Saturday, 22 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.11.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 22 November 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ नोव्हेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.

·      बीएसएफला पुढच्या पाच वर्षांत जगातलं सर्वात आधुनिक दल करण्याचं उद्दीष्ट -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

·      पंतप्रधान पीक विमा योजनेत आणखी दोन प्रकारच्या नुकसानाचा समावेश-केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती

·      नवीन कामगार कायदे कालपासून देशभरात लागू

·      छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित ऐक्यम परिषदेचा आज वेरुळ दौरा

आणि

·      बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत दाखल

**

सीमा सुरक्षा दल-बीएसएफला पुढच्या पाच वर्षांत जगातलं सर्वात आधुनिक दल करण्याचं उद्दीष्ट असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सीमा सुरक्षा दलाच्या ६१व्या स्थापनादिनानिमित्त काल गुजरातमध्ये भूज इथे झालेल्या कार्यक्रमात शहा बोलत होते. पुढचं एक वर्षं सीमा सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि सैनिकांच्या कल्याणासाठी समर्पित असेल, असं शहा यांनी सांगितलं. सीमा सुरक्षा दलाच्या कर्तव्यनिष्ठेबाबत बोलतांना शहा म्हणाले….

बाईट- अमित शहा,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

**

ॲग्रो व्हिजन हा ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम असून कृषी संशोधन संस्था, खासगी उद्योग आणि कृषी विद्यापीठ यांना एकत्र आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा उत्तम मंच असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. काल नागपूरमध्ये सोळाव्या ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. पीक विम्यामध्ये आणखी दोन प्रकारच्या नुकसानाचा समावेश करण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री चौहान यांनी यावेळी दिली. ते म्हणाले…

बाईट- केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान

या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

**

नवीन कामगार कायदे कालपासून लागू झाले. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी याबाबतची घोषणा केली. जुन्या कामगार कायद्यांना एकत्रित करून, तयार केलेले हे कायदे सर्व क्षेत्रातील कामगारांच्या हितांचं रक्षण करतात. वेतन संहिता २०१९, औद्योगिक संबंध संहिता २०२०, सामाजिक सुरक्षा संहिता २०२०, आणि ऑक्युपेशनल सुरक्षा, आरोग्य आणि कार्य परिस्थिती संहिता २०२० या चारही कायद्यांमधल्या तरतुदींबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

बाईट – न्यू लेबर लॉ

**

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी चालक आणि वाहकांच्या 'अतिकालिक भत्त्याच्या' नियमावलीत मोठे बदल केले आहेत, यापुढे ओव्हरटाइम देताना 'कमी मूळ वेतन' असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश महामंडळाने दिले आहेत.

**

रस्त्यावरच्या खड्यांमुळे अपघाती मृत्यू अथवा इजा झाल्यास नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी सबंधित विभागाची आहे. भंडारा इथं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मिलींदकुमार बुराडे यांनी ही माहिती दिली. अशा प्रकरणात जखमी किंवा मृतांच्या वारसांनी संबंधीत विभागाकडे अर्ज करावेत, असं आवाहन बुराडे यांनी केलं आहे. चौकशीअंती मृत व्यक्तींच्या वारसांना सहा लाख रुपये तर जखमींना ५० हजार ते अडीच लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाईल. इतर कायद्यांअतर्गत मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेपेक्षा ही नुकसान भरपाई वेगळी तसंच जादा असेल, अशी माहितीही देण्यात आली.

**

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगर परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच नगराध्यक्षांसह सर्वच्या सर्व २६ नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्यात नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक बिनविरोध निवड झालेली दोंडाईचा ही पहिली नगरपालिका ठरली आहे. या निवडीने धुळे जिल्ह्यासह शिंदखेडा तालुका आणि दोंडाईचा शहरात भाजपा पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

**

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १२८वा भाग असेल.

**

पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ईफ्फीच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल. मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली काल सहनिर्मिती या विषयावर राजदूतांची परिषद झाली. पायरसी रोखण्याचे उपाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना, आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.

**

छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित ऐक्यम परिषद आज वेरुळला भेट देणार आहे. या आंतरराष्ट्रीय उत्सवानिमित्त विविध तीस देशांचे सांस्कृतिक राजदूत काल शहरात दाखल झाले. चिकलठाणा विमानतळावर त्यांचं पारंपरिक पध्दतीनं स्वागत करण्यात आलं. आज हे सर्व राजदूत शहरातील बीबी-का- मकबरा, देवगिरी किल्ला आणि वेरुळ लेणीला भेट देणार आहेत. आज सायंकाळी वेरुळच्या कैलास लेणी परिसरात ओंकार हा नृत्य अविष्कार सादर होणार आहे.

**

राज्य सरकारनं साखर कारखान्यांसाठी प्रोत्साहन योजना घोषित केली आहे. या अंतर्गत, वेळेवर कर्ज फेडायला मदत व्हावी म्हणून शेतकऱ्यांना चांगले दर देणाऱ्या साखर कारखान्यांना बक्षीस दिलं जाणार आहे. यंदाच्या गळीत हंगामापासून ही योजना लागू झाली आहे.

**

उसाला साडेतीन हजार रूपये पहिली उचल मिळावी या मागणीसाठी काल धाराशिव इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. जिल्ह्यातल्या कारखान्यांनी लवकरात लवकर दर जाहीर करावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेनं दिला आहे.

**

भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटात  उपान्त्य फेरीत पोहोचला आहे. उपान्त्यपूर्व फेरीत त्याने भारताच्याच आयुष शेट्टीचा २३-२१, २१-११ असा पराभव केला. उपान्त्य फेरीत लक्ष्यचा सामना चिनी तैपेईच्या चाऊ-तिएन-चेन याच्यासोबत होणार आहे. भारताच्या इतर खेळाडूंचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

**

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला आजपासून गुवाहाटी इथं सुरुवात होणार आहे. दरम्यान, जखमी झाल्यामुळे शुभमन गिल ऐवजी ऋषभ पंत हा या सामन्यासाठी कर्णधार आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाने एक सामना जिंकत आघाडी घेतली आहे.

**

अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा ४१ वा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह येत्या २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान साजरा होणार आहे. या तीन दिवसीय महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, समारोप सोहळ्यात यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे.

**

मालेगाव इथं बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ काल कडकडीत बंद पाळण्यात आला. संतप्त जमावाने घोषणाबाजी करत न्यायालय आवाराचं प्रवेशद्वार तोडत आत घुसण्याचा प्रयत्न केला, या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पीडित कुटूंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं.

दरम्यान, या प्रकरणी काल काँग्रेसच्या वतीने छत्रपती संभाजीनगर इथं निषेध करण्यात आला. नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली.

**

छत्रपती संभाजीनगर इथल्या श्री हरिहर सद् गुरु शक्तीपीठ रेणुकामाता मंदिराचे पीठाधीश सद् गुरु अप्पा महाराज यांचं काल रात्री शहरात अल्पशा आजारानं देहावसान झालं.ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

**

नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नगराध्यक्षपदाच्या १२ तर सदस्य पदाच्या १४९ उमेदवारंनी अर्ज मागे घेतले. आता या निवडणुकीत जिल्ह्यातल्या सात नगरपालिका मिळून अध्यक्षपदासाठी ४२ तर सदस्यपदासाठी ६१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत

लातूर जिल्ह्यातही काल नगराध्यक्ष पदाच्या १५ तर सदस्य पदासाठी १०७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. धाराशिव जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी आता ३८  तर नगरसेवक पदासाठी ६४३ उमेदवार रिंगणात आहेत.

**

छत्रपती संभाजीनगर इथल्या सातारा खंडोबा मंदिरात कालपासून षडरात्रोसवाला प्रारंभ झाला. यावेळी घटस्थापना करून विविध धार्मिक कार्यक्रमांनाही प्रारंभ झाला. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

**

राज्यात काल बीड इथं सर्वात कमी १० पूर्णांक एक अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलं. त्या खालोखाल अहिल्यानगर इथं १० पूर्णांक तीन अंश तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर इथं ११ पूर्णांक नऊ, नांदेड ११, परभणी १२ पूर्णांक नऊ अंश तर धाराशिव इथं १४ पूर्णांक एक अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

**

No comments: