Thursday, 20 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 20.11.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 20 November 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २० नोव्हेंबर २०२ सकाळी.०० वाजता

****

संयुक्त जनता दलाचे नेते नीतिशकुमार आज दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पटना इथल्या प्रसिद्ध गांधी मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार असून, या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि रालोआचे नेते उपस्थित राहणार आहेत.

****

५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – इफ्फीला आजपासून गोव्यात पणजी इथं सुरुवात होत आहे. यावर्षीच्या इफ्फीची सुरुवात एका विशेष पथसंचलनातून होणार असून, प्रेक्षकांचं स्वागत चित्ररथ, लोकगीतं आणि भारत एक सूरया कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात ८१ देशातल्या २४० चित्रपटांचं प्रदर्शन होणार आहे. सुवर्णमयूर पारितोषिकासाठी १५ चित्रपटांना मानांकन असून, यामध्ये गोंधळ या मराठी चित्रपटाचा समावेश आहे. या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचा ५० वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

****

नवी दिल्लीत प्रगती मैदानावर सुरू असलेल्या ४४ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी काल महाराष्ट्र दालनाला भेट दिली. राज्याच्या सर्वसमावेशक आणि सतत प्रगती करणाऱ्या विकास प्रारूपाचं कौतुक करत विकसित भारत @2047 च्या राष्ट्रीय संकल्पात महाराष्ट्राचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आणि प्रेरणादायी आहे, असं गोयल यावेळी म्हणाले.

****

नव युवकांसाठीच्या देशातल्या पहिल्या टपाल कार्यालयाचं उद्घाटन काल आय आय टी दिल्ली इथं करण्यात आलं. या टपाल कार्यालयाच्या आखणीसाठी विद्यार्थ्यांची मदत घेऊन त्यांच्या गरजेच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.

****

ऊसाच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करून ती किलोला ४१ रुपये करावी, अशी विनंती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्राद्वारे केली आहे. त्याचबरोबर इथेनॉलच्या खरेदी दरातही वाढ करावी आणि अतिरिक्त साखरेचा कोटा इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यात यावा, असंही पाटील यांनी म्हटलं आहे. या अतिरिक्त इथेनॉल उत्पादनातून सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा महसूल मिळेल आणि तो साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना उसाचे पैसे वेळेत देण्यास उपयोगी पडेल, असं पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.

****

शेतमालाची उत्पादकता वाढवायची असेल तर बदलत्या वातावरणानुसार बियाण्यांमध्ये संशोधन आणि त्यांचा वापर होणं आवश्यक असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल जागतिक स्तरावरील बी-बियाणे उद्योगाच्या 'एशियन सीड काँग्रेसचं आयोजन करण्यात आलं असून, रावल यांनी काल या परिषदेला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. चांगल्या आणि उच्च प्रतीच्या बियाणे उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहित करणं, शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देणं, त्यातून राज्याची उत्पादकता वाढवणं, आधुनिक प्रक्रिया उद्योगांना चालना देणं, शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी योग्य बाजारपेठ आणि हमीभाव मिळवून देणं यासाठी राज्य शासन ठोस पावलं उचलत असल्याचंही रावल यांनी यावेळी नमूद केलं.

****

उद्योग समूहांच्या सहकार्यानं आयटीआयच्या विद्यार्थ्यांचं कौशल्य विकसित करुन कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासनानं पुढाकार घेतला आहे. उद्योग समूहांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता यावं, यासाठी कौशल्य विभाग प्रयत्नशील राहील असं कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत बोलत होते.

****

नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातली एक हजारहून अधिक झाडं तोडण्यात येणार असून, या विरुद्ध नाशिककरांनी काल चिपको आंदोलन केलं. महापालिकेला झाडतोडीविरोधात चारशे हरकती प्राप्त झाल्या असून, त्यावर आज सुनावणी घेण्यात येत आहे.

दरम्यान, सर्वेक्षण करून गरजेनुसारच झाडं तोडण्यात येतील तसंच त्यासाठी शासन नियमाचं पालन करून एका झाडाच्या बदल्यात सात झाडं लावण्यात येतील, अशी माहिती महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त करीष्मा नायर यांनी दिली.

****

भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यात कॅनरा बँकेच्या चिखला शाखेत झालेल्या एक कोटी ५८ लाख रुपयांच्या चोरीचं प्रकरण पोलिसांनी १२ तासांत उघडकीला आणलं. तांत्रिक तपासात बँकेच्या सहायक व्यवस्थापकानंच चोरी केल्याचं निष्पन्न झालं. तो प्रशिक्षणाच्या बहाण्यानं नागपूरला पळून गेला होता, असं पोलिसांनी सांगितलं .

****

जपानमध्ये टोक्यो इथं सुरू असलेल्या मूकबधीरांच्या २५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय नेमबाजांनी आपली घोडदौड कालही सुरू ठेवली. अभिनव देशवाल आणि प्रांजली धुमाळ या जोडीनं १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. नेमबाजीत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत ११ पदकं जिंकली आहेत.

****

सिडनी इथं सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांनी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. तर किदाम्बी श्रीकांतनं चायनीज तैपेईच्या ली चिया-हाओचा पराभव करून अंतिम १६ मध्ये स्थान निश्चित केलं.

****

No comments: