Tuesday, 18 November 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.11.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 18 November 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन बी – बियाणे कायदा आणण्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचं सुतोवाच

·      शासकीय सेवांसाठी उत्तीर्ण उमेदवाराला चार दिवसांत नियुक्तीपत्र द्यावं, तसंच पदोन्नतींच्या जागांनुसार ७५ टक्के पदोन्नती देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

·      आरक्षणासाठी ५० टक्क्यांची कमाल मर्यादा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये पाळावीच लागेल, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

·      स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर होणार

आणि

·      मराठवाडा आणि विदर्भात आजही थंडीच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा, बीड इथं १० पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानची नोंद

****

निकृष्ट तसंच अनधिकृत बियाणे विक्रीवर निर्बंधासाठी संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन बी–बियाणे कायदा आणण्याचं सुतोवाच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. काल मुंबईत आशियाई बियाणे परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रात बागायती पिकांना गुणवत्तापूर्ण रोपसामग्री मिळावी यासाठी तीन क्लीन प्लांट सेंटर स्थापन केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. पारंपारिक बियाण्यांच्या संवर्धनावर भर देण्याची गरज चौहान यांनी व्यक्त केली, ते म्हणाले…

बाईट - केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान

 

कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी धान्यांच्या विशेष वाणांवर संशोधन केलं जात असून, अशी दोनशेहून अधिक वाणं तयार केल्याची माहिती चौहान यांनी दिली. ते म्हणाले…

बाईट - केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. राज्यात पुढील दोन ते तीन वर्षांत २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा शासनाचा संकल्प असून, बियाणे उत्पादक कंपन्यांनी नवकल्पना दिल्यास आपण शाश्वततेकडे जाऊ शकतो, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान-प्रतिरोधक वाणांची गरज अधिक वाढली असल्याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं.

****

शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर किमान चार दिवसात संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला नियुक्तीपत्र द्यावं, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. दरवर्षीचा आढावा घेत जानेवारी महिना संपेपर्यंत उपलब्ध पदोन्नतींच्या जागांनुसार ७५ टक्के पदोन्नती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

राज्यातल्या सार्वजनिक विद्यापीठांनी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय रँकिंग सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, यासाठी प्रत्येक विद्यापीठाच्या डिजिटल मॉनिटरिंगसाठी डॅशबोर्ड तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

**

दरम्यान, ‘सरपंच संवाद’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर राज्यातल्या तब्बल २५ हजार सरपंचांनी काल मुख्यमंत्र्यांसोबत थेट संवाद साधला. केंद्र तसंच राज्य सरकारकडून विविध योजनांसाठी मिळणाऱ्या निधीचा, सरपंचांनी सर्वोत्तम उपयोग करावा, असं त्यांनी सांगितलं. सौर पंप योजना राज्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत असून, यासंदर्भातला जागतिक विक्रम महाराष्ट्राच्या नावावर होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

****

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार, यंदा राज्यातल्या दोन दुग्धोत्पादक शेतकऱ्यांनी पटकावला आहे. देशी दुभत्या पशुंचं संगोपन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट दुग्धोत्पादक शेतकऱ्यांच्या श्रेणीत, कोल्हापूरच्या अरविंद पाटील यांनी पहिला क्रमांक मिळवला तर कोल्हापूरच्याच श्रद्धा धवन यांना तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.

****

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मावळत्या मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत, मंत्रिमंडळ बरखास्तीचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर नितीश कुमार यांनी राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्यामुळे नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. परवा गुरुवारी २० नोव्हेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार २०१५ पासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत.

****

आरक्षणावर असलेली ५० टक्क्यांची कमाल मर्यादा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये पाळावीच लागेल, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. बांठिया आयोगाच्या निष्कर्षांच्या आधारे या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करायच्या सरकारच्या निर्णयासंबंधीच्या याचिकांवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे, असं मतही पीठानं नोंदवलं. या प्रकरणी पुढची सुनावणी उद्या बुधवारी होणार आहे.

****

नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत काल संपली. आज अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर १९ ते २१ नोव्हेंबर या दरम्यान ज्या प्रभाग किंवा अर्जावर अपिल आहे असे सोडून इतर ठिकाणी अर्ज मागे घेता येतील. २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.

**

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सात नगर परिषदा तसंच पंचायतींच्या सदस्यपदासाठी एकूण एक हजार ३१२ अर्ज तर अध्यक्षपदासाठी ८८ अर्ज दाखल झाले.

**

जालना जिल्ह्यात भोकरदन नगराध्यक्षपासाठी १२ तर सदस्यपदासाठी १५४ अर्ज आले आहेत. अंबड इथं १४ आणि १३२ तर परतूर नगराध्यक्ष पदासाठी १६ आणि सदस्यपदासाठी १३२ अर्ज दाखल झाले.

**

नांदेड जिल्ह्यातल्या २३ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या सदस्य पदासाठी दोन हजार १५३ नामनिर्देशन पत्रं दाखल झाली आहेत. तर सर्व नगराध्यक्ष पदासाठी दाखल अर्जांची संख्या २१२ एवढी असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

**

परभणी जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी एकूण ११७ तर नगरसेवक पदासाठी एक हजार २१० उमेदवारी अर्ज दाखल झाले. हिंगोली जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी ७१, तर सदस्य पदासाठी ८९०, तर लातूर जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी १०३ तर सदस्य पदासाठी एक हजार २५७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत.

**

धाराशिव नगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने काँग्रेस सोबत आघाडी करून उमेदवारांची घोषणा केली, यात १६ उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तर काँग्रेसचे नऊ उमेदवार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संगीता गुरव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी हिंसाचार केल्याच्या आरोपावरून शेख हसीना यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री असदुज्जमन खान कमाल आणि माजी पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल मामुन यांना दोषी ठरवत शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, शेख हसिना यांनी या सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी बांगलादेशात परतायला नकार देत सर्व आरोप फेटाळून लावले.

****

सौदी अरेबियात एका प्रवासी बसचा अपघात होऊन ४२ भारतीयांचा मृत्यू झाला. हे सर्वजण हैदराबाद इथले रहिवासी होते. उमराह यात्रा पूर्ण करून, मक्का शहरातून ही बस मदिनाकडे जाताना, डिझेल टँकरवर धडकल्यानं हा अपघात झाला. मृतांमध्ये २० महिला आणि ११ बालकांचा समावेश आहे.

****

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या आनंद आश्रमात बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबीयांनी मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर पुष्पांजली अर्पण केली. शिवसेना, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनीही स्मृतिस्थळावर आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाज माध्यमावर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं.

**

छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय दुध डेअरी चौक परिसरात बाळासाहेबांच्या स्मारकाची साफसफाई करून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कुष्ठरोग शोध अभियानाला कालपासून प्रारंभ झाला. दौलताबाद इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांच्या हस्ते कुष्ठरोग शोध मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन झालं. येत्या दोन तारखेपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे.

****

संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२९वा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आपेगाव या माऊलींच्या जन्मगावी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांनी माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या कीर्तनाचं सादरीकरण केलं. दुपारच्या सुमारास माऊलीच्या मुर्तीवर सूर्यकिरण पोहोचताच भाविकांनी माऊलीचा गजर करत पुष्पवृष्टी केली.

****

हवामान

मराठवाडा आणि विदर्भात आजही थंडीची लाट राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, राज्यात काल सर्वात कमी साडे नऊ अंश तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. जळगाव इथं नऊ पूर्णांक आठ तर नाशिक इथं नऊ पूर्णांक नऊ अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात बीड इथं १० पूर्णांक दोन, परभणी इथं ११ पूर्णांक तीन तर छत्रपती संभाजीनगर इथं १२ पूर्णांक चार अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: