Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 17 November 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१७ नोव्हेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायत
निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या, मंगळवारी अर्जांची छाननी
होणार आहे. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर १९ ते २१ नोव्हेंबर या
दरम्यान ज्या प्रभाग किंवा अर्जावर अपिल आहे असे सोडून इतर ठिकाणी अर्ज मागे घेता
येतील. २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार
आहे.
दरम्यान,गोंदिया जिल्ह्यातल्या नगर परिषद आणि
नगर पंचायतीची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते
खासदार प्रफुल पटेल यांनी काल गोंदियात केली. गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आणि तिरोडा
या दोन नगर परिषदा, तसंच गोरेगाव आणि सालेकसा या नगर पंचायतीच्या निवडणुका होत आहेत.
*****
शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब
ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेब ठाकरे
यांना मानवंदना देण्यासाठी शिवसैनिक दादर येथील शिवाजी पार्कमधील स्मृतीस्थळाला
भेट देत आहेत. १९ जून १९६६ रोजी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली.
*****
बिहारमध्ये सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींनी
वेग घेतला आहे. संयुक्त जनता दल-जदयू विधिमंडळ पक्षाची आज बैठक होणार असून, यावेळी
पक्षाचे अध्यक्ष नितीश कुमार यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड होण्याचे संकेत
आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी -एनडीएचे पाचही घटक पक्ष आपापल्या विधिमंडळ पक्षाच्या
नेत्यांची निवड करण्यासाठी स्वतंत्र बैठका घेतील, त्यानंतर एका संयुक्त
बैठकीत एनडीएच्या नेत्याची निवड केली जाणार आहे. त्यानंतर आमदारांच्या पाठिंब्याचं
पत्र राज्यपालांकडे सादर करून सरकार स्थापनेचा दावा केला जाईल. मुख्यमंत्री नितीश कुमार
यांच्या अध्यक्षतेखाली आज मावळत्या मंत्रिमंडळाची बैठक होईल, यात
मंत्रिमंडळ बरखास्तीचा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे.
****
माध्यम संस्थांनी लोकशाही
व्यवस्थेचा चौथा स्तंभ म्हणून योग्य भूमिका बजावावी आणि राष्ट्र उभारणीत भागीदार व्हावं
असं आवाहन उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन
यांनी केलं आहे.
हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटी इथं रामोजी एक्सलन्स अवॉर्ड्स २०२५ च्या उद्घाटन
समारंभात ते बोलत होते.
मूल्य-आधारित पत्रकारितेतील रामोजींच्या प्रयत्नांबद्दल उपराष्ट्रपतींनी दिवंगत रामोजी
राव यांची प्रशंसा केली.
डिजिटल युगात खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचा प्रसार थांबवण्याची गरज उपराष्ट्रपतींनी
अधोरेखित केली.
यावेळी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री
एन. चंद्राबाबू नायडू उपस्थित होते.
***
आळंदीत सुरू असलेल्या ७२९व्या संजीवन समाधी सोहळ्यात आज दुपारी
बारा वाजता ओणार्या मुख्य कार्यक्रमात सहभागी
होण्यासाठी, लाखो
वारकरी आळंदीत आले आहेत. या सोहळ्यानंतर हैबत बाबांच्या पादुका पूजनानं सुरू
झालेला माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पूर्णत्वाकडे जाईल.
येत्या गुरुवारी २० तारखेला लौकिक अर्थानं या यात्रेची सांगता होईल
असं आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांनी आकाशवाणीशी बोलतांना
सांगितलं.
***
लातूर केंद्रावर ६४ व्या हौशी राज्य नाट्य
स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे.
यंदा स्पर्धेत १२ नाटकं सादर केली जाणार आहेत. शहरातील स्वर्गीय दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात ही स्पर्धा
होणार आहे. नाट्य
रसिकांनी शहरातल्या रंगकर्मींना प्रोत्साहन
देण्यासाठी आवर्जुन नाटकं बघण्यास यावे असं
आवाहन संयोजन समितीने केलं आहे.
***
सोलापूर जिल्ह्यात आजपासून २ डिसेंबरपर्यंत कुष्ठरुग्ण शोध अभियान
राबविण्यात येणार आहे . यासाठी २हजार ७६८ स्त्री-पुरुषांची पथकं तयार करण्यात आली असून ही पथकं घरोघरी जाऊन शारीरिक तपासणी करून संशयित
कुष्ठरुग्णांचा शोध घेणार आहेत.
***
सीमावर्ती भागातल्या
पर्यटनाला चालना देण्याच्या दिशेने सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून, सिक्कीम सरकारने ‘डोकलाम’ आणि ‘चो-ला’ ही
धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणं पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिक्कीमच्या पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सी.एस. राव यांनी वार्ताहर
परिषदेत ही माहिती दिली.
***
नाशिक,पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये मानव –बिबट्या
संघर्ष तीव्र होत असून यावर तोडगा काढण्यासाठी आज वनमंत्री गणेश नाईक यांनी
राज्यातल्या मुख्य वरिष्ठ वनअधिकार्यांची पुण्यात बैठक बोलावली आहे. बिबट्यांच्या चिघळत जाणाऱ्या प्रश्नावर केंद्र सरकारसोबतदेखील
चर्चा सुरू असून लवकरच तीन जिल्ह्यांपुरता
तरी ठोस निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा असल्याचं नाईक यांनी सांगितलं आहे.ते काल
नाशिक इथं बोलत होते.
दरम्यान,अहिल्यानगर जिल्ह्यातल्या खारेकर्जुने
परिसरात धुमाकुळ घालणार्या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश प्रधान मुख्य
वनसंरक्षकांनी दिले आहेत.गेल्या बुधवारी बिबट्याने एका पाच वर्षाच्या मुलीवर हल्ला
करुन तिला उचलून नेले,त्यानंतर शुक्रवारी एका ८ वर्षीय मुलावर हल्ला
केला.मानवासाठी हा बिबट्या धोकादायक असल्याने त्याला ठार करण्याचा आदेश देण्यात
आला असून हा आदेश येत्या ३१ दिसंबर पर्यंत वैध राहील असं या आदेशात म्हटलं आहे.
***
राज्याच्या बहुतांश भागात थंडीचा जोर वाढला आहे. नाशिकमध्ये पारा
आणखी घसरला असून निफाडमध्ये आठ अंश सेल्सिअस इतकं नीचांकी तापमान नोंदवलं गेलं.
***
No comments:
Post a Comment