Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 04 November 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ नोव्हेंबर
२०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
विज्ञान आणि नवोन्मेषाचं लोकाभिमुख रूप हे भारताच्या प्रगतीचं
बळ असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन; संशोधन तसंच विकास परिसंस्थेला चालना
देण्यासाठी एक लाख कोटी रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या योजनेचा प्रारंभ
·
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची मंत्री गिरीश महाजन यांची माहिती
·
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुमारे दहा दिवसांनी
लांबणीवर जाणार- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली शक्यता
·
एसटी महामंडळाच्या जागांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारणार, मंत्री प्रताप
सरनाईक यांची माहिती
आणि
·
परभणी जिल्ह्यातल्या २६५ अंगणवाड्यांचं रूपांतर स्मार्ट
अंगणवाड्यांमध्ये करण्यात येणार
****
विज्ञान
आणि नवोन्मेषाचं लोकाभिमुख रूप हे भारताच्या प्रगतीचं बळ असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत काल उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष
परिषद २०२५चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. देशात नवोन्मेषाची परिसंस्था निर्माण
व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत असून, जगातली सर्वात यशस्वी डिजिटल सार्वजनिक
पायाभूत सुविधा भारतात असल्याचं त्यांनी नमूद केलं. गेल्या दशकात संशोधन आणि विकासाला
सरकारनं प्राधान्य दिलं आहे. त्यासाठीच्या निधीतही भरघोस वाढ केल्याचं त्यांनी सांगितलं.
स्टार्टअप, सेमीकंडक्टर आणि हरित उर्जा क्षेत्रात देशानं गेल्या
दशकात मोठी प्रगती केल्याचं पंतप्रधान म्हणाले.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
या कार्यक्रमात
पंतप्रधानांनी देशातल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला चालना देण्यासाठी एक लाख कोटी
रुपये अर्थसहाय्य देणाऱ्या संशोधन, विकास आणि नवोन्मेष योजनेचाही प्रारंभ
केला. खासगी क्षेत्राकडून संचलित केल्या जाणाऱ्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला प्रोत्साहन
देणं हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या
उदंचन जलविद्युत प्रकल्पांना गती देण्यासाठी फास्ट ट्रॅक यंत्रणा उभारली जाणार असल्याचं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. धुळे-नंदूरबार जिल्ह्यातल्या पंचमौली-देवळीपाडा
प्रकल्पासाठी हरियाणाच्या खाजगी कंपनीसोबत काल आठ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार
करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पांमुळे राज्यातली ऊर्जा उत्पादन
क्षमता वाढणार असून, अडीच हजार रोजगार निर्मिती होणार आहे. सह्याद्री
पर्वतरांगांमधली भौगोलिक परिस्थिती उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी अत्यंत अनुकूल असल्याने
महाराष्ट्राला मोठा फायदा होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त
केला.
****
राज्यात
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
करण्यात आल्याची माहिती, जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातल्या जानोरी, कोरटे परिसरातल्या
भात पिकांच्या नुकसानीची त्यांनी काल पाहणी केली, त्यावेळी ते
बोलत होते. अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक येणार
असल्याचंही महाजन यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य विधिमंडळाचं
हिवाळी अधिवेशन अंदाजे दहा दिवसांनी पुढे ढकललं जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत
आहे. आगामी १५ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार असल्यानं त्यानंतरच अधिवेशनाची
सुरुवात होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपुरात
दिली. बहुतांश पक्षांमधले नेते जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये व्यस्त राहणार आहेत,
हे लक्षात घेता यंदाचं अधिवेशन पुढे ढकललं जाऊ शकतं, असं त्यांनी सांगितलं.
****
एसटी महामंडळाच्या
मोकळ्या जागेवर तसंच कार्यशाळेच्या आणि बसस्थानकांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारुन
त्याद्वारे वर्षाला सुमारे ३०० मेगावॉट इतकी वीज निर्मिती करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं
आहे. त्याद्वारे वर्षाला सुमारे एक हजार कोटी रुपये किंमतीची वीजनिर्मिती करण्याचा
महत्वकांक्षी सौर ऊर्जा हब उभारुन एसटीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणार असल्याची
घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली. एसटी महामंडळाच्या
सभागृहात आयोजित केलेल्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते.
****
विरोधकांची
शुद्ध मतदार याद्यांबाबत प्रामाणिक भावना असेल, तर त्यांनी मतदार याद्यांच्या सखोल पुनरिक्षणाला
आपला पाठिंबा जाहीर करावा, असं आवाहन भाजपा नेते आशिष शेलार यांनी
केला. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडीच्या मोर्चात ठाकरे
बंधूंनी मतदार यादीतल्या दुबार अल्पसंख्याक समुदायातल्या मतदारांचा उल्लेख केला नसल्याचा
आरोपही शेलार यांनी यावेळी केला. मतदार याद्या शुद्घ असल्या पाहिजेत असा भाजपाचा आग्रह
असल्याचं ते म्हणाले.
****
दरम्यान, शेलार यांनी
काल लातूर जिल्ह्यात निलंगा इथल्या श्री निळकंठेश्वर मंदिर आणि परिसराची, तसंच औसा किल्ला संवर्धनासाठी करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली. श्री निळकंठेश्वर
मंदिराच्या कामाला भरीव निधी उपलब्ध करून देण्यासह मंदिर आणि परिसरातल्या बारवांना
राज्य संरक्षित वास्तू घोषित करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं
त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या
अंगणवाड्यांचं आधुनिकीकरण करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी कीट खरेदीला सरकारने मंजुरी
दिली आहे. या योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या सुमारे २६५ अंगणवाडी केंद्रांच रुपांतर
अत्याधुनिक सुविधांनी युक्त स्मार्ट अंगणवाडीमधे केलं जाणार असल्याचं महिला आणि बालविकास
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. स्मार्ट अंगणवाडी योजनेमुळे परभणी जिल्हयातल्या
बालकांना आनंददायी शिक्षणाचं वातावरण उपलब्ध होईल. मुलांच्या सर्वांगीण विकासासोबतच
महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरणार आहे, असं बोर्डीकर
म्हणाल्या.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात काल जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण - दिशा समितीची
बैठक पार पडली. खासदार संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्र
शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. सध्या शहरात सुरू
असलेल्या पाणी पुरवठा योजना, घरकुल योजना, जलजीवन
मिशन योजनेच्या कामांची पाहणी करण्याचे निर्देश भुमरे यांनी दिले.
****
शेतकऱ्यांच्या
कर्जमाफीचा निर्णय सहा मिनिटात होऊ शकतो त्यासाठी सरकारला सहा महिन्यांचा वेळ कशासाठी
हवा, असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास
दानवे यांनी केला आहे. ते काल लातूरमध्ये बातमीदारांशी बोलत होते. पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर झालेली मदत
अद्याप मिळाली नसल्याबद्दल ते या दौऱ्यात सरकारला जाब विचारतील, असं त्यांनी सांगितलं.
****
स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या या वर्षीच्या हिवाळी परीक्षा ११ नोव्हेंबरपासून
सुरू होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप या परीक्षेसाठी आवेदनपत्र भरले नसतील, अशा विद्यार्थ्यांसाठी
एका दिवसासाठी ऑनलाइन लिंक सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. आज महाविद्यालयीन
स्तरावर अतिरिक्त शुल्कासह कार्यालयीन वेळेत ऑनलाइन पद्धतीनं अर्ज भरून घ्यावेत,
अशी सूचना विद्यापीठ प्रशासनानं केली आहे.
****
लातूर जिल्हा
परिषद आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या अगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम मतदार
यादी काल प्रसिद्ध करण्यात आली. नागरिकांनी या याद्यांचं अवलोकन करण्याचं आवाहन, जिल्हा प्रशासनानं
केलं आहे.
****
राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल मुंबईत पक्षाची जिल्हानिहाय
आढावा बैठक घेतली. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर, जालना,
बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
****
जालना जिल्ह्यात
२०२४-२५ या वर्षाच्या खरीप हंगामाची सुधारित पिकांची पैसेवारी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
यांनी जाहीर केली. जिल्ह्यातल्या एकूण ९७१ गावांपैकी ज्या गावांमध्ये दोन-तृतीयांशपेक्षा
जास्त खरीप पेरणी झाली आहे, अशा ९६५ गावांची पैसेवारी निश्चित करण्यात आली असून, यामध्ये ६६७ खरीप गावं आणि २९८ रब्बी गावं समाविष्ट आहेत. जाहीर करण्यात आलेल्या
९६५ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे.
****
लातूर जिल्ह्यात
जळकोट तालुक्यातल्या मरसांगवी गावातून वाहणाऱ्या तिरू नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये
वाहून गेल्यामुळे माय-लेकीचा मृत्यू झाला. काल सकाळच्या सुमारास मरसांगवी इथल्या कौशल्या
आणि रुक्मिणी वाघमारे या नदीच्या पलीकडे असलेल्या शेतामधील कापूस वेचण्यासाठी जात असताना
ही घटना घडली.
****
No comments:
Post a Comment