Thursday, 6 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.11.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 06 November 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०६ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त देशात वर्षभर साजऱ्या होणाऱ्या स्मृतीदिनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दिल्लीमध्ये होणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं याचं आयोजन करण्यात येणार असून, स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आणि राष्ट्रीय अभिमान, एकता जागृत करणाऱ्या या कालातीत गीताची दीडशेवी वर्षपूर्ती साजरी होणार आहे. सात नोव्हेंबर २०२५ ते सात नोव्हेंबर २०२६ दरम्यान हा उत्सव साजरा केला जाणार आहे. या निमित्तानं स्मरण तिकीट आणि नाण्याचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल.

यासोबतच देशभरात अनेक ठिकाणी वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकात, तसंच नांदेड शहरात श्री गुरू ग्रंथसाहिबजी भवन तहसील कार्यालय जवळ "वंदे मातरम्" गीताच्या दीडशेव्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार आहे.

****

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत २७ पूर्णांक ६५ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली. बेगुसराय जिल्ह्यात सर्वाधिक ३० पूर्णांक ३७ शतांश टक्के मतदान झालं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पाटणा जिल्ह्यातल्या बख्तियारपूर इथं मतदानाचा हक्क बजावला तर उपमुख्यमंत्री आणि तारापूर मतदारसंघातले भाजप उमेदवार सम्राट चौधरी यांनी मुंगेर इथं, भाजप नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हाजीपूर इथं मतदान केलं.

या टप्प्यात १८ जिल्ह्यातल्या १२१ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, एक हजार ३१४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, पहिल्यांदाच प्रत्येक मतदारसंघात एक निरीक्षक तैनात केला जाणार असून, निवडणूक प्रक्रियेवर बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग होणार आहे. पुरेशा प्रमाणात केंद्रीय सशस्त्र पोलिस दल देखील तैनात केले जाणार आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरीकांना उत्साहाने मतदान करावं, असं आवाहन केलं असून, पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवा मतदारांचं अभिनंदन केलं आहे. 

****

भारतीय नौदलाच्या जलक्षेत्र सर्वेक्षण क्षमतेला बळकटी देणारं ‘इक्षक’ हे अत्याधुनिक सर्वेक्षण जहाज आज औपचारिकरित्या नौदलात सामील झालं. कोची इथं नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात हे जहाज सेवेत दाखल करण्यात आलं. ‘इक्षक’ हे वेसल वर्गातलं तिसरं आणि दक्षिण नौदल कमांडमध्ये तैनात होणारं पहिलं जहाज आहे. पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेलं हे जहाज भारताच्या जहाजबांधणी क्षेत्रात आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे. हे जहाज किनारपट्टी आणि खोल समुद्रातल्या सर्वेक्षणासाठी सक्षम आहे.

****

राज्यातल्या काही अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही नुकसान भरपाईची मदत पोहोचली नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे, मात्र ही मदत येत्या काळात शेतकर्यांच्या खात्यात जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यासंबंधी बोलताना फडणवीस यांनी, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा दौरा असल्याची टीका केली.

****

पुण्यात कोरेगाव पार्क इथल्या जमिनीचा व्यवहारात आर्थिक घोटाळा झाला असून, याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे डायरेक्टर असलेल्या अमीडीया होल्डिंग्स एलएलपी या कंपनीने ही सरकारी जमिन बाजार भावापेक्षा अत्यंत कमी किमतीत खरेदी केल्याचं त्यांनी सांगितलं. या व्यवहारात जे जबाबदार आहेत, त्यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली. 

****

भारतीय तंत्रज्ञान संस्था - आयटीआय मधल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांसाठी छत्रपती संभाजीनगर इथं येत्या दहा तारखेला प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी विशेष भरती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यास जिल्ह्यातल्या सर्व औद्योगिक आस्थापना उपस्थित राहणार आहेत.

****

भारत - ऑस्ट्रेलिया दरम्यान चौथा टी - ट्वेंटी क्रिकेट सामना आज क्विन्सलँड इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी पावणे दोन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत. 

****

इजिप्तमध्ये आजपासून सुरु होणाऱ्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत नमू भाकरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सामील होणार आहे. पिस्तुल प्रकारात मनु भाकर, ईशा सिंग आणि सुरुची सिंग देशाचं प्रतिनिधित्व करतील. रायफल प्रकारात रुद्रांक्ष पाटील, स्वप्नील कुसळे सहभागी होतील. या स्पर्धेत ७२ देशातले ७२० नेमबाज सहभागी होतील.

****

No comments: