Sunday, 2 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 02.11.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 02 November 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्यातल्या प्रत्येक नागरीकाच्या जीवनात सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस येवो - उपमुख्यमंत्री शिंदे यांचं विठुरायाकडे साकडं; कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये शासकीय महापूजा

·      केंद्र सरकारच्या हमीभाव योजनेंतर्गत मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीला राज्यात येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार

·      मतदार याद्यांमधल्या त्रुटी दूर करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा

आणि

·      महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदासाठी आज भारत - दक्षिण आफ्रिका लढत

****

राज्यातल्या प्रत्येक नागरीकाच्या जीवनात सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस येवो, असं साकडं विठुरायाकडे घातल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. कार्तिकी एकादशीनिमित्त आज पहाटे पंढरपूर इथं विठ्ठल - रुख्मिणीची शासकीय महापूजा शिंदे यांच्या हस्ते झाली, त्यानंतर ते बोलत होते.

बाईट - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

नोव्हेंबर महिन्यात सुद्धा पाऊस पडत असून, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभं असून, त्यांना सर्वप्रकारे मदत केली जाईल, असं आश्वासन शिंदे यांनी दिलं.

 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या पुढाकाराने पर्यावरण जनजागृतीसाठी गेल्या १७ वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या 'कार्तिकीची वारी, पंढरीच्या दारी' या विशेष कार्यक्रमाचा समारोप काल पंढरपुरात शिंदे यांच्या उपस्थिती करण्यात आला. हा अनोखा उपक्रम वारीपुरता मर्यादित न ठेवता वर्षभर राबवावा अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी, पर्यावरण रक्षणाचं महत्व अधोरेखित केलं.

**

दरम्यान, कार्तिकी एकादशीनिमित्त राज्यभरातल्या विठ्ठल मंदीरांमध्ये आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजीनगरनजीक वाळूज महानगरातल्या पंढरपूरच्या विठ्ठल - रुख्मिणी मंदिरात आज पहाटे आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यात्रेमुळे पंढरपूर गजबजलं असून, मंदिराजवळ अनेक दुकानं थाटण्यात आली आहेत.

****

२२ सप्टेंबर रोजी वस्तू आणि सेवा दरात केलेल्या सुधारणेनंतर, ऑक्टोबर २०२४ च्या तुलनेत गेल्या महिन्यात जीएसटी संकलनात चार पूर्णांक सहा टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली. ऑक्टोबर महिन्यात १ लाख ९५ कोटी रुपये जीएसटी संकलन झालं. तर केंद्र सरकार आणि राज्यांचं एकात्मिक आयजीएसटी संकलन एक लाख सहा हजार ४४३ कोटी रुपये आणि उपकर संकलन ७ हजार ८१२ कोटी रुपये इतकं झालं आहे.

****

केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मूग, उडीद आणि सोयाबीन पिकांच्या खरेदीला येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ॲपद्वारे किंवा खरेदी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली असून, ३१ डिसेंबर पर्यंत ही नोंदणी करता येणार आहे. शेतकऱ्यांनी नजीकच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी कागदपत्रांसह अर्ज करावा आणि नाफेडच्या धान्य खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे.

****

राज्य सरकारनं कुष्ठरोगाला ‘नोटिफायबल डिसीज’ म्हणजेच अधिसूचित घोषित केलं आहे. कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. कुष्ठरोगाचं निदान झालेल्या सर्व रुग्णांची नोंद दोन आठवड्यांच्या आत संबंधित जिल्हा आरोग्य कार्यालय, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा, कुष्ठरोग आणि स्थानिक नागरी आरोग्य अधिकाऱ्यांकडे करणं सर्व डॉक्टर आणि आरोग्य संस्थांसाठी बंधनकारक करण्यात आलं आहे. राज्यात सप्टेंबर अखेरपर्यंत सात हजार ८६३ नव्या कुष्ठरुग्णांची नोंद झाली असून, १३ हजार १० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७ नोव्हेंबर ते दोन डिसेंबर २०२५ या काळात “कुष्ठरुग्ण शोध अभियान” राबवण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. या अभियानात महानगरपालिका आणि तालुकास्तरीय शाळा-महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा, कुष्ठरोगाची लक्षणं, मोफत उपचार आणि समज-गैरसमज याबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी अभय धानोरकर यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली. ते म्हणाले,

बाईट - जिल्हा आरोग्य अधिकारी अभय धानोरकर

****

महाविकास आघाडीनं काल मतचोरी आणि मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत मुंबईत सत्याचा मोर्चा काढला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. याशिवाय डाव्या पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांसह आघाडीतल्या पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. सदोष मतदार याद्यांची दुरुस्ती झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे. दरम्यान, हा मोर्चा सत्याचा नव्हे तर सत्तेसाठीचा आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षानं केली.

****

भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्रातल्या प्रादेशिक कार्यालयानं ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ‘खुला बाजार विक्री योजने’ अंतर्गत तांदळाची विक्री सुरू केली आहे. खरेदीदारांनी ई-लिलावात बोली लावावी, असं आवाहन महामंडळाने केलं आहे. येत्या सहा आणि सात नोव्हेंबर रोजी तांदळाचा ई-लिलाव होणार असून, यासाठी एकूण १० हजार मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध केला जाईल असं यात म्हटलं आहे. अन्नधान्याच्या वाढत्या बाजारभावांवर नियंत्रण ठेवणं आणि खुल्या बाजारात पुरेशी उपलब्धता निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणं, हे ‘खुला बाजार विक्री’ योजनेचं उद्दिष्ट आहे.

****

६७ व्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं उद्घाटन आज मुंबईत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि शास्त्रीय गायक पंडित अरुण कशाळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. कोविड काळात खंड पडलेल्या या कार्यक्रमाला पुन्हा प्रारंभ होत आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पद्मश्री पंडित वेंकटेश कुमार आणि प्रसिद्ध भारूड कलाकार हामिद अमीन सय्यद आणि त्यांचं पथक आज आपली कला सादर करतील. २९ नोव्हेंबरपर्यंत देशभरातल्या २४ आकाशवाणी केंद्रांवर हा कार्यक्रम होणार आहे. 

****

शासकीय योजनांच्या माध्यमातून इतर मागास संवर्गातल्या सर्व समुहांच्या आर्थिक विकासासाठी कटीबद्ध असल्याचं प्रतिपादन इतर मागास वर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं महाज्योतीच्या वतीनं घेण्यात आलेल्या कर्ज वाटप आणि स्वयंरोजगार मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यात विविध मंडळांतर्फे १८० जणांना थेट कर्ज, तर ५८५ जणांना कर्ज परताव्याचा लाभ देण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभ वितरीत करण्यात आले.

****

नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी पावसाचं पाणी शेत जमीनीत मुरावं या उद्देशाने “जलतारा” जनचळवळ राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. सतत बदलणारं हवामान, अनियमित पाऊस आणि बदललेली भौगोलिक परिस्थिती यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही चळवळ राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या अनुषंगानं घेण्यात आलेल्या कार्यशाळेत ग्रामपंचायत आणि कृषी विभागाच्या समन्वयातून मार्च २०२६ पर्यंत एक लाख जलतारे पूर्ण करण्याचे निर्देश कर्डीले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अन्न आणि औषध विभागानं गेल्या दोन महिन्यांत केलेल्या कारवाईत सुमारे ४२ हजार किलो पेक्षा अधिक भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त केला आहे. यासोबतच भेसळयुक्त भगर, मिरची पावडर, मसाले अशा पदार्थांचे साठेही जप्त करण्यात आले. या मालाची किंमत सुमारे ९२ लाख रुपयांहून अधिक असल्याची माहिती, अन्न आणि औषध प्रशासन विभागानं दिली.

****

बीड इथं काल राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन झालं. बीड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॅन्सन, पोलिस अधिक्षक नवनित कॉवत, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विक्रम काळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

****

क्रिकेट

महिला विश्वचषक स्पर्धेत विजेतेपदासाठी आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होणार आहे. नवी मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर दुपारी तीन वाजता हा सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी अद्याप या स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं नाही.

**

हवामान

पुढील दोन दिवस संपूर्ण कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

****

No comments: