Thursday, 20 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.11.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 20 November 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० नोव्हेंबर २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पंतप्रधानांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता जारी

·      बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार यांचा आज शपथविधी

·      नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीमुळे गुन्हे सिद्धतेचा दर ९० टक्क्यांपर्यंत जाईल - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

·      गोव्यात आजपासून ५६वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, ८१ देशांमधल्या २४० चित्रपटांचा समावेश

आणि

·      ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना गदिमा प्रतिष्ठानचा पुरस्कार जाहीर

****

विकसित भारतासाठी एक भविष्यकालीन कृषी परिसंस्था उभारण्याकरता सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल तमिळनाडूत कोइंबतूर इथं पीएम किसान सन्मान योजनेचा २१ वा हप्ता जारी केल्यानंतर बोलत होते. या वेळी देशातल्या सुमारे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात, एकूण १८ हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आले. महाराष्ट्रातल्या ९० लाख ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात एक हजार ८०८ कोटी २५ लाख रुपये थेट जमा झाले. या कार्यक्रमात बोलतांना पंतप्रधानांनी, देशात शेती क्षेत्रात मोठे बदल होत असून, त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले

बाईट पीएम यूथ ॲग्री

 

प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात प्रायोगिक स्तरावर नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा, नैसर्गिक शेतीचं हे क्षेत्र दरवर्षी वाढवत न्यावं, असंही पंतप्रधानांनी सांगितलं. गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारने शेतकऱ्यांना हर तऱ्हेने मदत केल्याचं त्यांनी नमूद केलं.

****

आंध्रप्रदेशात पुट्टपर्थी इथं श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला पंतप्रधान काल उपस्थित राहिले. सत्य साईबाबांच्या महासमाधीचं दर्शन घेऊन त्यांनी आदरांजली अर्पण केली. साईबाबांच्या जीवनकार्याचा गौरव करणारं टपाल तिकीट आणि विशेष नाण्याचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवनकुमार यांच्यासह क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

****

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार आज शपथ घेणार आहेत. काल झालेल्या बैठकीत सम्राट चौधरी यांनी नितीशकुमार यांच्या एनडीएच्या विधीमंडळ नेतेपदी नियुक्तीचा प्रस्ताव मांडला, त्याला सर्व आमदारांनी एकमताने पाठिंबा दिला. पाटण्याच्या गांधी मैदानावर आज हा शपथग्रहण सोहळा होणार आहे.

****

नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीत गुन्हा सिद्धतेचा दर ९० टक्क्यांपर्यंत नेण्याची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत आझाद मैदानावर, या कायद्यांवर आधारित पाच दिवसीय प्रदर्शनाचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या कायद्यामुळे न्याय व्यवस्थेत आमूलाग्र बदल होत असल्याचं सांगत, २०१३ मध्ये फक्त नऊ टक्के असलेलं गुन्हे सिद्धतेचं प्रमाण, गेल्या दहा वर्षांत ५३ टक्के झाल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं. ब्रिटिशांनी तयार केलेले फौजदारी कायदे लोकशाहीसाठी पोषक नव्हते. त्यामुळे नव्या कायद्यांची गरज होती, असं मुख्यमंत्री म्हणाले.

बाईट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळानं काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या धोरणांवर यावेळी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

****

देशातल्या २७२ प्रतिष्ठित नागरिकांनी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप करत एक खुलं पत्र प्रसिद्ध केलं आहे. गांधी यांनी, निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांना कलंकित केल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. हे पत्र लिहिणाऱ्यांमध्ये निवृत्त न्यायाधीश, राजदूत, निवृत्त सरकारी अधिकारी आणि सशस्त्र दलातील माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

****

५६वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी आजपासून गोव्यात सुरू होत आहे. या महोत्सवात ८१ देशांमधल्या २४० चित्रपटांचा समावेश असेल. द ब्लू ट्रेल या चित्रपटाने या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत,  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत वेव्हज फिल्म बाजारचे उद्घाटन होणार आहे. 

****

गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा पुरस्कार यंदा ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झाला आहे. गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एकवीस हजार रुपये, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या १४ डिसेंबरला ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार सुहास जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी अनमोल बिश्नोई याला ११ दिवसांची एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. बिश्नोई याला काल अमेरिकेतून भारतात आणल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था-एनआयएनं ताब्यात घेतलं. एनआयएनं दाखल केलेल्या आरोपपत्रांमध्ये लॉरेंस बिश्नोई आणि अनमोल बिश्नोई या दोघा भावांनी २०२० ते २०२३ या काळात गोल्डी ब्रार या दहशतवाद्याला विविध गुन्ह्यांत मदत केल्याचं म्हटलं आहे. अभिनेता सलमान खान याच्या घरावर एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातही अनमोल बिश्नोई एक आरोपी आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं खाजगी बसच्या उघड्या डिक्कीमुळे झालेल्या अपघातात दोन महिला ठार झाल्या. पंचवटी परिसरात काल पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. मध्य प्रदेशातून देवदर्शन करून परतलेल्या, या महिला रिक्षात बसून आपल्या घरी जात असतांना, एका खाजगी बसच्या डिक्कीच्या उघड्या झाकणाला ही रिक्षा धडकली, या अपघातात रिक्षाचं छत कापलं जाऊन त्यात बसलेल्या महिलांच्या डोक्याला गंभीर इजा झाली, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

****

झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथं विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं क्रांती चौकातील लक्ष्मीबाईंच्या पुतळ्याला पुष्हार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.

माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनाही काल त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन करण्यात आलं.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी दाखल एकूण ८९ अर्जांपैकी ६७ अर्ज वैध तर २२ अर्ज अवैध ठरले आहेत. नगरपंचायती तसंच नगर परिषदांच्या सदस्यपदासाठी दाखल एक हजार ३१२ अर्जांपैकी तब्बल ४३० अर्ज बाद झाले तर ८८२ अर्ज वैध ठरले आहेत.

****

जालना जिल्ह्यात परतूरमंठा परिसरातल्या वीज वितरण व्यवस्थेसाठी ३४ कोटी ४५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. आमदार बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली. या माध्यमातून वीज उपकेंद्रांच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होऊन, ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळेल, असा विश्वास लोणीकर यांनी व्यक्त केला.

****

नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या रायवाडी शिवारात कापसाच्या शेतीमध्ये गांजाची झाडं लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हा शाखेने काल छापा टाकून ६ लाख ८३ हजार रुपयांचा ६८ किलो ३४० ग्राम वजनाचा गांजा जप्त केला. याप्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं राष्ट्रीय नवजात शिशू सप्ताह साजरा करण्यात आला. काल या कार्यक्रमांतर्गत डॉ. आशिष थिटे यांनी नवजात बालकांचं संगोपन आणि काळजी याबाबत मार्गदर्शन केलं.

****

ज्येष्ठ नागरिक पालन पोषण आणि कल्याण कायद्याविषयी जनजागृतीसाठी लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि लातूर उपविभागीय कार्यालयाच्यावतीने काल मातोश्री वृद्धाश्रम इथं विशेष शिबीर घेण्यात आलं. या शिबीरात विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केलं.

****

सेवानिवृत्ती प्रकरणी उच्च न्यायालयातलं अपील नाकारण्यासाठी लाच मागणाऱ्या सरकारी वकिलाला जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली. शरद बांगर असं या वकिलाचं नाव असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यात देगलूर तालुक्यातल्या भायेगाव इथला ग्रामसेवक वामन बिरादार याला चार हजार रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. घरकुलाचा हप्ता मिळवून देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त परभणी इथं काल एकता पदयात्रा काढण्यात आली. वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातून निघालेल्या या पदयात्रेला विद्यार्थी तसंच नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.

****

राज्यात काल तापमान आणखी घसरल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड इथं राज्यभरात सर्वात कमी सात अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. नाशिक इथं नऊ पूर्णांक सात, छत्रपती संभाजीनगर तसंच नांदेड इथं सुमारे साडे १० अंश तर परभणी इथं ११ पूर्णांक दोन अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

****0

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 26.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 26 December 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छ...