Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 20 November 2025Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० नोव्हेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
संयुक्त जनता दलाचे नेते नीतिशकुमार यांनी आज दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पटना इथल्या प्रसिद्ध गांधी मैदानावर झालेल्या या सोहळ्यात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनीही यावेळी शपथ घेतली, यात भाजपचे सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा, मंगल पांडे, नितीन नवीन, रामकृपाल यादव यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर असून, अंबिकापूर इथं आयोजित आदिवासी गौरव दिवस कार्यक्रमात त्या सहभागी होत आहेत. या कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाचं दर्शन घडवलं जाईल. याशिवाय, राष्ट्रपती सरगुजा इथल्या ऐतिहासिक राष्ट्रपती भवनाला भेट देतील. हे भवन देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १९५२ मध्ये भेट दिल्यानंतर राष्ट्रपती भवन म्हणून ओळखले जातं.
****
भारताने २०२४-२५ या वर्षात एक लाख ५४ हजार कोटी रुपयांची संरक्षण उत्पादन करुन विक्रम केला आहे. २०१४ मध्ये एक हजार कोटी रुपयांपेक्षा कमी असलेली संरक्षण निर्यात, आता २०२४-२५ मध्ये तब्बल २३ हजार ६२२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या दहा वर्षांत संरक्षण उत्पादनात झालेली ही वाढ सरकारने संरक्षण उद्योगाला दिलेल्या मोठ्या गुंतवणुकीचा आणि धोरणात्मक पाठिंब्याचा परिणाम आहे. २०१३-१४ मध्ये २ लाख ५३ हजार कोटी रुपयांचं असलेलं संरक्षण अंदाजपत्रक, २०२५-२६ मध्ये वाढून सहा लाख ८१ हजार कोटी रुपये झालं आहे, हे देशाच्या संरक्षण आणि पायाभूत सुविधांना बळकट करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे, असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. २०२९ पर्यंत तीन लाख कोटी रुपयांचं संरक्षण उत्पादन आणि पन्नास हजार कोटी रुपयांची निर्यात गाठण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.
****
५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – इफ्फीला आजपासून गोव्यात पणजी इथं सुरुवात होत आहे. यावर्षीच्या इफ्फीची सुरुवात एका विशेष पथसंचलनातून होणार असून, प्रेक्षकांचं स्वागत चित्ररथ, लोकगीतं आणि ‘भारत एक सूर’ या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात ८१ देशातल्या २४० चित्रपटांचं प्रदर्शन होणार आहे. सुवर्णमयूर पारितोषिकासाठी १५ चित्रपटांना मानांकन असून, यामध्ये गोंधळ या मराठी चित्रपटाचा समावेश आहे. या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचा ५० वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
****
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. बिहार निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी ही भेट घेतल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं. या भेटीत राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही, असं ते म्हणाले.
****
तुळजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर अनुजा परमेश्वर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. यासोबतच नगरपालिका निवडणुकीत भाजपने विजयाची सुरुवात केली असल्याचं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. भाजप विकासाच्या माध्यमातून नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लढवत असून, विरोधक फक्त आरोप करत असल्याचं ते म्हणाले. धाराशिव जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विकासकामांची माहितीही आमदार पाटील यांनी यावेळी दिली.
****
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं राज्यात येत्या रविवारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा’ घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातून चार लाख ७५ हजार ६६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
****
नांदेड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने जिल्हा मध्यवर्ती बसस्थानक परिसरात तंबाखू मुक्त युवा अभियान 3.0 अंतर्गत जनजागृती करण्यात आली. तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती देणारी भित्तीपत्रकं, पत्रकांचं वाटप करून जनजागृती करण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० नोव्हेंबर रोजी आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १२८ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार १८००-११-७८०० या नि:शुल्क क्रमांकावर, मोदी ॲप किंवा मायगव्ह ओपन फोरमवर येत्या २८ तारखेपर्यंत पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. १९२२ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन एसएमएसच्या माध्यमातूनही पंतप्रधानांना आपले विचार पाठवता येतील.
****
सिडनी इथं सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांनी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. तर किदाम्बी श्रीकांतनं चायनीज तैपेईच्या ली चिया-हाओचा पराभव करून अंतिम १६ मध्ये स्थान निश्चित केलं आहे.
****
No comments:
Post a Comment