Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 15 November
2025
Time 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १५ नोव्हेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर नजिक नौगाम पोलिस ठाण्यात
ठेवलेल्या स्फोटकांच्या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ३२ जण जखमी झाले
आहेत. जम्मू आणि काश्मीरचे पोलिस महासंचालक नलिन प्रभात यांनी आज पत्रकार परिषदेत
ही माहिती दिली. हरियाणाच्या फरीदाबाद इथून जप्त केलेल्या स्फोटकांचा नमुना
घेतांना काल रात्री उशीरा हा स्फोट झाला. या दुर्घटनेतील जखमींवर जवळच्या
रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळामार्फत इयत्ता दहावीच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षेचे
विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरायच्या तारखांना मुदतवाढ देण्यात आली आहे. विलंब
शुल्कासह अर्ज भरावयाची मुदत परवा १७ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे तर विलंब
शुल्काने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क आरटीजीएस किंवा
एनईएफटीद्वारे भरणा करण्यासाठीची मुदत १८ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. www.mahahsscboard.in
या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार
आहेत.
विलंब शुल्काने आवेदनपत्रं सादर करण्याच्या तारखांना पुन्हा
मुदतवाढ देण्यात येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद
घ्यावी,
असं राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी स्पष्ट केलं आहे.
****
स्वातंत्र्य सैनिक तथा आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा
यांच्या आज दीडशेवी जयंती, यानिमित पंतप्रधान नरेंद्र
मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
जनजाती गौरव दिनाच्या या औचित्याने संपूर्ण देश मातृभूमीच्या गौरवाच्या
रक्षणाप्रती अमूल्य योगदान देणाऱ्या बिरसा मुंडा यांचं श्रद्धापूर्वक स्मरण करत
असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या सामाजिक प्रसार माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.
बिरसा मुंडा हे भारतीय गौरवाचं प्रतीक आणि महान स्वातंत्र्यसैनिक असल्याचं
गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. बिरसा मुंडा यांचं जीवन प्रत्येक
देशभक्तासाठी प्रेरणेचा स्त्रोत असल्याचंही त्यांनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे.
दरम्यान भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशे व्या जयंतीनिमित्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर जिल्ह्यातल्या मानकापूर इथं
जनजातीय गौरव वर्ष, राज्यस्तरिय आदिवासी सांस्कृतिक
महोत्सवाचं आयोजन आज करण्यात आलं आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांची नवी
दिल्ली इथं भेट घेत पायाभूत सुविधांच्या संशोधित वीज वितरण क्षेत्र योजनेसाठी
महाराष्ट्राला २ हजार ६५५ कोटी रुपये देण्याची मागणी केली आहे. हा निधी लवकरच दिला
जाईल असं आश्वासन खट्टर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलं. तसंच ८ हजार मेगावॅट
तास क्षमतेच्या ऊर्जा साठवण प्रकल्पासाठीचा तूट निधी देण्यासाठीही सकारात्मक
कार्यवाही करु असंही सांगितलं.
****
बीड जिल्ह्यात विविध भागात ९०० जनावरांना लंपी त्वचारोग
बाधा झाली आहे. यात ५८ जनावरांनाचा मृत्यू देखील झाला असून पशुपालक चिंतेत आहेत.
या गंभीर स्थितीत प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
लिहून केली आहे.
सद्यस्थितीत बीड जिल्ह्यात लंपी त्वचारोगाचा प्रादुर्भाव
मोठ्या प्रमाणावर झाला असून जिल्ह्यात आतापर्यंत ९०० जनावरे बाधित झाली आहेत, यातील ५८ जनावरांचा मृत्यू झाला तर ६३४ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत.
दरम्यान,
३ लाख ४१ हजार १३५ जनावरांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे.
या आजारामुळे शेतकरी वर्गावर मोठा आर्थिक परिणाम झाला असून, दूध उत्पादनात घट झाली आहे, असंही खासदार सोनवणे यांनी
स्पष्ट केलं आहे.
****
नाशिक शहरात भरवस्तीत काल दुपारच्या सुमारास बिबट्याने
तब्बल चार तास धुमाकूळ घालत दोन कर्मचाऱ्यांसह सात नागरिकांना जखमी केलं. अखेर
साडेपाच वाजेच्या सुमारास वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी बंदुकीच्या साहाय्याने
भुलीचं इंजेक्शन देत बिबट्याला बेशुद्ध करुन पिंजऱ्यात बंद केलं. राज्याचे जलसंपदा
मंत्री गिरीश महाजन यांनीही घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. दरम्यान छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात खंडाळा इथंही काल बिबट्या आढळला.
त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी अणि लहान मुलांना घराबाहेर पडू देऊ नये, असं आवाहन वनविभागाने केलं आहे.
****
भारताच्या लक्ष्य सेन यानं जपानच्या कुमामोटो मास्टर्स
बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. लक्ष्यने काल गेल्या वेळचा
विश्वविजेता सिंगापूरच्या लोह कीन यू याला २१-१३, २१-१७
असं पराभूत केलं. उपांत्य फेरीत आज लक्ष्यचा सामना जपानच्या केंटा निशीमोटो
याच्याशी होणार आहे. या स्पर्धेत आव्हान टिकवून ठेवलेला लक्ष्य हा एकमेव भारतीय
बॅडमिंटनपटू आहे.
****
No comments:
Post a Comment