Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 17 November 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचं चित्र
दोन दिवसांत स्पष्ट होईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची
माहिती
·
शाळा आणि महाविद्यालयांना
शालेय सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून मिळणार
नवीन बस
· बिहारमध्ये सरकार स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग
· कोलकाता कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा विजय, मालिकेत
१-० नं आघाडी
आणि
· मराठवाड्यासह विदर्भात आज आणि उद्या थंडीची लाट
****
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी
महायुतीच्या जागावाटपाचं चित्र येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं
पत्रकारांशी बोलत होते. महापालिकांच्या निवडणुका शक्य तिथे महायुतीच्या माध्यमातून
लढवल्या जातील,
मात्र स्थानिक पातळीवरील निवडणुकांबाबतचे सर्व निर्णय स्थानिक
पातळीवर होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते काल छत्रपती संभाजीगर इथं माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि मराठवाडा मुक्तीसंग्रमाचे
प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. स्वामी रामानंद
तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत करण्याचं कार्य केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय
सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळ-एसटीच्या नवीन बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. परिवहन
मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. शिक्षण संस्था
आणि विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता यावा हा यामागचा उद्देश
असल्याचं त्यांनी सांगितलं. सहलींसाठी शाळा महाविद्यालयांना सवलीत बस उपलब्ध करून दिल्यानं, महामंडळाला मागच्या वर्षी ९२ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला होता. त्याअनुषंगानंच
यावर्षी देखील या शाळा महाविद्यालयांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे..
****
रसायनांच्या अतिवापरामुळे शेतजमीन ओसाड झाली
असून विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी नैसर्गिक शेतीला पर्याय नसल्याचं, राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत राजभवनात संकल्प फाउंडेशनतर्फे
‘नैसर्गिक कृषी - अनुपम भारतीय वारसा’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रात बोलत होते.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी, असं
आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं.
****
राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुकीत
मंत्री नरहरी झिरवाळ आणि माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखालच्या पॅनलचा विजय
झाला आहे. महामंडळाच्या सतरा जागांसाठी १४ नोव्हेंबरला मतदान झालं होतं.
****
बिहारमध्ये सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींनी
वेग घेतला आहे. संयुक्त जनता दल-जदयू विधिमंडळ पक्षाची आज बैठक होणार असून, यावेळी पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होण्याचे
संकेत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी -एनडीएचे पाचही घटक पक्ष आपापल्या विधिमंडळ पक्षाच्या
नेत्यांची निवड करण्यासाठी स्वतंत्र बैठका घेतील, त्यानंतर
एका संयुक्त बैठकीत एनडीएच्या नेत्याची निवड केली जाणार आहे. त्यानंतर आमदारांच्या
पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे सादर करून सरकार स्थापनेचा दावा केला जाईल. मुख्यमंत्री
नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज मावळत्या मंत्रिमंडळाची बैठक होईल, यात मंत्रिमंडळ बरखास्तीचा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे.
****
राष्ट्रीय पत्रकारिता दिन काल साजरा झाला.
१९६६ मध्ये या दिवशी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना झाली होती. वर्तमानपत्रं आणि
प्रसारमाध्यमांवर नैतिकदृष्ट्या देखरेख ठेवण्याचं काम ही संस्था करते. नवी दिल्ली इथं
राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त झालेल्या समारंभाला माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी
वैष्णव,
राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन, तसंच
प्रेस कौन्सिलच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई उपस्थित होत्या. लोकशाहीमध्ये
पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी यावेळी नमूद केलं.
****
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात काल सुरक्षा
दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश
आहे. या तिघांवर १५ लाख रुपयांचं बक्षीस होतं. या परिसरातून रायफल, इतर शस्त्रं आणि स्फोटकंही पोलिसांनी जप्त केली.
****
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट
प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आमीर रशीद अली, या
काश्मीरच्या रहिवाश्याला काल दिल्लीतून अटक केली. अमीर यानं, उमर नबी याच्यासोबतीनं या स्फोटाचा कट रचला होता, असं
तपास यंत्रणेनं सांगितलं. या स्फोटात वापरलेल्या कारची नोंदणीही आमीर याच्या नावावर
होती अशी माहिती तपास यंत्रणेनं दिली आहे.
****
मुंबईच्या नौदल गोदीवर दहशतवादी हल्ला होणार
असल्याचा फोन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गोदीचे कर्मचारी
असणाऱ्या या दोघांपैकी एकानं मद्याच्या अंमलाखाली पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन
केला,
आणि गोदीवर हल्ला होणार असल्याची माहिती आपल्याला दुसऱ्या कुणा
व्यक्तीकडून मिळाल्याचं सांगितलं होतं.
****
कोलकाता कसोटीत दक्षिण आफ्रिकेनं तिसऱ्याच
दिवशी भारताचा ३० धावांनी पराभव करत, दोन सामन्यांच्या मालिकेत
१-० अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेनं काल आपला दुसरा डाव ७ बाद ९३ धावांवरून पुढे
सुरू केला. आठव्या गड्यासाठी कर्णधार टेम्बा बवुमा आणि कॉर्बिन यांनी ४४ धावांची भागिदारी
केली. पाहुण्या संघाचा दुसरा डाव १५३ धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात ३० धावांची
आघाडी असल्यानं भारताला दुसऱ्या डावात विजयासाठी १२४ धावांचं आव्हान मिळालं. मात्र
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या ९३ धावात सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेचा
फिरकी गोलंदाज सायमन हारमर सामनावीर ठरला. दुसरा आणि अखेरचा सामना २२ तारखेला गुवाहाटी
इथं होणार आहे.
****
दृष्टिहीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक
स्पर्धेत काल भारतानं पाकिस्तानचा आठ खेळाडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना
पाकिस्ताननं सात बाद १३५ धावा केल्या. विजयासाठीचं हे आव्हान भारतानं अवघ्या १० षटकांत
दोन खेळाडूंच्या मोबदल्यात पार केलं. भारताकडून सर्वाधिक ६४ धावा करणारी अनेखा देवी
हिला सामनावीर किताबानं गौरवण्यात आलं.
****
तिरंदाज कुशल दलाल यानं लक्झेंबर्गमधील स्ट्रासन
इथं झालेल्या पुरुषांच्या कंपाउंड प्रकारात जीटी ओपन इनडोअर वर्ल्ड सिरीजचं विजेतेपद
पटकावलं आहे. कुशलनं डबल शूट ऑफमध्ये अमेरिकेच्या माजी जागतिक नंबर वन स्टीफन हॅन्सनला
हरवून सुवर्णपदक जिंकलं. गणेश तिरुमुरु यानंही २१ वर्षांखालील पुरुषांच्या कंपाउंड
प्रकारात कांस्यपदक जिंकलं.
****
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे
एकोणतीसाव्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त काल माऊलींच्या जयघोषात श्रींची रथोत्सव
मिरवणूक काढण्यात आली. टाळ मृदुंगाचा निनाद आणि माऊली माऊलीच्या जयघोषाने अलंकानगरी
दुमदुमली होती,
आज समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.
****
भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त
छत्रपती संभाजीनगर इथं देवगिरी महाविद्यालयात काल जनजाती चेतना परिषद उत्साहपूर्ण वातावरणात
पार पडली. जनजाती चेतना परिषद, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ
तसंच दत्ताजी भाले स्मृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली. बिरसा मुंडा
यांच्या कार्याला यावेळी उजाळा देण्यात आला.
****
लातूर शहर महानगरपालिकेत अंतर्गत आजपासून
येत्या दोन डिसेंबरपर्यंत कुष्ठरोग शोध अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने
शहरातील ३० हजार घरांचं सर्वेक्षण होणार असून एक लाख पन्नास हजार लोकसंख्येची प्रत्यक्ष
तपासणी केली जाणार आहे.
हवामान
मराठवाडा आणि विदर्भात आज आणि उद्या थंडीची
लाट राहिल,
असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव
वगळता उर्वरित जिल्ह्यांना थंडीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात निफाडमध्ये काल ८ अंश सेल्सिअस इतकं निचांकी तापमान नोंदवलं गेलं.
****
No comments:
Post a Comment