Saturday, 22 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.11.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 22 November 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ नोव्हेंबर २०२ सकाळी .०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी, जी-ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग इथं काल पोहोचले. आजपासून ही परिषद सुरु होत आहे. ‘ऐक्य, समानता, शाश्वतता' ही या वर्षीच्या जी-ट्वेंटी परिषदेची संकल्पना आहे.

दरम्यानतीन दिवसांच्या शिखर परिषदेत, पंतप्रधान मोदी  सर्व सत्रांना उपस्थित राहतील आणि जागतिक दक्षिण चिंता, शाश्वत विकास, हवामान कृती, ऊर्जा संक्रमण आणि जागतिक प्रशासनातील सुधारणांसह भारताच्या प्रमुख प्राधान्यक्रमांचे सादरीकरण करतील.

 

या परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. संरक्षण, महत्त्वाची खनिजे, शिक्षण, व्यापार आणि गुंतवणूक यासह विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतील बहुराष्ट्रीय इंटरनेट आणि तंत्रज्ञान कंपनी, नॅस्पर्सच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांशी बैठक घेत स्टार्टअप आणि अवकाश क्षेत्रात गुंतवणूकीसह विविध विषयांवर चर्चा केली.

***

राज्यात उभारल्या जाणाऱ्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या रुग्णालयांसाठी सरकारी जमीन 'महसूल मुक्त' आणि 'सारा माफी'ने मोफत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला. यामुळे राज्यात आरोग्य सुविधांचे जाळे अधिक बळकट होऊन सामान्य कामगाराला मोठा दिलासा मिळणार आहे.

***

 

सार्वजनिक ग्रंथालय कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी हिवाळी अधिवेशनापूर्वी   बैठक घेऊन तोडगा काढावा असं निवेदन  सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं आहे.बैठक न झाल्यास येत्या अकरा डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात  विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचही या निवेदनात म्हटलं आहे.

***

छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातील श्री हरिहर सद् गुरु शक्तीपीठ रेणुकामाता मंदिराचे पीठाधीश सद् गुरु अप्पा महाराज यांचं काल रात्री शहरात अल्पशा आजारानं देहावसान झालं. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सोनई इथल्या योगिराज हंसतीर्थ स्वामी अण्णा महाराज यांचे ते पुत्र होते. अण्णा महाराजांनंतर अप्पा महाराज या शक्तीपीठाचे पीठाधीश झाले होते. शहरासह राज्यभरात आणि देश-विदेशात या शक्तीपीठाचा मोठा शिष्यवर्ग आहे.

***

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, छत्रपती संभाजीनगरच्या पैठण नगरपरिषदेच्या मतदार यादीची पडताळणी करण्यात आली आहे. या पडताळणीत ५६२ संभाव्य दुबार मतदार आढळले आहेत. या सर्व मतदारांनी, आपण कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहोत, याबद्दलचा अर्ज सादर करणे अनिवार्य आहे. हा अर्ज येत्या २९ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत, पैठणच्या तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.

***

धाराशिव जिल्ह्यात आठ नगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या काल अखेरच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी ७१ पैकी ३३ उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत, त्यामुळं आता ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आता परंडा नगरपालिकेत दुरंगी, भूम नगरपालिकेत तिरंगी, उमरगा आणि मुरूम नगरपालिकेत चौरंगी अशा लढती होणार आहेत. धाराशिवसह नळदुर्ग, कळंबच्या नगराध्यक्ष पदासाठी सहा तर तुळजापूरसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. याचसोबत, नगरसेवक पदासाठी २५२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता ६४३ उमेदवारामध्ये निवडणूक होईल.

***

तिरुपती-श्रीसाईनगर शिर्डी-तिरुपती या विशेष रेल्वेगाडीला येत्या ३० नोव्हेंबर ते २९ डिसेंबर या काळात मुदतवाढ देण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे.

***

क्रिकेट - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना सध्या सुरु आहे. गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर या सामन्याला आज सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाली आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकन संघाच्या बिनबाद ८१ धावा झाल्या होत्या. दुखापतीमुळे भारतीय कर्णधार शुभमन गिल दुसरा कसोटी सामन्याला मुकावं लागलं त्यामुळे या सामन्यात यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत भारताचं नेतृत्व करत आहे  नाही. मालिकेत बरोबरी राखण्यासाठी भारतीय संघाला विजय आवश्यक आहे.

***

भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची आज ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत चिनी-तैपेईच्या चाऊ-तिएन-चेनसोबत लढत सुरु आहे. दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी एक सेट जिंकला असून ताज्या वृत्तानुसार, तिसऱ्या सेटमध्ये सेननं १४-७ अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, पुरुष दुहेरी स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी स्पर्धेतून बाहेर पडली आहे.

***

राज्याच्या काही भागात थंडीचा जोर कायम असतानाच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

***

 

 

No comments: