Thursday, 6 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 06 November 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०६ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एक हजार ३१४ उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद-सरासरी साठ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद

·      केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर

·      अतिवृष्टीबाधित खात्यात लवकरच मदत जमा होणार-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

आणि

·      चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी विजय

****

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एक हजार ३१४ उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं. या टप्प्यात १८ जिल्ह्यात १२१ मतदारसंघामध्ये सरासरी साठ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. उर्वरित २० जिल्ह्यातल्या १२२ मतदार संघात येत्या मंगळवारी ११ नोव्हेंबरला मतदान होईल. दोन्ही टप्प्यातल्या मतदानाची मोजणी १४ नोव्हेंबरला होणार आहे.

दरम्यान दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचाराने वेग घेतला आहे. सात वेगवेगळ्या देशातल्या १६ प्रतिनिधींनी निवडणूक सज्जतेची पाहणी करून माहिती घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान उद्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि आसपासच्या ग्रामीण भागाच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत. या भेटीदरम्यान ते अरणपूर गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार असून, आसपासच्या पायाभूत सुविधांच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते घरकुल गृहनिर्माण प्रकल्पाला भेट देऊन लाभार्थी कुटुंबे आणि स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधतील. याशिवाय खानगाव-तपोवन मार्गावरील पूल आणि जवळच्या बोअरवेलच्या नुकसानीचा आढावाही चौहान घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

राज्यातल्या काही अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही नुकसान भरपाईची मदत पोहोचली नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे, मात्र ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

पुण्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरणी झालेल्या आरोपांच्या संदर्भात महसूल विभाग आणि भूमिअभिलेख विभाग या दोन्हींकडून संपूर्ण माहिती मागवली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.ते आज नागपूरात माध्यमांशी बोलत होते. यासंदर्भात होणार्या चौकशीच्या आणि मिळालेल्या माहितीच्या आधारेच आम्ही अधिकृत भूमिका मांडू. प्रथमदर्शनी समोर आलेले काही मुद्दे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचं ते म्हणाले. “या प्रकरणात अनियमितता आहे की नाही, हे पडताळून पाहिले जाईल आणि असल्यास कठोर कारवाई केली जाईल,” असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

****

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यासंबंधी बोलताना फडणवीस यांनी, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा दौरा असल्याची टीका केली.

****

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, जमीन खरडून गेली आहे, रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळायला हवी असं ठाकरे म्हणाले. शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन देऊन महायुती सत्तेवर आली, मात्र दिलेलं आश्वासन पाळलं नाही, अशी टीका ठाकरे यांनी यावेळी केली.

बाईट - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

****

भारतीय नौदलाच्या जलक्षेत्र सर्वेक्षणाची क्षमता वृद्धिंगत करणारं इक्षक टेहेळणी जहाज आजपासून औपचारिकरित्या नौदलाच्या सेवेत दाखल होत आहे. नौदल प्रमुख अँडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. इक्षक दक्षिण नौदल कमांड अंतर्गत तैनात होत असून त्याचा बहुतांश भाग देशांतर्गत उत्पादन सामुग्रीतून तयार झाला आहे. जहाजं, बंदरे आणि जलमार्ग, किनारपट्टी आणि खोल समुद्रातल्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या जहाजाची निर्मिती केली आहे.

****

इयत्ता चौथी आणि सातवी तसंच पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीच्या यंदाच्या परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केला आहे. पाचवी आणि आठवीला शिष्यवृत्ती परीक्षा लागू केल्यापासून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आल्याने शिक्षण विभागाने पूर्वीप्रमाणेच चौथी आणि सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

****

वंदे मातरम्‌’ या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त देशात वर्षभर साजऱ्या होणाऱ्या स्मृतीदिनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दिल्लीमध्ये होणार आहे. सात नोव्हेंबर २०२५ ते सात नोव्हेंबर २०२६ दरम्यान हा उत्सव साजरा केला जाणार आहे. या निमित्तानं स्मरण तिकीट आणि नाण्याचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल.

****

भारताने आज चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी पराभव केला. यजमान संघाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण केलं, भारतानं निर्धारित २० षटकांत आठ बाद १६७ धावा केल्या. शुभमन गिलने सर्वाधिक ४६, अभिषेक शर्मा २८, शिवम् दुबे २२, तर कर्णधार सूर्यकुमार यादव २० धावा करून तंबूत परतला. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ १९ व्या षटकांत ११९ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक तीन बळी घेतले. अर्शदीपसिंग, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी एक तर शिवम् दुबेने दोन बळी घेतले. नाबाद झंझावाती २१ धावा आणि दोन बळी अशी अष्टपैलू कामगिरी करणारा अक्षर पटेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पहिला सामना रद्द झालेल्या या मालिकेत भारताने दोन एक अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला अखेरचा सामना येत्या शनिवारी होणार आहे.

****

महिला क्रिकेट विश्वचषक - २०२५ च्या विजेत्या भारतीय महिला संघाने इतिहास घडवला असून या सर्व महिला तरुण पिढीसाठी आदर्श असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. या संघानं आज दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं राष्ट्रपतींची भेट घेतली त्यानंतर राष्ट्रपतींनी समाज माध्यमांवर ही भावना व्यक्त केली. या भेटीत कर्णधार हरमनप्रीत कौरने क्रिकेटपटूंनी स्वाक्षरी केलेली जर्सी राष्ट्रपतींना भेट दिली. राष्ट्रपतींनी टीम इंडियाच्या विजयाबद्दल यावेळी अभिनंदन केलं.

महिला संघातल्या खेळाडूंनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या खेळाडूंनी ‘फिट इंडियाचा’ संदेश सर्वत्र पोहोचवावा, तसंच तंदुरुस्त राहण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करावं, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

****

फिडे विश्वचषक स्पर्धेत, भारताच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. ग्रॅण्डमास्टर डी. गुकेश, अर्जुन एरिगेसी आणि पेंटला हरिकृष्णा यांनी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

****

परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यात खरबा इथला ग्रामपंचायत अधिकारी रमेश मुळे याला एक हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी न्यायलयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. तक्रारदाराच्या पत्नीचे मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी मुळे याने पैशांची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबण्धक पथकाने पडताळणी केल्यानंतर मुळे याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

****

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केला आहे. मुंबईत पक्षाचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

****

केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी प्रक्रिया ३० ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, प्रत्यक्ष खरेदी १५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध बाजार समित्यांमध्ये तालुका शेतकरी खरेदी विक्री संघांमार्फत ही खरेदी केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी जवळच्या नाफेड खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन सातबारा उतारा, आधारकार्ड आणि बँकेचं पासबुक सादर करून आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी. तसंच खरेदीसाठी संदेश प्राप्त झाल्यानंतरच शेतमाल खरेदी केंद्रावर आणावा, असं आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही. यू. राठोड यांनी केलं आहे.

****

लातूर शहरातील मळवटी रोड परिसरात असलेल्या पिंटू हॉटेल जवळ दोन तरुणांनी तिघांवर कोयत्याने हल्ला केला होता. करण मोहिते आणि अमित समुखराव या दोन्ही सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक करून, हल्ला केला त्याच परिसरातून त्यांची धिंड काढली. गुन्हेगारांविरोधात अशाच प्रकारच्या कठोर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

****

बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील मौजे सुलतानपूरला योग रुग्णालय स्थापन करण्यासाठी २५ एकर शासकीय जमीन विनामूल्य देण्यास राज्य शासनाच्या महसूल विभागाने मान्यता दिली आहे. या जागेवर १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय तसंच योग आणि निसर्गोपचार संशोधन संस्थेची स्थापना केली जाणार असल्याचं या निर्णयात म्हटलं आहे.

****

No comments: