट्रेलियानं दिलेलं ३३९ धावांचा आव्हान पार करीत भारतीय महिला संघानं विक्रमी विजय
मिळविला. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना अद्याप विजेतेपद मिळालेले नाही.
त्यामुळे यंदा प्रथमच एका नव्या संघाच्या हातील महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा ट्रॉफी
जाणार आहे.
****
राज्यात आज मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी
पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
****
No comments:
Post a Comment