Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 November 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
· संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन बी बियाणे कायदा आणण्याचं
केंद्रीय कृषी मंत्र्यांचं सुतोवाच
· येत्या दोन ते तीन वर्षांत २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा
राज्य शासनाचा संकल्प
· नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत संपली- उद्या
अर्जांची छाननी
· विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी हिंसाचार केल्याच्या आरोपावरून
बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना फाशीची शिक्षा
· उमराहसाठी गेलेल्या ४२ भारतीयांचा एका प्रवासी बसच्या अपघातात मृत्यू
आणि
· शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तेराव्या स्मृतिदिनानिमित्त सर्वत्र
अभिवादन
****
निकृष्ट तसंच अनधिकृत बियाणे विक्रीवर
निर्बंधासाठी संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन बी बियाणे कायदा
आणण्याचं सुतोवाच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. आज
मुंबईत आशियाई बियाणे परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रात बागायती पिकांना
गुणवत्तापूर्ण रोपसामग्री मिळावी यासाठी तीन क्लीन प्लांट सेंटर स्थापन केले जात असल्याचं
चौहान यांनी सांगितलं. पारंपारिक बियाण्यांच्या संवर्धनावर भर देण्याची गरज चौहान
यांनी व्यक्त केली, ते म्हणाले -
बाईट - केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान
कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी
धान्यांच्या विशेष वाणांवर संशोधन केलं जात असून, अशी
दोनशेहून अधिक वाणं तयार केल्याची माहिती चौहान यांनी दिली. ते म्हणाले -
केंद्रीय कृषी मंत्री
शिवराज सिंह चौहान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. राज्यात पुढील दोन ते तीन वर्षांत २५ लाख हेक्टर
जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा शासनाचा संकल्प असून, बियाणे
उत्पादक कंपन्यांनी नवकल्पना दिल्यास आपण शाश्वततेकडे जाऊ शकतो, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हवामान बदलाच्या
पार्श्वभूमीवर हवामान-प्रतिरोधक वाणांची गरज अधिक वाढली असल्याकडे
मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं.
****
अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी
विद्यापीठ अंतर्गत विदर्भातील अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर यंदा ४० हजार क्विंटल
बीजोत्पादन होणार आहे. त्यामध्ये सोयाबीन तूर उडीद मूग आणि आंबा या पिकाच्या
उत्पादनाचा समावेश आहे, अशी माहिती कृषी
विद्यापीठाच्या सूत्रांनी दिली.
****
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय
विभागातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार यंदा राज्यातल्या दोन
दुग्धोत्पादक शेतकऱ्यांनी पटकावला आहे. देशी दुभत्या पशुंचे संगोपन करणाऱ्या
सर्वोत्कृष्ट दुग्धोत्पादक शेतकऱ्यांच्या श्रेणीत कोल्हापूरच्या अरविंद यशवंत
पाटील आणि श्रद्धा धवन यांनी पुरस्कार पटकावले आहेत. अरविंद पाटील यांनी पहिला
क्रमांक मिळवला असून श्रद्धा धवन यांना तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
****
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी
आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज मावळत्या
मंत्रिमंडळाची शेवटची बैठक झाली. यात मंत्रिमंडळ बरखास्तीचा प्रस्ताव मंजूर झाला.
त्यानंतर नितीश कुमार यांनी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला.
त्यामुळे नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या गुरुवारी २०
नोव्हेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. संयुक्त जनता दलाचे नेते
नितीशकुमार २०१५ पासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत.
****
नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी
अर्ज करण्याची मुदत आज संपली. उद्या, मंगळवारी अर्जांची
छाननी होणार आहे. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर १९ ते २१
नोव्हेंबर या दरम्यान ज्या प्रभाग किंवा अर्जावर अपिल आहे असे सोडून इतर ठिकाणी
अर्ज मागे घेता येतील. २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर
करण्यात येणार आहे.
****
बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख
हसिना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात
विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी हिंसाचार केल्याच्या आरोपावरून शेख हसीना
यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री असदुज्जमन खान कमाल आणि माजी पोलीस महानिरीक्षक
चौधरी अब्दुल्ला अल मामुन यांना दोषी ठरवत ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायमूर्ती
मोहम्मद गोलम मुर्तुजा मजुमदार यांच्या अध्यक्षतेखालच्या न्यायाधीकरणाने हा निकाल
दिला.
दरम्यान, शेख
हसिना यांनी खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी बांगलादेशात परतायला नकार
देत सर्व आरोप फेटाळून लावले. असदुज्जमन खान कमाल यांनी बांगलादेश सोडून इतरत्र
आश्रय घेतला आहे. तर चौधरी अब्दुल्ला अल मामुन सध्या बांगलादेशात पोलीस कोठडीत
असून त्यांनी गुन्हा मान्य केला आहे.
****
सौदी अरेबियात एका प्रवासी बसचा अपघात
होऊन ४२ भारतीयांचा मृत्यू झाला. हे सर्वजण हैदराबाद इथले रहिवासी होते. उमराह
यात्रा पूर्ण करून, मक्का शहरातून ही बस मदिनाकडे जाताना, डिझेल टँकरवर धडकल्यानं हा अपघात झाला. मृतांमध्ये २० महिला आणि ११ बालकांचा
समावेश आहे.
उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसंच तेलंगणाचे मुख्यमंत्री
ए रेवन्त रेड्डी यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींवर उपचारासाठी
भारतीय अधिकारी सौदी अरेबिया प्रशासनाच्या निरंतर संपर्कात असल्याचं पंतप्रधानांनी
समाज मध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या
तेराव्या स्मृतिदिनानिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या आनंदआश्रमात बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन
केलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज
ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीयांनी मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेबांच्या
स्मृतिस्थळावर पुष्पांजली अर्पण केली. शिवसेना, मनसे
आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनीही
स्मृतिस्थळावर आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाज
माध्यमावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय दुध डेअरी
चौक परिसरात बाळासाहेबांच्या स्मारकाची साफसफाई करून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार
अर्पण करत अभिवादन करण्यात आलं.
****
लातूर इथं राज्य हौशी मराठी नाट्य
स्पर्धेचं आज सायंकाळी सात वाजता उद्घाटन होणार आहे़. लातूर शहरातल्या स्वर्गीय
दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात ही स्पर्धा होणार असून १२ नाटकांचा यात समावेश
आहे़. १२ दिवस दररोज सायंकाळी ७ वाजता ही नाटकं सादर होणार असल्याचं, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी सांगितलं आहे.
****
धाराशिव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष
पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मंजुषा विशाल साखरे यांना उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धूरगुडे आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मंजूषा साखरे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज
सादर केला.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या
कुष्ठरोग शोध अभियानाला आजपासून प्रारंभ झाला. दौलताबाद इथल्या प्राथमिक आरोग्य
केंद्रात,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या हस्ते
कुष्ठरोग शोध मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन झालं. येत्या दोन तारखेपर्यंत ही
मोहीम राबवली जाणार आहे.
****
संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२९वा
संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आपेगाव या माऊलींच्या
जन्मगावी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज
कोल्हापूरकर यांनी माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या कीर्तनाचं सादरीकरण केलं. दरम्यान, दुपारच्या सुमारास माऊलीच्या मुर्तीवर सूर्यकिरण पोहोचताच भाविकांनी माऊलीचा
गजर करत पुष्पवृष्टी केली.
****
छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या
विद्यार्थ्यांनी आज तिरुवनंतपुरम इथं विक्रम साराभाई स्पेस सेंटर ला भेट दिली. या
विद्यार्थ्यानी रॉकेट प्रक्षेपण पाहिलं, तसंच पूर्वी
प्रक्षेपण झालेल्या रॉकेटच्या प्रतिकृतींसह, चंद्रयान
तीनची प्रतिकृती पाहिली. केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी गगनयान मोहिमबाबतही
विद्यार्थ्यांना माहिती दिली. केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक
जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या अभ्यास सहलीचं कौतुक केलं.
****
राज्यात आज सर्वात कमी साडे नऊ अंश
तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. जळगाव इथं नऊ पूर्णांक आठ तर नाशिक इथं नऊ
पूर्णांक नऊ अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथे १० पूर्णांक दोन, परभणी इथं ११ पूर्णांक तीन तर छत्रपती संभाजीनगर इथं १२ पूर्णांक चार अंश
सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment