Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 November
2025
Time 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
दिल्लीत झालेल्या स्फोटात
आठ जणांचा मृत्यू,
१५ हून अधिक जण जखमी-घटनेच्या
चौकशीचे आदेश दिल्याची गृहमंत्री अमित शहा यांची माहिती
·
दोन लाखापेक्षा जास्त
लोकसंख्येच्या प्रत्येक शहरात नागरी सहकारी बँक उभारण्याचं केंद्रीय सहकार
मंत्र्यांचं आवाहन
·
अन्नदाता असलेला शेतकरी आता
ऊर्जादाता झाल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन
·
प्रसिद्ध साहित्यिक डॉ.
वृषाली किन्हाळकर यांना शिरीष पै जीवनगौरव पुरस्कार जाहीर
आणि
·
राज्यात थंडीचा कडाका, मराठवाड्यात
बीड इथं ११ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
****
दिल्लीमध्ये काल संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ
एका कारमध्ये झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला, तर
१५ हून अधिक जण जखमी झाले. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असून, लोकनायक
रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास
सिग्नलजवळ उभ्या असलेल्या आय-20 गाडीत हा स्फोट झाला, त्यामुळे
आसपासच्या काही गाड्यांचंही नुकसान झालं.
या स्फोटामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांनी घटनास्थळाची पाहणी करुन, रुग्णालयात उपचार
घेत असलेल्या नागीकांचीही भेट घेतली. घटनेशी संबधित सर्व पैलूंवर तपास सुरु आहे.
सर्व शक्यतांचा शोध घेतला जात आहे, असं त्यांनी सांगितलं.
बाईट
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त
केलं असून,
गृहमंत्र्यांकडून घटनेची माहिती घेतली.
या घटनेनंतर दिल्लीसह देशभरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात
आली आहे. दिल्ली शहर हाय अलर्टवर असून, वाहनांची तपासणी आणि
सुरक्षा मोहिमा सुरू आहे. उत्तरप्रदेशात सर्व जिल्ह्यांत अलर्ट जारी करण्यात आला
आहे, तर महाराष्ट्रातही पोलिस आणि गुप्तचर यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात
आले आहेत.
दरम्यान, हरियाणा पोलिस तसंच जम्मू काश्मीर
पोलिसांनी काल एका संयुक्त कारवाईत दिल्लीजवळ फरीदाबाद
इथून एका काश्मिरी डॉक्टरला अटक केली. या डॉक्टरच्या घरातून पोलिसांनी सुमारे ३००
किलो RDX,
AK-47 आणि इतर सामग्री जप्त केली.
****
देशातल्या दोन लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या
प्रत्येक शहरात येत्या पाच वर्षांत किमान एक नागरी सहकारी बँक उभारण्याचं आवाहन, केंद्रीय
सहकार मंत्री अमित शहा यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं काल सहकारिता महाकुंभ २०२५
या, शहरी सहकारी कर्जासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते
बोलत होते. शहा यांनी सहकार डिजी पे आणि सहकार डिजी लोन या दोन डिजिटल मंचांचा
यावेळी प्रारंभ केला. अमूल आणि इफको या भारताच्या सहकार क्षेत्रातल्या कंपन्यांनी, जगातल्या आघाडीच्या सहकारी संस्था म्हणून स्थान मिळवल्याबद्दल शहा यांनी
त्यांचं अभिनंदन केलं. सहकार संस्थांनी कामाचा दर्जा सुधारणं, आर्थिक
शिस्त कायम ठेवणं आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानात पारंगत असलेल्यांना या प्रणालीत
आणणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या
टप्प्यासाठीचं मतदान आज होत आहे. या टप्प्यात १२२ मतदारसंघासाठी मतदान होणार असून, एक
हजार ३०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तीन कोटी ७० लाख मतदार या
उमेदवारांमधून आपल्या लोकप्रतिनिधीची निवड करतील. दोन्ही टप्प्याची मतमोजणी येत्या
१४ तारखेला होणार आहे.
****
राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला कालपासून सुरुवात झाली. उमेदवारांना
नामनिर्देशनपत्र तसंच शपथपत्र ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक
आयोगाने स्वतंत्र संकेतस्थळ विकसित केलं आहे. यासाठी ६६४ उमेदवारांनी ऑनलाईन
पद्धतीने नोंदणी केली आहे. इच्छुकांना १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
निवडणुकीसाठीचं मतदान दोन डिसेंबरला, तर मतमोजणी तीन डिसेंबरला
होणार आहे.
****
मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार
असल्याचं पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं पत्रकार
परिषदेत बोलत होते. कोणताही पक्ष आघाडीचा प्रस्ताव घेऊन आला तर विचार होईल, मात्र
सध्या काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नुकतीच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली
आहे. जिल्ह्यातल्या सहा नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक
निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
लातूर इथं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा
ठाकूर-घुगे यांनी काल आढावा बैठक घेतली. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये
प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने पार पाडावीत, अशा सूचना त्यांनी
दिल्या.
बीड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक तसंच
नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दोनशेहून अधिक
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काल घेण्यात आल्या.
****
अन्नदाता असलेला शेतकरी आता ऊर्जादाता झाल्याचं प्रतिपादन, केंद्रीय
रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. लातूर जिल्ह्याच्या औसा
तालुक्यातल्या किल्लारी इथल्या श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या
४२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ काल गडकरी यांच्या हस्ते झाला, त्यावेळी
ते बोलत होते. इथेनॉलचा इंधन म्हणून वापर वाढत असून, अनेक वाहन कंपन्या
इथेनॉलवर चालणारी वाहनं तयार करत असल्याचं सांगत, शेतकऱ्यांची
इथेनॉलचे पंप सुरू करावेत,
असं आवाहन गडकरी यांनी केलं. ते म्हणाले...
बाईट
- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार
अभिमन्यू पवार,
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यावेळी उपस्थित होते. ऊसाचं
उत्पादन ६० टनांच्या वर नेलं पाहिजे, उत्पादन वाढलं तर भाव वाढेल
आणि शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल होईल, असं गडकरी यावेळी म्हणाले.
लातूर जिल्ह्यातल्या निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचाही त्यांनी या
दौऱ्यात आढावा घेतला.
****
बीड जिल्ह्यात ओंकार साखर कारखान्याच्या युनिट क्रमांक आठ
चा बॉयलर अग्निप्रदिपन तसंच गळीत हंगामाचा शुभारंभ मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते काल करण्यात आला. यंदा कारखान्याचं उद्दिष्ट
दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं असल्याचं मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
****
नांदेड इथल्या प्रसिद्ध साहित्यिक आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.
वृषाली किन्हाळकर यांना यावर्षीचा शिरीष पै जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
आत्रेय, परचुरे प्रकाशन आणि डिंपल पब्लिकेशनच्या संयुक्त विद्यमाने येत्या १५
नोव्हेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात डॉ. किन्हाळकर यांना हा पुरस्कार
समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या मराठवाड्यातल्या त्या
पहिल्याच लेखिका ठरल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्रावरील दंड तसंच विलंब शुल्क
माफ करण्यात आलं आहे. येत्या ३१ जानेवारी २०२६ पर्यंत या निर्णयाचा लाभ
विद्यार्थ्यांना घेता येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
जालना इथं काल सकल ओबीसी आणि भटके विमुक्त महासंघाच्या
वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचं एका सभेत
विसर्जन झालं. या सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधीज्ञ प्रकाश
आंबेडकर यांनी मार्गदर्शन केलं. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या
हैदराबाद गॅजेट अध्यादेशामुळे खऱ्या ओबीसी समाजाचं नुकसान होत
असल्याचं मत आंबेडकर यांनी व्यक्त केलं.
****
लातूर इथं काल शहर भाजपच्यावतीनं राष्ट्रीय एकता दौड
घेण्यात आली. या दौडमध्ये पाच हजारापेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. दोन
टप्प्यात घेण्यात आलेल्या या दौडचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी हिरवा झेंडा दाखवून केला.
****
जालना जिल्ह्यातल्या बदनापूर पोलीस ठाण्यात कार्यरत एका
पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल ७० हजार रुपये लाच घेताना
रंगेहाथ अटक केली. आधार भिसे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून, एका
गुन्ह्यात आरोपपत्रात सहकार्य करण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती.
****
राज्यात काल जळगाव इथं सर्वात कमी ९ पूर्णांक पाच अंश
सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्या खालोखाल नाशिक इथं १० पूर्णांक आठ अंश तापमान
नोंदवलं गेलं. मराठवाड्यात बीड इथं ११ पूर्णांक पाच अंश, छत्रपती
संभाजीनगर इथं ११ पूर्णांक आठ अंश, परभणी इथं १४ अंश तर
धाराशिव इथं १४ पूर्णाक चार अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment