Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 05 November
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ०५ नोव्हेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले
गुरू, गुरु नानक देव यांची जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त
नांदेडसह सर्वच गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुरू नानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या
आहेत. श्री गुरु नानक देवजी यांचे जीवन आणि संदेश मानवतेला कालातीत ज्ञानाने मार्गदर्शन
करत आहेत. करुणा, समानता, नम्रता आणि सेवेची त्यांची
शिकवण प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रकाश पर्वानिमित्त शुभेच्छा. त्यांचा दिव्य
प्रकाश आपल्याला सदैव प्रकाशित करत राहो, असं पंतप्रधानांनी
आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र
सिंह यांच्या उपस्थितीत निवृत्तीवेतनधारकांसाठी आज देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र
मोहिमेचा चौथा टप्पा सुरु करण्यात येणार आहे.
देशभरातील दोन हजार जिल्हे, उपविभाग, शहरांमध्ये शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन
सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो. नोव्हेंबर 2014 पासून सरकारनं डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिम सुरू केली आहे.
****
बिहार विधानसभा निवडणुकीच्या
पहिल्या टप्प्याचा प्रचार काल थांबला. उद्या पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यातल्या १२१
जागांसाठी मतदान होणार आहे. मतदान केंद्रांवर मतपेट्या आणि मतदान साहित्य घेऊन पथकं
रवाना होत आहेत. काल ज्येष्ठ भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरा बुथ सबसे
मजबूत उपक्रमांतर्गत महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याही प्रचारसभा झाल्या.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये
त्यांचं आगमन झालं. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचा किती निधी जमा
झाला याबाबत उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पैठण तालुक्यातील नांदर गावातील
शेतकऱ्यांच्या बांधावर ते पोहचले आहेत.
****
कृषी विभागामार्फत बियाण्यांच्या
नवीन जातींना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकासाठी ही योजना असून 45 हजार 985 हेक्टर क्षेत्रावर पिकांच्या
उत्पादकता वाढीचे प्रयोग राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक अशोक
किरनळ्ळी यांनी दिली.
****
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अतिवृष्टी
आणि पूर परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त भागाची केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या पथकाद्वारे
आजपासून प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्यात येणार आहे. यासंबंधी काल या पथकानं जिल्हाधिकारी
कार्यालयात नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी केंद्र शासनाचे संयुक्त सचिव आणि केंद्रीय
पथकाचे प्रमुख आर. के. पांडे यांच्यासह संबंधित मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.
तसंच काल या पथकानं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कोळेगाव इथं भेट देऊन शेतीच्या
नुकसानाची पाहणी केली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम
राबवण्यात येणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी
जनार्दन विधाते यांनी ही माहिती दिली. हा
कार्यक्रम तालुकास्तरावर राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
जळगावच्या कवयित्री बहिणाबाई
चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आजपासून ‘इंद्रधनुष्य’
या राज्यस्तरीय युवक महोत्सवाची सुरूवात होत आहे. काल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा
विद्यापीठाचा सांस्कृतिक संघ या महोत्सवासाठी रवाना झाला. हा महोत्सव येत्या नऊ तारखेपर्यंत
चालणार आहे.
****
आयसीसी महिला एकदिवसीय क्रमवारीत, भारताच्या स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्जनं अनुक्रमे दुसऱ्या आणि दहाव्या
स्थानावर झेप घेतली आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये दीप्ती शर्मानं चौथे स्थान मिळवलं आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डनं स्मृती मानधनाला
मागं टाकत अग्रस्थान स्थान मिळवलं आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय
क्रिकेट परिषदेच्या दोन दिवसीय बैठकीला दुबईत आजपासून प्रारंभ होत आहे. आशिया चषकादरम्यान भारत आणि पाकिस्तान संघाचे
वर्तन तसंच इतर मुद्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. आशिया चषकातील गैरवर्तनाबद्दल
आयसीसीनं पाकिस्तानी खेळाडू हारिस राऊफवर दोन सामन्यांची बंदी घातली. तर भारतीय खेळाडू
सुर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहला दंड ठोठावला आहे.
****
रणजी क्रिकेट स्पर्धेत काल
नाशिक इथला महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यादरम्यानचा सामना अनिर्णित अवस्थेत सुटला.
पावसामुळं या सामन्यातील बराचसा वेळ वाया गेला होता. दुसरीकडं मुंबईनं राजस्थानविरुद्धचा
सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. राजस्थाननं पहिल्या डावात ६१७ धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात मुंबई संघानं
पहिल्या डावात सर्वबाद २५४, तर दुसऱ्या डावात तीन बाद
२६९ धावा केल्या. दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालनं दीडशतकी खेळी केली.
****
हवामान
राज्यात येत्या २४ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात हवामान कोरडं
राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment