Tuesday, 4 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 04.11.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 04 November 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०४ नोव्हेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नैनीतालमधील कुमाऊं विद्यापीठाच्या २०व्या पदवीदान समारंभाला आज उपस्थित राहणार आहेत. त्या तीन दिवसांच्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती नैनीतालमधील नीम करोली बाबा आश्रम, कैचीधाम इथंही आज भेट देणार आहेत.

****

निवडणूक आयोग आजपासून मतदार याद्यांच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु करत आहे. नऊ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांचा या मोहिमेत समावेश आहे. अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा यात समावेश आहे. मतदार याद्या पुनरावलोकनाचा हा टप्पा 7 फेब्रुवारी 2026 रोजी अंतिम मतदार यादीच्या प्रकाशनासह संपणार आहे.

****

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान परवा, येत्या ६ तारखेला होणार असून त्यासाठीच्या प्रचाराची सांगता आज होणार आहे. या टप्प्यात १८ जिल्ह्यातल्या १२१ जागांसाठी मतदान होणार आहे. ज्येष्ठ भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरा बुथ सबसे मजबूत उपक्रमांतर्गत आज महिला कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याही आज प्रचारसभा होणार आहेत.

****

भारतानं तिमोर लेस्ते या द्वीप राष्ट्राला रेबीज अँटीबॉडीच्या दोन हजार बाटल्या आणि रेबीजसाठीच्या लशीचे दहा हजार डोस पाठवले आहेत.यामुळे  भारत हा ग्लोबल साऊथ देशांचा एक विश्वसनीय साथीदार असल्याची आपली भूमिका भारतानं पुन्हा सिद्ध केली आहे. भारत सरकार, इंडोनेशिया आणि अन्य काही साथीदार देशांच्या मदतीनं, ग्लोबल साऊथ भागात रेबीज रोगाचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न जागतिक आरोग्य संघटना करत आहे.

****

मुंबई इथं वांद्रे कुर्ला संकुल इथल्या एचडीआयएलच्या अनधिकृत बांधकामावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारे धडक कारवाई करण्यात आली. वांद्रे कुर्ला संकुल इथल्या बांद्रा पूर्व इमारत क्रमांक ११ मोतीलाल नेहरू नगर येथील एचडीआयएल कंपनीनं बांधलेल्या इमारतीमध्ये अनाधिकृतपणे मूळ आराखड्यामध्ये बदल करुन बांधलेल्या हॉटेलच्या बांधकामावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिककरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. तळमजल्यासह ही इमारत १० मजल्याची असून यात आतापर्यंत ८ मजल्यांवरील सुमारे १६० गाळ्यांमधील अनाधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या पथकाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबवली. उर्वरित अनाधिकृत बांधकामावरही पुन्हा धडक कारवाईचे काम सुरु आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.

****

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या सशस्त्र क्रांतीचे जनक वासुदेव बळवंत फडके यांची आज जयंती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दिनाच्या औचित्यानं फडके यांना आदरांजली वाहिली असून, स्वातंत्र्यलढ्यातल्या या महान सेनानीला सविनय प्रणाम, असं म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वासुदेव बळवंत फडके यांना आदरांजली वाहिली आहे.

****

राज्यातल्या साखर गाळप हंगामाला शनिवारपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले. आणखी ३३ कारखान्यांच्या परवान्यांची तपासणी साखर आयुक्तालयाच्या स्तरावर सुरू असून, दोन दिवसांत त्यावर निर्णय होणार आहे, अशी माहिती साखर आयुक्त संजय कोलते यांनी काल दिली.

****

त्रिभाषा धोरण समिती राज्यात आठ ठिकाणी फिरून विविध स्तरांमधल्या नागरिकांची मतं जाणून घेऊन अहवाल तयार करणार आहे. 'मराठी आणि इंग्रजी या भाषा पहिलीपासून आणि हिंदी पाचवीपासून शिकवण्याची सध्या सुरू असलेली पद्धतच कायम राहावी,' असं मत रत्नागिरीत मोठ्या प्रमाणावर व्यक्त झालं,' अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी दिली. राज्यातील नागरिकांना याबद्दलची मतं tribhashasamiti.mahait.org या संकेतस्थळावर मांडावीत असं आवाहन त्यांनी केलं.

****

लातूर इथल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा  बाह्यरुग्ण विभाग उद्या पाच तारखेला गुरुनानक जयंतीची शासकीय सुट्टी असल्यामुळे बंद राहणार आहे. परवा सहा तारखेपासून कामकाज नियमित वेळेप्रमाणे सुरू राहणार असल्याचं, तसंच आपत्कालीन सेवा चोवीस तास सुरू राहणार असल्याचं रुग्णालयाच्या प्रशासनानं कळवलं आहे.

****

ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं काल वार्धक्यानं निधन झालं. त्या ८५ वर्षांच्या होत्या. अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमधून त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. मंतरलेली चैत्रवेल, लेकुरे उदंड जाहली, संकेत मीलनाचा ही त्यांची काही गाजलेली नाटकं, तर नवरी मिळे नवऱ्याला, मायबाप, आत्मविश्वास, उंबरठा हे काही गाजलेले चित्रपट आहेत. दूरदर्शनवरच्या गजरा या कार्यक्रमाचं निवेदनही दया डोंगरे यांनी केलं होतं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दया डोंगरे यांना आदरांजली वाहिली आहे.

****

No comments: