Monday, 17 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.11.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 17 November 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ नोव्हेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पारंपरिक बी-बियाणांच्या संवर्धनाच्या आवश्यकतेवर भर देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. सरकारनं अन्नधान्य उत्पादनाला प्रोत्साहन दिलं आहे. कुपोषणमुक्तीसाठी फोर्टीफाईड धान्याचे उत्पादन घेण्यात येत आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करुन पीक उत्पादन वाढवणे, कीड आणि कीटनाशकावर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेनं संशोधन करण्याची आवश्यकता चौहान यांनी व्यक्त केली. शिवराज सिंह चौहान आज मुंबईत आयोजित एशिया सीड काँग्रेस कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची याप्रसंगी उपस्थिती होती. हवामान प्रतिकारक बियाणं आणि हवामान बदलाला सामोरं जाणाऱ्या बि-बियाणांच्या निर्मितीवर खासगी कंपन्यांनी संशोधन करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

****

मक्काहून मदीनाला जाणाऱ्या प्रवासी बसची आज पहाटे डिझेल टँकरशी धडक झाली, त्यात अनेक भारतीय उमराह यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्राथमिक अहवालांनुसार, ही घटना भारतीय वेळेनुसार पहाटे दीड वाजता मुफ्रीहात या ठिकाणी घडली. प्राथमिक अहवालात असे दिसून आले आहे की मृतांमध्ये महिला आणि मुले यांचा समावेश आहे. या अपघाताबद्दल परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शोक व्यक्त केला आहे. रियाधमधील दूतावास आणि जेद्दाहमधील वाणिज्य दूतावास या अपघातातील भारतीय नागरिक आणि कुटुंबांना पूर्ण मदत करत आहे, असं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान, अपघातातील बहुतांश यात्रेकरु तेलंगणा राज्यातील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

****

दिल्ली कार स्फोट प्रकरणातील आरोपी अमीर रशीद अली याला दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टानं १० दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. काल राष्ट्रीय तपास यंत्रणेनं त्याला अटक केली होती.

****

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीनंतर नितीशकुमारांनी राज्यपालांची भेट घेतली आणि विद्यमान सरकार बरखास्त करण्याची शिफारस करणारं पत्र राज्यपालांना सादर केलं. यानंतर आता नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु होईल. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं २४३ पैकी २०२ जागा जिंकून तीन-चतुर्थांश बहुमत मिळवलं आहे.

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील थोर क्रांतिकारक लाला लजपत राय यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. स्वातंत्र्य चळवळीतील लाला लजपत राय यांच्या क्रांतिकारी विचारांचे आणि गरीब, शेतकरी आणि तरुणांना सशस्त्र क्रांती करण्यासाठी प्रेरित करण्याच्या त्यांच्या भूमिकेचं शहा यांनी स्मरण केलं.

****

बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण आज माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांशी संबंधित प्रकरणी निकाल देणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर ढाक्यात सुरक्षा वाढवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेख हसीना यांच्यावरील आरोप गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील उठावाशी संबंधित आहेत, ज्या दरम्यान तत्कालीन अवामी लीग सरकारनं आंदोलन हिंसकपणे दडपल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दौलताबाद इथं आजपासून कुष्ठरोग शोध मोहिमेला सुरुवात झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या हस्ते कुष्ठरोग शोध मोहिमेचं जिल्हास्तरीय उद्घाटन करण्यात आलं. या मोहिमेतून संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून, निदान झाल्यास त्यांना तत्काळ बहुविध औषधोपचार सुरू करण्यात येणार आहेत. घरोघर भेटींद्वारे समोर न आलेले, निदान न झालेले रुग्ण शोधणे, त्यांना उपचाराच्या कक्षेत आणणे, संसर्गाची साखळी खंडित करणे आणि समाजात कुष्ठरोगाबाबत जनजागृती वाढवणे हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. २०२७ पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसारहे ध्येय गाठण्यासाठी ही मोहीम महत्वाची आहे. राज्यभर १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

****

मुंबई इथं २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी डब्ल्यूटीसीए आशिया पॅसिफिक या जागतिक व्यापार परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे. या परिषदेसाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह केंद्र, राज्य आणि परदेशातून अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र मंत्रालय, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमएमआरडीए यांच्या सहकार्यानं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

****

लातूर जिल्ह्यात शिरूर ताजबंद इथं विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत नाफेड खरेदी केंद्राचं उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आज झालं. या भागातील शेतकऱ्यांची गरज ओळखून नाफेड खरेदी केंद्र सुरु करण्यात आल असल्याचं पाटील यावेळी म्हणाले.

****

भंडारा  जिल्ह्यात  अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी भारतीय नता क्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहेत. यात भंडारा शहरात विविध पक्षाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.

****

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.12.2025 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 29 December 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छ...