Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 19
November 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ दुपारी
१.०० वा.
****
आंध्र प्रदेशात पुट्टपार्थी इथं श्री सत्यसाईबाबांच्या
जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. श्री
सत्यसाईबाबा यांच्या जीवनकार्याचा गौरव करणारं टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशनही यावेळी
करण्यात आलं. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवनकुमार यांच्यासह क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्यासह इतर मान्यवर यावेळी
उपस्थित होते.
पुट्टपर्थीच्या पवित्र भूमीवर उपस्थित राहणं, हा आपल्यासाठी अत्यंत भावनिक आणि आध्यात्मिक अनुभव असल्याचं
पंतप्रधान यावेळी म्हणाले. श्री सत्य साई बाबांची जन्मशताब्दी ही आपल्या पिढीसाठी फक्त
एक उत्सव नाही, तर एक दिव्य आशीर्वाद असल्याचंही
त्यांनी नमूद केलं.
तत्पूर्वी पंतप्रधानांनी, श्री सत्य साईबाबांच्या मंदिरात जाऊन महासमाधीचं दर्शन घेतले
आणि आदरांजली अर्पण केली.
दरम्यान, पंतप्रधान मोदी आज तामिळनाडुच्या दौऱ्यावर जाणार असून, कोईंबतूर इथं होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात पीएम किसान सन्मान
निधीच्या २१व्या हप्त्याचं वितरण त्यांच्या हस्ते होईल. यावेळी देशातल्या सुमारे नऊ
कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात, एकूण १८ हजार कोटी रुपये जमा केले जातील.
****
बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी – एनडीएच्या नवनिर्वाचित
आमदारांची आज पाटणा इथं आपला नेता निवडण्यासाठी बैठक होत आहे. भाजप, संयुक्त जनता दल, लोक जनशक्ती पार्टी, हिंदुस्थानी आवाम मोर्चा आणि राष्ट्रीय लोक मोर्चा या पाच एनडीए
घटक पक्षांचे सर्व २०२ नवनिर्वाचित आमदार या बैठकीला उपस्थित असतील.
दरम्यान, बिहारमध्ये नव्या सरकारचा शपथविधी उद्या पाटणा इथं गांधी मैदानावर
होणार असून, त्यासाठी मोठी तयारी सुरू आहे. या
सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि रालोआचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
****
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त
आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा
गांधी यांना आदरांजली वाहिली. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय
घेऊन देशाचा आधुनिक राजकीय आणि आर्थिक विकास घडवला असल्याचं मोदी यांनी सामाजिक माध्यमावरच्या
संदेशात म्हटलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी संसद भवनातल्या इंदिरा गांधी
यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील
प्रमुख आरोपी गँगस्टर अनमोल बिश्नोई याला आज अमेरिकेतून भारतात परत आणण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर आज दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतराराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल
तीन वर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. एप्रिल
२०२४ मध्ये अभिनेता सलमान खान याच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणातही बिश्नोई
हा एक आरोपी आहे.
****
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या
सदस्यांनी पक्षांतर केल्यास ती निवडणूक आयोगाची चूक असेल, यासाठी आयोगाने खबरदारी घेतली पाहिजे, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास
दानवे यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. अनेक
नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याबद्दल त्यांनी टीका केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकीत जिथे शक्य आहे तिथे आघाडी करण्याचा प्रयत्न केला असल्याचं दानवे यांनी सांगितलं.
****
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त
परभणी इथं आज एकता पदयात्रा काढण्यात आली. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातून या पदयात्रेला
सुरुवात झाली.
धाराशिव इथं “जिल्हास्तरीय एकता पदयात्रा” परवा २१ नोव्हेंबर
रोजी आयोजित करण्यात आली आहे. श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलावरून सकाळी ९ वाजता
सुरू होणारी ही पदयात्रा विविध भागातून मार्गक्रमण करून क्रीडा संकुलावर विसर्जित होईल.
नागरिकांनी या उपक्रमात नोंदणी करून सहभाग घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात
आलं आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या वाडा औद्योगिक परिसरात कोने इथं भगवान
इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या गादी तयार करणाऱ्या कारखान्याला आज सकाळी भीषण आग
लागली. आगीत काही कामगार जखमी झाले आहेत, आग भीषण असल्याने आगीचे आणि धुराचे लांबच लांब लोळ दूरवर दिसत
होते, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
ऑस्ट्रेलिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत एच
एस प्रणॉय, आयुष शेट्टी आणि थारुण मन्नेपल्ली
हे भारतीय खेळाडू दुसऱ्या फेरीत पोहोचले आहेत.
प्रणॉयने पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या खेळाडुचा ६–२१, २१–१२, २१–१७ असा पराभव केला.
****
महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात मानाची समजली जाणारी
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा येत्या सात डिसेंबर रोजी होणार आहे. आंतरराष्ट्रीय
मॅरेथॉन ट्रस्टचे विश्वस्त अभय छाजेड यांनी काल पुण्यात पत्रकारांना ही माहिती दिली.
‘शाश्वत पर्यावरणासाठी धावा’ अशी या स्पर्धेची यंदाची संकल्पना आहे. या स्पर्धेसाठी
इथिओपिया, केनिया, टांझानिया, मॉरिशस या देशातले ७० धावपटू सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे
कारगिल आणि लडाखमधील मॅरेथॉन विजेतेही
या स्पर्धेत धावणार आहेत. स्पर्धेतल्या विजेत्यांना पुणे महापालिकेकडून ३० लाख रुपयांपर्यंतची
पारितोषिकं देण्यात येणार आहेत.
****
No comments:
Post a Comment