Sunday, 16 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 16.11.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 16 November 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ नोव्हेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत. सिडको चौकात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं तसंच हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या क्रांती चौक परिसरातल्या अर्धपुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. कमल तलावाच्या पुनर्जिवन प्रकल्पाचं लोकार्पणही ते करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सातारा परिसरातील श्रीयश आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालय तसंच संशधोन केंद्राच्या नव्या इमारतीचं उदघाटनही केलं जाणार आहे. या कार्यक्रमांच्या वेळेत या रस्त्यांवरची वाहतुक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर इथल्या भाजप कार्यालयाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार आहे

***

नवे शैक्षणिक धोरण व्यावहारिक असून, यात संशोधनावरही भर देण्यात आला आहे आणि हे धोरण आधुनिक काळातल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना पुढे नेणारं आहे असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मुंबईत एका  प्रदर्शनाचं उदघाटन त्यांच्या हस्ते काल संध्याकाळी झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुलांच्या शिक्षणात आणि विकासात कला आणि सर्जनशील विषयांची भूमिका महत्त्वाची असते, असं ते म्हणाले.

***

राज्य सरकारनं नेमलेल्या त्रिभाषा धोरण समितीनं या धोरणासंदर्भात सर्व स्तरातील लोकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी प्रश्नावली  आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध केले आहेत. या पर्यायांद्वारे सर्व सुजाण नागरिकांनी आपला अभिप्राय अवश्य कळवावा असं आवाहन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी केलं आहे. tribhashasamiti.mahait.org. असं हे संकतस्थळ आहे.

मराठी, इंग्रजी आणि हिंदी माध्यम तसंच ही तिन्ही माध्यमं वगळता इतर माध्यमाच्या शाळांसाठी अशा या चार प्रश्नावली आहेत. यापैकी एका प्रश्नावलीचा पर्याय नागरिकांनी निवडायचा आहे. त्याची उत्तरं देण्यासाठी बहुविध पर्याय दिले आहेत. त्यापैकी योग्य पर्यायाची निवड करुन ते सादर करायचे आहेत. तसंच मतावलीमध्ये विविध संस्था, संघटना, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांचे अभिप्राय जाणून घेण्यासाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं देऊन ती भरायची आहे .

***

नवी दिल्लीत आयोजित ४४व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात काल 'महाराष्ट्र दिन' अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राज्याच्या मातीतील कलांचं मनोहारी दर्शन संस्कृतिक कार्यक्रमातून  यावेळी उपस्थितांना घडविण्यात आलं.

***

 

पुण्याच्या नवले पूल परिसरात अपघात थांबविण्यासाठी तातडीनं करावयाच्या उपाययोजनांची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर सोपवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल विविध यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या महामार्गावर आता स्पीड गनची संख्या वाढवून सहा करावी, वाहनांची वेगमर्यादा प्रति तास साठ ऐवजी तीस किलोमीटर अशी करावी.

प्रादेशिक परिवहन विभागामार्फत खेड शिवापूर पथकर नाक्यावर जड आणि अवजड वाहनांतील अतिभार, ब्रेक तसंच इतर तांत्रिक बाबींची तपासणी करावी. या वाहनांच्या चालकांनी नियमांचं उल्लघंन केल्यास पुढील नाक्यावर त्यांना दंड करण्यात येईल.रस्त्यावर रिफ्लेक्टर्सच्या संख्येत वाढ करावी. रस्त्यावरील प्रवाशांची गर्दी कमी करण्याकरिता जागा निश्चित करुन अधिकृत बस थांबे करावेत इत्यादी निर्देश या बैठकीत देण्यात आले.

***

भारत-दक्षिण अफ्रिका दरम्यान,कोलकाताच्या इडन गार्डन इथं सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज तिस-या दिवसाच्या  पहिल्या सत्रातील खेळ सुरू आहे. दक्षिण अफ्रिकेनं आपला दुसरा डाव कालच्या सात बाद ९३ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, दक्षिण अफ्रिकेचा दुसरा डाव १५३ धावांवर सर्व बाद झाला आहे. भारताला या कसोटीत विजयासाठी १२४ धावांची आवश्यकता आहे. 

***

ग्रेटर नोएडा इथं आयोजित जगतिक मुष्टीयुध्द चषक अंतिम स्पर्धेला आज प्रारंभ होत आहे.ही स्पर्धा जागतिक मुष्टीयुध्द चषक मालिकेचा एक भाग आहे. ब्राजील, पोलंड आणि कजाखिस्तान इथल्या स्पर्धांनंतर ही स्पर्धा खेळली जात आहे. १८ देशांतील १३० मुष्टीयोध्दे, स्पर्धक  विविध वीस गटात आपलं कौशल्य पणाला लावतील.भारताचे खेळाडू सर्व गटात पदक मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

***

गोव्याच्या पणजी इथं आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ईफ्फी-२०२५चं  येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे.यासंदर्भात आयोजित वार्ताहर परिषदेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत काल माहिती दिली. सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचा संयोग ही यंदाच्या  इफ्फीची संकल्पना असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या महोत्सवात ऐंशी  देशांतले चित्रपटनिर्माते भेट देणार असून देश विदेशातले विविध चित्रपट दाखवले जाणार आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीतल्या योगदानाबद्दल गुरुदत्त, राज खोसला, भानुमती, भुवन, रित्विक तसंच रजनीकांत आणि बालकृष्ण यांचा या महोत्सवात गौरव करण्यात येणार असल्याचं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल. मुरुगन यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

***

No comments: