Monday, 3 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 03.11.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 03 November 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ नोव्हेंबर २०२ सकाळी.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद २०२५चं उद्घाटन करण्यात आलं. देशात नवोपक्रमाची आधुनिक परिसंस्था भरभराटीला यावी यासाठी सरकार संशोधन सुलभतेवर लक्ष केंद्रित करत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक राहिलेला नाही, तर तंत्रज्ञानाद्वारे परिवर्तनाचा प्रणेता बनला असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या दशकात संशोधन आणि विकासाला सरकारनं प्राधान्य दिलं आहे. त्यासाठीच्या निधीतही भरघोस वाढ केल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशातील स्टार्टअप, सेमीकंडक्टर आणि हरित उर्जा क्षेत्रात देशानं गेल्या दशकात मोठी प्रगती केल्याचं पंतप्रधान म्हणाले.

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्रसिंग यांची याप्रसंगी उपस्थिती होती. देशातल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी एक लाख कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या संशोधन, विकास आणि नवोन्मेष योजना निधीचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला. शिक्षण तज्ज्ञ, संशोधन संस्था, उद्योग आणि सरकार मधल्या तीन हजारापेक्षा जास्त सहभागींना एकत्र आणणं हे या तीन दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देहरादून इथं उत्तराखंड विधानसभेच्या दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. राज्याच्या स्थापनेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. तसंच नैनिताल राजभवनाला १२५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी होणार आहेत.

****

विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ५१ कोटी रुपयांचं रोख पारितोषक जाहीर केलं आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी ही माहिती दिली. भारतीय महिला संघाच्या कामगिरीबद्दल देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विजेतेपदाबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिला संघानं काल पहिलं विश्वविजेतेपद पटकावलं.

****

बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचा प्रचार दोन दिवसांनी संपणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पाटणा इथं, गृहमंत्री अमित शहा यांनी वैशाली जिल्ह्यात महुआ इथं प्रचारसभा घेतली. तर मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी सहारसा इथं आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खगरिया इथं प्रचार सभा घेतली. पहिल्या टप्प्यात १२१ मतदारसंघांसाठी ६ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

****

सांगली जिल्ह्यातल्या तोरणा भुईकोट किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन काल माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झालं. यासाठी शासनानं १३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या आराखड्यात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, राजवाडा आणि त्यांच्या जीवनप्रवासाचे चित्रशिल्प यांचा समावेश आहे.

****

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते काल मुंबई इथं 'खासदार क्रीडा महोत्सव २०२५' चं उद्धाटन झालं. या महोत्सवात पाचशे क्रीडापटू कबड्डी, खो-खो, मल्लखांब, कुस्ती, फुटबॉल, ढोल-ताशा यासारख्या २७ खेळांमध्ये सहभागी होणार आहेत.   

****

संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा येत्या १२ नोव्हेंबरपासून आळंदीत सुरू होत आहे. देऊळवाड्याच्या गुरू हैबत बाबांच्या पायरी पूजनानं या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या सोहळ्यातील कार्तिक एकादशीची मुख्य पहाट पूजा १५ नोव्हेंबरला तर माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा १७ नोव्हेंबरला होणार आहे.

****

हवामान

मोसमी पाऊस भारतीय उपखंडातून रवाना झाल्यानंतरही देशाच्या विविध भागात पाऊस होत आहे. अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता निवळला असल्याचं हवामान विभागानं सांगितलं. मात्र यंदाचा नोव्हेंबर महिना तुलनेने थंड असेल असा अंदाज आहे.

दरम्यान, येत्या दोन दिवसांत कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

****

 

No comments: