Tuesday, 18 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 18 November 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १८ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं राष्ट्रपतींचं आवाहन

·      पीएम किसान सन्मान निधीच्या २१व्या हप्त्याचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते वितरण

·      बिबट्यांचे वाढते मानवी हल्ले ही राज्य आपत्ती घोषित करण्याचा प्रस्ताव मांडण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

·      भूखंडांच्या सुयोग्य वापरासाठी राज्य सरकारचं नवीन धोरण जाहीर

आणि

·      राज्यभरात थंडीच्या कडाक्यात वाढ-मराठवाड्याचा पारा ११ अंशाच्या खाली

****

पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्लीत त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. देशात मागच्या वर्षी सुरू केलेल्या, लोकसहभागातून जलसंधारण, या उपक्रमातून भूजल पुनर्भरणाच्या ३५ लाखाहून जास्त संरचना निर्माण करण्यात आल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं. जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापनात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल १० श्रेणींतल्या ४६ विजेत्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं. त्यात राज्य श्रेणीत महाराष्ट्राला प्रथम क्रमांकानं गौरवण्यात आलं. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीत नवी मुंबई महानगरपालिकेला हा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट जल वापरकर्ता संस्था, या श्रेणीत नाशिक जिल्ह्यातल्या कनिफनाथ जलवापर सहकारी संस्थेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर विखेपाटील यांनी आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या -

बाईट - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पीएम किसान सन्मान निधीच्या २१व्या हप्त्याचं वितरण करतील. तामिळनाडूत कोईंबतूर इथं होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या सुमारे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळून १८ हजार कोटी रुपये जमा केले जातील. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ही माहिती दिली. हा दिवस ‘प्रधानमंत्री किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा केला जाणार असून, दुपारी दीड वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन चौहान यांनी केलं आहे. ते म्हणाले

बाईट - केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

दरम्यान, पंतप्रधान उद्या आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आंध्रप्रदेशात पुट्टपार्थी इथं सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. तामिळनाडूत नैसर्गिक शेतीविषयी एक चर्चासत्राला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.

****

भावी पिढ्यांची अन्नधान्य आणि जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक शेती आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं आहे. पुण्यात शिवाजीनगर इथं कृषी महाविद्यालयात नैसर्गिक शेती या विषयावर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीचं महत्त्व शेतकऱ्यांना पटवून द्यावं असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं.

****

बिबट्यांचे वाढते मानवी हल्ले ही समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल-1 मधून वगळून शेड्यूल-2 मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्तावही तयार करावा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी दोन रेस्क्यू सेंटर पुढील दोन ते तीन महिन्यांत सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले. बिबट्यांच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी कालबद्ध पद्धतीने तातडीच्या तसंच दीर्घकालीन अशा दोन प्रकारे उपाययोजना करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यामध्ये ड्रोनच्या मदतीने हल्लेखोर बिबट्यांना शोधून पकडणं तसंच त्यांची नसबंदी करणं, आदी उपायांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली -

बाईट - उपमुख्यमंत्री अजित पवार

****

नाशिक इथले उध्दव बाळासाहेब ठकारे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

****

राज्यातल्या सिडकोसह विविध प्राधिकरणांकडच्या जमिनी आणि भूखंडांचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी राज्य मंत्रिमंडळानं धोरण जाहीर केलं आहे. संकल्पना आधारित आयकॉनिक शहर विकासासाठीही धोरण जाहीर करण्यात आलं आहे. या धोरणांमुळे राज्यात निवासी एकात्मिक वसाहती तसंच आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रांची उभारणी होण्यास मदत होणार आहे.

मदत आणि पुनर्वसन विभागाच्या, भूसंपादन, पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेच्या प्रकरणांचा जलद गतीनं निपटारा करण्यासाठी नवीन पदांची निर्मिती करण्यालाही या बैठकीत मान्यता देण्यात आली.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरता शिक्षकांच्या २३२ आणि शिक्षकेतर १०७, अशा एकूण ३३९ पदांना मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध कायद्यातले, महारोगी, कुष्ठरोगी, कुष्ठालयं असे मानहानीकारक शब्द वगळण्याला तसंच महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम १९५० मध्ये सुधारणा कऱण्याला मंत्रिमंडळाने या बैठकीत मान्यता दिली.

****

राज्यात आज तापमान आणखी घसरल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यभरात सर्वात कमी आठ पूर्णांक चार अंश तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. नाशिक इथं नऊ तर पुणे, जळगाव, मालेगाव, गोंदिया तसंच यवतमाळ इथं सुमारे साडे नऊ तर नागपूर इथं १० पूर्णांक नऊ अंश तापमान होतं. मराठवाड्यात बीड इथं १० पूर्णांक दोन, छत्रपती संभाजीनगर इथं १० पूर्णांक सहा तर परभणी इथं १० पूर्णांक आठ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या २५ डिसेंबरपासून कार्यान्वित होत आहे.  या विमानतळावरून २६ डिसेंबरपासून दिल्ली, गोवा, कोची आणि अहमदाबादसाठी अकासा एअरची नियमित उड्डाणं सुरू होणार आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर इथं स्त्रीरोग तज्ज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषदेचे १२ ते १४ डिसेंबर दरम्यान होणार आहे. डॉ. पंडित पळसकर यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वंध्वत्व उपचारासंदर्भातल्या या परिषदेत सुमारे ३० जटिल शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य करण्यात येणार आहेत.

****

नांदेड इथं आज जिल्हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात नशामुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. अतिरिक्‍त प्रमुख कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

****

राज्य निवडणूक आयोगानं हिंगोली आणि वसमत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नांदेडचे अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवाराची, किंवा मतदाराची निवडणुकीसंदर्भात तक्रार असल्यास त्यांनी गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा, अशी सूचना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केली आहे.

****

नांदेड जिल्हा परिषदेच्‍या वतीनं येत्या २५ तारखेला सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या निवृत्‍तीविषक तक्रारींचं निराकरण करण्यासाठी पेन्शन अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. इच्छुक सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी या पेंशन अदालतीचा लाभ घ्यावा, असं आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी केलं आहे.

****

No comments: