Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 November
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
राष्ट्रपती किंवा
राज्यपालांना विधेयकं मंजूर करण्यासाठी कालमर्यादा घालता येणार नसल्याचा सर्वोच्च
न्यायालयाचा निर्वाळा
·
काळा पैसा वैध प्रकरणी
रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात ईडीचं आरोपपत्र दाखल
·
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून
नितीशकुमार यांचा दहाव्यांदा शपथविधी
·
लातूर जिल्ह्यात निलंगा, उदगीर
आणि रेणापूरची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार
·
विद्यार्थ्यांना टपाल
शुल्कात सवलतीसाठी टपाल खात्याची स्टुडंट मेल योजना सुरू
आणि
·
५६व्या इफ्फी महोत्सवाला
गोव्यात पणजी इथं शानदार सोहळ्याने प्रारंभ
****
राष्ट्रपती किंवा राज्यपालांना विधेयकं मंजूर करण्यासाठी
कालमर्यादा घालता येणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला
आहे. राज्य घटनेतल्या या पेचावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च
न्यायालयाकडे सल्ला मागितला होता, त्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या
नेतृत्वाखालील न्यायमूर्ती सूर्यकांत, विक्रम नाथ, पी
एस नरसिंहा आणि अतुल चांदूरकर या पाच न्यायाधीशांच्या घटना पीठाने आज हा निर्णय
दिला. विधीमंडळाने मंजूर केलेलं विधेयक, घटनेच्या अनुच्छेद २००
अंतर्गत विहित प्रक्रियेचा अवलंब न करता, राज्यपाल जर अडवून ठेवत
असतील, तर ही बाब संघराज्य रचनेस हितावह नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे.
विधीमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकांबाबत राज्यपालांना अडचण असल्यास, त्यांना
ते राष्ट्रपतींकडे मार्गदर्शनासाठी पाठवता येतं.
****
देशात गेल्या आर्थिक वर्षात दीड लाख कोटी रुपयांहून अधिक
संरक्षण सामुग्री उत्पादित केली. हा आतापर्यंतचा हा उच्चांक असल्याची माहिती
संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. लष्करी औद्योगिक क्षेत्राला मिळालेल्या धोरणात्मक
पाठिंब्यामुळे हे विक्रमी उत्पादन झाल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे. संरक्षण
सामुग्री निर्यातीनेही गेल्या वर्षी २३ हजार ६२२ कोटी रुपये इतका विक्रमी आकडा
गाठल्याची माहिती मंत्रालयाने दिली. पुढच्या चार वर्षांत संरक्षण उत्पादन तीन लाख
कोटींपर्यंत तर संरक्षण निर्यात ५० हजार कोटींपर्यंत नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट
असल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे.
****
सक्तवसुली संचालनालयाने ब्रिटनचा शस्त्र दलाल संजय भंडारी
याच्याशी संबंधित काळा पैसा वैध करणे प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात
आरोपपत्र दाखल केलं आहे. धनशोधन प्रतिबंधक कायद्यान्वये- पीएमएलए विशेष न्यायालयात
हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं. वाड्रा यांच्या विरोधात हे दुसरं मनी लॉन्डरिंग
आरोपपत्र असून,
यावर्षी जुलै महिन्यात हरियाणातील एका जमीन व्यवहारातील
कथित गैरव्यवहारांशी संबंधित प्रकरणात संचालनालयाने वाड्रा यांच्या विरोधात
आरोपपत्र दाखल केलं होतं.
****
संयुक्त जनता दलाचे नेते नीतिशकुमार यांनी आज दहाव्यांदा
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पटना इथल्या प्रसिद्ध गांधी मैदानावर
झालेल्या या सोहळ्यात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची
शपथ दिली. मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनीही यावेळी शपथ घेतली, यात
भाजपचे सम्राट चौधरी,
विजय कुमार सिन्हा, मंगल पांडे, नितीन
नवीन, रामकृपाल यादव यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय
मंत्री, आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री
यावेळी उपस्थित होते.
****
लातूर जिल्ह्यातील निलंगा, उदगीर आणि रेणापूर
नगर परिषदेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार आहे. अहमदपूर आणि औसा इथली
निवडणूक मात्र महाविकास आघाडी म्हणून लढवली जाणार आहे. आमदार अमित देशमुख यांनी
निलंगा इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशमुख म्हणाले -
बाईट – अमित देशमुख
****
नाशिक शहरात तपोवन इथल्या नियोजित साधुग्राम परिसरातली
सतराशे झाडं तोडण्याचा प्रस्ताव असून एका तोडलेल्या झाडाच्या बदल्यात दहा झाडं
लावण्यात येतील अशी माहिती,
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली. वृक्षतोडीच्या
विरोधात पर्यावरणप्रेमींनी काल झाडांना अलिंगन देत चिपको आंदोलन केलं. त्याठिकाणी
महाजन यांनी आज भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास
प्राधिकरणानं नाशिक जवळच्या ओझर विमानतळाच्या विस्ताराला प्रशासकीय मान्यता दिली
आहे. हे काम मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करण्यात येईल अशी माहिती प्राधिकरणाचे
अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली. या विस्तारीकरणामुळे विमानतळाची प्रवासी
वाहतुक क्षमता ताशी ३०० प्रवाशांवरून ताशी एक हजार प्रवासी होणार आहे.
****
नागपूर इथं उद्या अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन भरवण्यात
येणार आहे. राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा, एकदिवसीय
परिषदा असं स्वरूप असलेल्या अॅग्रोव्हिजनचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असं
आवाहन आयोजकांनी केलं.
****
भारतीय टपाल सेवेनं स्टुडंट मेल ही विशेष योजना सुरू केली
आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामग्री, प्रवेश अर्ज आणि
तत्सम कागदपत्रं टपालाने पाठवण्यासाठीच्या शुल्कावर १० टक्के सूट मिळणार आहे.
त्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या संबंधित शैक्षणिक संस्थेचं विद्यार्थी ओळखपत्र
आणि त्याची एक प्रत टपालासोबत टपाल कार्यालयात सादर करावी लागेल. तसंच, संबंधित
पाकिटावर स्टुडंट मेल असं स्पष्टपणे लिहावं लागेल. संबंधित टपाल कर्मचारी
ओळखपत्राची पडताळणी करून,
टपाल शुल्कावरची सूट लागू करतील, असं
टपाल विभागानं कळवलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० नोव्हेंबरला
आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रम मालिकेतून संवाद साधणार आहेत. हा या
कार्यक्रमाचा १२८वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना येत्या
२८ नोव्हेंबरपर्यंत 1800
11 7800 या टोल फ्री क्रमांकावर कळवाव्यात. नमोअॅप आणि माय गव्ह
ओपन फोरमवर देखील नागरिकांना सूचना करता येतील.
****
५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव–इफ्फीला
आजपासून गोव्यात पणजी इथं प्रारंभ झाला. यावर्षीच्या इफ्फीची सुरुवात एका विशेष
पथसंचलनाने झाली,
त्यात विविध चित्ररथ, लोकगीतं आणि ‘भारत एक सूर’
या कार्यक्रमाचा समावेश होता. येत्या २८ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात
८१ देशातल्या २४० चित्रपटांचं प्रदर्शन होणार आहे. इफ्फीच्या पार्श्वभूमीवर पणजीत
भरलेल्या वेव्हज् फिल्म बाजारचं उद्घाटन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री
एल मुरुगन यांच्या हस्ते आज झालं. दक्षिण कोरियाच्या खासदार जेवोन किम यांनी सादर
केलेलं वंदे मातरम् चं गायन हे या उद्धाटन समारंभाचं मुख्य आकर्षण ठरलं.
सुवर्णमयूर पारितोषिकासाठी १५ चित्रपटांना नामांकन मिळालेलं
असून, यामध्ये "गोंधळ" या मराठी चित्रपटाचा समावेश आहे. ज्येष्ठ अभिनेते
रजनीकांत यांच्या चित्रपट कारकिर्दीला ५० वर्ष होत असल्याबद्दल त्यांचा या
महोत्सवात विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
****
बीड जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वाटपाची कार्यवाही सुरू झाली आहे. सहा
लाख ८५ हजार ५४९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ४४० कोटी ५१ लाख रुपये थेट वर्ग
करण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १३ लाख ३१ हजार ८६५ शेतकऱ्यांना ९८४
कोटी ४९ लाख इतकी नुकसान भरपाई मिळाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची
कार्यवाही सुरू असून,
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत नोंदणी
केलेली नाही,
तसंच ई-केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांनी ग्राहक सेवा
केंद्रात नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
पुणे - माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात वाहन दरीत कोसळून
चौघांचा मृत्यू झाला,
परवा रात्री घडलेल्या या अपघाताची माहिती आज समोर आली. या
वाहनातल्या तरुणांशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या पालकांनी मोबाईल ट्रेस केला
असता, हा अपघात झाल्याचं लक्षात आलं. दरम्यान, अपघातग्रस्त वाहनातल्या इतर
दोन जणांचा पोलिस शोध घेत आहेत.
****
जालना जिल्ह्यात श्रीक्षेत्र जांबसमर्थ इथं श्रीराम
मूर्तींचा पुनर्स्थापनेचा वर्धापन सोहळा येत्या शनिवार-रविवारी साजरा होत आहे.
जांबसमर्थ इथल्या रामदास स्वामींच्या देवघरातील चोरीस गेलेल्या १६ मूर्तींपैकी १३
मूर्ती सापडल्या होत्या,
त्यांची तीन वर्षांपूर्वी पुनर्स्थापना करण्यात आली. या
पुनर्स्थापन वर्धापन सोहळ्यात भजन कीर्तन महाप्रसाद आदी कार्यक्रमांचं आयोजन
करण्यात आलं आहे.
****
वि. वा. शिरवाडकर यांच्या कालजयी ‘नटसम्राट’ नाटकाला
नांदेडच्या रंगभूमीवर देगलूरच्या मुक्ताई प्रतिष्ठान प्रभावीपणे पुनर्जीवित केलं.
६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत काल सादर झालेल्या या नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
हाऊसफुल झालेल्या डॉ. शंकरराव चव्हाण नाट्यगृहात अनेक रसिकांनी पायऱ्यांवर बसून हा
नाट्याविष्कार अनुभवला.
****
बीड तालुक्यातील नाळवंडी इथला १५ वर्षांपासून बंद असलेला
शिवार रस्ता आज खुला करण्यात आला. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पोलिसांसह
प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली आणि जेसीबीच्या सहाय्याने अडथळे हटवले. रस्ता खुला
झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
****
ग्रेटर नोएडा इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टियुद्ध
चषकाच्या अंतिम सामन्यांत भारताचे १५ मुष्टियोद्धे आज खेळणार आहेत. यात ८ महिला
आणि ७ पुरुषांचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment