Tuesday, 4 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.11.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 04 November 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी नैनिताल येथील माता नैना देवी शक्तीपीठात प्रार्थना केली. त्यांनी राष्ट्राच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी कामना केली. नैनितालहून राष्ट्रपतींनी कैंची धामला भेट दिली. त्यानंतर राष्ट्रपतींनी कुमाऊं विद्यापीठाच्या २०व्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित केलं.

****

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणातला आरोपी झैबुद्दिन अन्सारी ऊर्फ अबु जिंदाल याच्यावरचा खटला चालवण्यास स्थगिती देणारा, एका विशेष न्यायालयाचा २०१८ सालचा निर्णय, मुंबई उच्च न्यायालयानं काल रद्द केला. न्यायमूर्ती आर.एन लड्ढा यांच्या या निर्णयामुळे, २६/११ प्रकरणाच्या खटल्याचा दुसरा टप्पा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अबु जिंदालच्या मदतीनंच पाकिस्तानच्या दहा अतिरेक्यांना मुंबईत प्रवेश करणं शक्य झाल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

****

रियाध इथल्या भारतीय दूतावासानं, प्रवासी परिचय २०२५, या उपक्रमात, संगीतमय गीता महोत्सव, हा कार्यक्रम सादर केला. २८ ऑक्टोबरपासून तीन नोव्हेंबरपर्यंत सादर झालेल्या या महोत्सवात नृत्य, संगीत, लोककला यांच्या माध्यमातून भारताच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचं दर्शनही घडवण्यात आलं. २०२३ पासून प्रवासी परिचय या महोत्सवाचं आयोजन सुरू केलं आहे. हा कार्यक्रम म्हणजे देशाबाहेर राहणाऱ्या भारतीय समुदायाला जोडून ठेवणाऱ्या सखोल सांस्कृतिक आणि आध्यात्मिक बंधाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे, असं रियाधमधले भारतीय राजदूत डॉक्टर सुहेल एजाज खान यांनी म्हटलं आहे.

****

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीची थकबाकीची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. एस टी महामंडळानं आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना २०२० ते २०२४ या कालावधीतील वेतनवाढीची थकबाकी रक्कमेनूसार पाच ते ४८ हप्त्यांमध्ये प्रदान केली जाणार आहे.

****

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके यांची आज जयंती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी या दिनाच्या औचित्यानं वासुदेव बळवंत फडके यांना आदरांजली वाहिली आहे. इंग्रजांविरुध्द सशस्त्र क्रांतीचे बंड पुकारणारे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातल्या मौजे लुखामसला इथं ६१ लाख रुपये किंमतीच्या विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमात ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीचं तसंच खुल्या व्यायामशाळेचं लोकार्पण करण्यात आलं, तर शाळा आणि अंगणवाडीच्या खोल्यांच्या बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातल्या वाळूज इथं झालेल्या एका कार्यक्रमात वाळूज प्रभागातल्या महिला तसंच स्वयं-सहायता समूह बचतगटांना ट्रॅक्टर, पिंक ऑटो आणि कर्ज वितरण करण्यात आलं. एकूण २ कोटी २० लाख रुपयांचा निधी यावेळी लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आला. ग्रामपंचायत आणि पंचायत राज विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, स्वरदर्शन संस्था आणि वाळूजचा ग्रामोदय प्रकल्प,यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला आमदार प्रशांत बंब उपस्थित होते.

****

बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशात सुरू असलेल्या जन जातीय गौरव वर्ष उत्सवात विविध उपक्रम राबवण्यात येत असून, यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जल जीवन मिशनअंतर्गत एक ते पंधरा नोव्हेंबरदरम्यान जनजातीय गौरव पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यामध्ये पाण्याची गुणवत्ता, पाणी व्यवस्थापन आणि पाणी वापर, याबाबत जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमांत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अंकित तसंच जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक अनुपमा नंदनवनकर यांनी केलं आहे.

****

भारतीय हॉकीला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यानं एक भव्य समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय क्रीडमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती दिली आहे. येत्या सात तारखेला दिल्लीच्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडसंकुलात हा कार्यक्रम होणार असून, त्या दिवशी देशातल्या पाचशे पन्नास जिल्ह्यांमध्येही या निमित्त कार्यक्रम तसंच हॉकीचे सामने आयोजित केले जाणार आहेत.

****

हवामान

राज्यात आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता आहे.

****

No comments: