Friday, 7 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.11.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 November 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      वंदे मातरम गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त स्मृती महोत्सवाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, राज्यात विविध ठिकाणी सामुहिक गायन

·      केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

·      अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार-मुख्यमंत्र्यांची माहिती, तर शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याची उद्धव ठाकरेंची मागणी

·      आधारभूत दरानुसार मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीला १५ नोव्हेंबरपासून सुरुवात

आणि

·      चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताची मालिकेत २-१ अशी आघाडी

****

वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त देशात वर्षभर साजऱ्या होणाऱ्या स्मृति महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीत होणार आहे. स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आणि राष्ट्रीय अभिमान तसंच एकता जागृत करणाऱ्या या कालातीत गीताची दीडशेवी वर्षपूर्ती पुढचं वर्षभर, म्हणजेच येत्या सात नोव्हेंबर २०२६ पर्यंत साजरी केली जाणार आहे. या निमित्तानं एक स्मरण तिकीट आणि विशेष नाण्याचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते आज करण्यात येईल.

देशभरात अनेक ठिकाणी वंदे मातरम गीताचं सामुहिक गायनही आज करण्यात होणार आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे. पुढील वर्षभर याअंतर्गत राज्यभरात कौशल्य विकास विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात, तसंच नांदेड शहरात श्री गुरू ग्रंथसाहिबजी भवन इथं हा कार्यक्रम होणार आहे.

****

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि आसपासच्या ग्रामीण भागाच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येत आहेत. या भेटीदरम्यान ते अरणपूर गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार असून, आसपासच्या पायाभूत सुविधांच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते घरकुल गृहनिर्माण प्रकल्पाला भेट देऊन लाभार्थी कुटुंबं आणि स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधतील. याशिवाय खानगाव-तपोवन मार्गावरील पूल आणि जवळच्या बोअरवेलच्या नुकसानीचा आढावाही चौहान घेणार असल्याचं याबाबातच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यातल्या काही अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही नुकसान भरपाईची मदत पोहोचली नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे, मात्र ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली, ठाकरे यांचा हा दौरा, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आखल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

****

दरम्यान, मराठवाडा दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, जमीन खरडून गेली आहे, रस्ते वाहून गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत मिळायला हवी असं ते म्हणाले. शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन देऊन महायुती सत्तेवर आली, मात्र दिलेलं आश्वासन पाळलं नाही, अशी टीका ठाकरे यांनी यावेळी केली.

बाईट - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

त्यानंतर ठाकरे यांनी काल लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यातल्या भुसणी आणि अहमदपूर तालुक्यातल्या थोरलेवाडी इथं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. कर्ज मुक्तीवरून त्यांनी यावेळी राज्य सरकारवर टीका केली.

****

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एक हजार ३१४ उमेदवारांचं भवितव्य काल मतदान यंत्रात बंद झालं. या टप्प्यात १८ जिल्ह्यात १२१ मतदारसंघामध्ये ६४ पूर्णांक ६६ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली. उर्वरित २० जिल्ह्यातल्या १२२ मतदार संघात येत्या मंगळवारी ११ नोव्हेंबरला मतदान होईल. दोन्ही टप्प्यातल्या मतदानाची मोजणी १४ नोव्हेंबरला होणार आहे.

दरम्यान, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणूक प्रचाराने वेग घेतला आहे. सात वेगवेगळ्या देशातल्या १६ प्रतिनिधींनी निवडणूक सज्जतेची पाहणी करून माहिती घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेतून सूट देण्यासाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्यासाठी, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश, राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. सर्व विभागांनी अशा प्रकारचे प्रस्ताव या समितीमार्फतच पाठवणं आवश्यक असल्याचं, आयोगाने म्हटलं आहे.

****

जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा करातल्या सुधारणांना करदात्यांकडून प्रथमपासूनच भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत भारतीय स्टेट बँकेच्या १२व्या बँकिंग आणि अर्थविषयक परिषदेत त्या बोलत होत्या. उत्पादकता आधारित सवलत योजनेमुळे देशाची निर्यात ६१ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली असून, १२ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.

****

भारताने काल चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतानं निर्धारित २० षटकांत आठ बाद १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ १९ व्या षटकांत ११९ धावांवर सर्वबाद झाला. वॉशिंग्टन सुंदरने तीन, शिवम दुबेने दोन, तर अर्शदीपसिंग, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी एक गडी बाद केला. नाबाद झंझावाती २१ धावा आणि दोन बळी अशी अष्टपैलू कामगिरी करणारा अक्षर पटेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. पहिला सामना रद्द झालेल्या या मालिकेत भारताने दोन - एक अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला अखेरचा सामना उद्या शनिवारी होणार आहे.

****

मराठी रंगभूमी दिन काल साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा नाट्य परिषद आणि श्रीराम म्युझिकल फाऊंडेशनच्या वतीनं झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध नाट्यकर्मी दिवंगत डॉ लक्ष्मण देशपांडे यांच्या शालीचं पूजन करण्यात आलं. जगभरात दोन हजार आठशेहून अधिक प्रयोग झालेल्या, वऱ्हाड निघालंय लंडनला या आपल्या एकपात्री नाटकात विविध ५२ भूमिका साकारण्यासाठी देशपांडे यांनी, या शालीचा अत्यंत कल्पकतेने वापर केला होता.

****

परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यात खरबा इथला ग्रामपंचायत अधिकारी रमेश मुळे याला एक हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. तक्रारदाराच्या पत्नीचं मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी मुळे यानं ही लाच मागितली होती.

****

छत्रपती संभाजीनगरच्या दोन हजार ७४० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत महापालिकेचा हिस्सा म्हणून ८२२ कोटी रुपयांच्या कर्जावर काल मुंबईत शिक्कामोर्तब झालं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रचर डेव्हलपमेंट कंपनीसोबतच्या करारावर सही केली. या करारामुळे पाणी योजनेच्या कामाला गती मिळणार आहे.

****

केंद्र सरकारनं निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी नोंदणी प्रक्रिया ३० ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, प्रत्यक्ष खरेदी १५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विविध बाजार समित्यांमध्ये तालुका शेतकरी खरेदी विक्री संघांमार्फत ही खरेदी केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी जवळच्या नाफेड खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन सातबारा उतारा, आधारकार्ड आणि बँकेचं पासबुक सादर करून आपल्या पिकाची नोंदणी करून घ्यावी, तसंच खरेदीसाठी संदेश प्राप्त झाल्यानंतरच शेतमाल खरेदी केंद्रावर आणावा, असं आवाहन जिल्हा पणन अधिकारी व्ही. यू. राठोड यांनी केलं आहे.

****

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक ऐक्याची जोपासना करावी, असं आवाहन राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी केलं आहे. ते काल परभणी महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. महापालिकेच्या विविध कामांचा आढावा घेत, लोखंडे यांनी, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत निर्देश दिले.

****

लातूर शहरात मळवटी रस्ता परिसरात दोन तरुणांनी तिघांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. करण मोहिते आणि अमित समुखराव या दोन्ही सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक करून, हल्ला केला त्याच परिसरातून काल त्यांची धिंड काढली. गुन्हेगारांविरोधात अशाच प्रकारच्या कठोर कारवाईचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

****

हवामान 

येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात इतरत्र हवामान कोरडं राहील, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

****

No comments: