Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date - 15
November 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ दुपारी
१.०० वा.
****
इंग्रजांच्या जुलमी अत्याचाराविरोधात लढा देत
स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी संस्कृतीचं रक्षणाचं कार्य
केल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भगवान बिरसा मुंडा
यांच्या जयंतीनिमित्त नागपूर इथं राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं
उद्घघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या
हस्ते झालं. त्यावेळी आज ते
बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती.
इंग्रजांविरोधात बिरसा मुंडा यांनी मोठा लढा उभारला आणि आदिवासी समाजाला जमीन, जंगल आणि पाण्याचा हक्क पुन्हा मिळवून देण्याचं क्रांतिकारी कार्य केल्याचं
मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती
सी.पी. राधाकृष्णन, आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज
नवी दिल्लीतील संसद संकुलात भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त
त्यांना पुष्पांजली वाहिली. २०२१ पासून देशभरात बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी
गौरव दिन म्हणून साजरी केली जात असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बिरसा मुंडा यांच्या
जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं. आदिवासी
अभिमान दिनाच्या या शुभ प्रसंगी, संपूर्ण राष्ट्र
मातृभूमीच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या अतुलनीय योगदानाचे आदरपूर्वक
स्मरण करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. परकीय राजवटीतील अन्यायाविरुद्धचा त्यांचा
संघर्ष आणि बलिदान प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील असं पंतप्रधानांनी सामाजिक
माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या
स्फोटप्रकरणी नवी दिल्ली पोलिसांनी नवीन गुन्हा नोंदवला आहे, तर हरियाणा पोलिसांनी अल फलाह विद्यापीठातील आणखी दोन संशयित डॉक्टरांना
ताब्यात घेतले आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाला भारत सरकारने यापुर्वीच 'दहशतवादी कृत्य' असल्याचं घोषित केलं आहे.
****
पुणे मुंढवा इथल्या कोट्यवधी रुपयांच्या शासकीय जमिनीचा
बेकायदेशीर व्यवहार काही निवडक खाजगी व्यक्ती आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने
करण्यात आला असून, शासनाच्या मालकीची जमीन हडपण्याचा हा
सुनियोजित कट होता असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला
आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या सर्व अधिकारी आणि लाभार्थ्यांवर तसंच पार्थ
पवारांच्या मालकीच्या अमेडिया कंपनीवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी
मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी
पत्र लिहून केली आहे. राज्यसरकारने प्रामाणिकपणा दाखवावा
आणि मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही दोषींना वाचवू नये, असं
आवाहनही वडेट्टीवार यांनी या पत्राद्वारे केलं आहे.
****
दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी केलेला हा आरोप योग्य असून
या प्रकरणी राज्यशासन तसंच केंद्रसरकारही पार्थ पवार यांना पाठीशी घालत असल्याचं
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथे आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
****
देशाच्या उन्नतीसाठी मानवता आणि व्यक्तीचे शुद्ध आचरण
अत्यंत महत्वाचं असून मानवतेशिवाय कोणताही देश जिवंत राहू शकत नाही, असं भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचे सुपूत्र आणि माजी खासदार सुनील
शास्त्री यांनी म्हटलं आहे. विश्व शांती केंद्र आळंदी, माईर्स
एमआयटी,
पुणे तसंच मानवता तीर्थ रामेश्वर रूई यांच्या संयुक्त
विद्यमाने जगातील सर्वात मोठ्या आणि विस्तीर्ण दालन असलेल्या ‘विश्वधर्मी मानवता
तीर्थ भवनाचं’ लोकर्पण लातूर इथं विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर या ठिकाणी
मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.
****
छत्रपती संभाजी नगर इथल्या भारतीय जनता पक्षाच्या
कार्यालयाचा उद्घघाटन समारंभ उद्या १६ नोव्हेंबर रोजी होत असून मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. मंत्री अतुल
सावे,
खासदार डॉक्टर भागवत कराड, आमदार
अनुराधा चव्हाण यांनी आज या ठिकाणी भेट देऊन उद्घघाटन समारोहाच्या तयारीचा आढावा
घेतला.
****
नांदेड जिल्ह्यातील उद्योजकांनी शासनाच्या मैत्री सहाय्य
प्रणालीचा लाभ घ्यावा. यासाठी नोंदणी, सहभाग तसंच लाभाच्या
विविध सुविधेबाबत काही अडचण, समस्या असल्यास सल्ला आणि
मार्गदर्शनासाठी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन सहकारी औद्योगिक
वसाहत शिवाजीनगर नांदेड इथे संपर्क साधावा, असं
आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केलं आहे.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत १ ट्रिलीयन
डॉलर्सपर्यंत पोहंचवून राज्यात उद्योग स्थापनेसाठी उद्योग, व्यापार
तसंच सेवाक्षेत्रातील गुंतवणूकदारांना सर्व आवश्यक परवाने, मंजूरी, ना-हरकती,
सवलती आणि तक्रार निवारण या सेवांचा वेगवान, पारदर्शक आणि सुलभपणे लाभ एकाच ठिकाणी मिळावा, यासाठी
एक खिडकी प्रणाली म्हणून उद्योग विभागातंर्गत मैत्री अर्थात महाराष्ट्र ट्रेड
इनव्हेसमेंट फॅसीलिटेशन या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment