Sunday, 23 November 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.11.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 23 November 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ नोव्हेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      जगभरात महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा प्रचार करण्याच्या पद्धतीत मूलभूत बदल करण्याची गरज पंतप्रधानांनकडून व्यक्त

·      देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सुर्यकांत उद्या शपथ घेणार

·      नांदेड इथं श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम

आणि

·      दृष्टीहीन महिलांच्या टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद; बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनची ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी

****

जगभरात महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा प्रचार करण्याच्या पद्धतीत मूलभूत बदल करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं जी – 20 शिखर परिषदेत, सर्वांसाठी समन्यायी भविष्य – अत्यावश्यक खनिजे, योग्य काम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेवर आधारित शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्रात ते आज संबोधित करत होते. तंत्रज्ञान हे वित्त-केंद्रित नसून मानव-केंद्रित असलं पाहिजे, राष्ट्रीय नसून जागतिक असलं पाहिजे आणि मुक्त-स्रोतांवर आधारित असलं पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले. सर्वांसाठी शाश्वत विकास, विश्वासार्ह व्यापार, निष्पक्ष अर्थकारण आणि समृद्धी सुनिश्चित करणारी प्रगती, आदींचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं. भारतात झालेल्या जी–20 शिखर परिषदेदरम्यान टॅलेंट मोबिलिटी अर्थात प्रतिभाशाली गतिशीलतेवर झालेल्या प्रगतीची आठवण करून देताना, पंतप्रधान मोदी यांनी, येत्या काही वर्षांत प्रतिभा गतिशीलतेसाठी जागतिक चौकट स्थापित करण्यासाठी जी – 20 समुहाने काम करावं, असा प्रस्ताव मांडला.

या सत्राआधी पंतप्रधान भारत-ब्राझील-दक्षिण आफ्रिका अर्थात इब्सा या त्रिपक्षीय मंचाच्या बैठकीला उपस्थित होते. आज शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर त्यांनीदक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. या परिषदेचा आज समारोप होत आहे.

****

देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सुर्यकांत उद्या शपथ घेणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त होत आहेत. न्यायमूर्ती सुर्यकांत पुढचे १५ महिने देशाचे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील, आणि वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्यावर ९ फेब्रुवारी २०२७ ला ते निवृत्त होतील.

हरियाणात हिसार जिल्ह्यात एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी २०११ मध्ये कुरुक्षेत्र विद्यापीठातून कायद्यातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयातही त्यांनी न्यायदानाची जबाबदारी सांभाळली होती, तसंच ते काही काळ हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम ३७० रद्द करणं, तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरणं, बिहारमधल्या मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षणासंदर्भातल्या प्रकरणाच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनसह बार असोसिएशनमधल्या एक तृतीयांश जागा महिलांसाठी आरक्षित करण्यातही न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी योगदान दिलं होतं.

****

नवीन कामगार संहितांनुसार समान कामासाठी समान वेतन सुनिश्चित करण्यात आलं असून, लिंगाधारित भेदभावाला पूर्णतः बंदी आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे कामगार बाजारपेठेत अधिक समता आणि समावेशनाला चालना मिळत आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, मराठवाडा लघु आणि मध्यम उद्योग संघटना आणि कृषीचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष तथा उद्योजक अर्जुन गायकवाड -

बाईट – अर्जुन गायकवाड

****

गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या ५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – इफ्फीच्या आजच्या चौथ्या दिवशी ICFT UNESCO गांधी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अनुपम खेर यांचा तन्वी द ग्रेट हा सिनेमा या पुरस्कारासाठीच्या स्पर्धेत आहे. तसंच आज अनुपम खेर ‘हार मानणं हा पर्याय नाही’ या विषयावर मास्टरक्लास घेणार आहेत.

****

संयुक्त राष्ट्रांच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित ऐक्यम २०२५ या सांस्कृतिक महोत्सवाचा आज समारोप झाला. युनेस्को, राज्य पर्यटन विभाग आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने अजिंठा आणि वेरुळ लेणी परिसरात हा कार्यक्रम घेण्यात आला. भारतीय संस्कृती आणि जगाच्या सामायिक मूल्यांचा सन्मान करण्यासाठी ३० हून अधिक देशांचे कलाकार, तज्ज्ञ आणि प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

****

नांदेड इथं श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त आजपासून २५ नोव्हेंबरपर्यंत अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तख्त सचखंड साहिब इथं विशेष कीर्तन दरबार, सद्भावना रॅली आणि सर्वधर्म संमेलन होणार आहे. तसंच नागरिकांसाठी रक्तदान, वैद्यकीय तपासणी आणि मोफत डायलिसिस कॅम्पचं आयोजन करण्यात आल्याचं गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंह यांनी सांगितलं.

छत्रपती संभाजीनगर इथं आज भव्य वाहन फेरी काढून गुरु तेग बहादूर यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. यावेळी नागरीक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

****

नांदेड शहरानजीक असलेल्या पावडेवाडी इथले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव ग्यानोबाराव पावडे यांचं काल निधन झालं, ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. निजामांच्या राजवटीविरुद्धच्या स्वातंत्र्यसंग्रामात त्यांनी भाग घेतला होता.

****

हिंगोलीत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि उगम ग्रामीण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानभाजी आणि रानफळे महोत्सवाचा आज समारोप झाला. नियमित आहारात रानभाज्यांचा समावेश केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते, वयोमान निरोगी राहतं तसंच औषधोपचारांवरील खर्चातही घट होते, यासंदर्भात या महोत्सवात जनजागृती करण्यात आली. विविध गावातल्या शेतकऱ्यांनी आणलेल्या रानभाज्या आणि रानफळांची माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती.

****

भारतानं पहिल्या दृष्टीहीन महिला टी – ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. आज श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या अंतिम सामन्यात भारताने नेपाळचा सात खेळाडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना नेपाळच्या संघाने दिलेलं ११५ धावांचं लक्ष्य भारतीय संघाने तेराव्या षटकात पूर्ण केलं.

****

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजचा दुसरा दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात बिन बाद नऊ धावा झाल्या. ततपूर्वी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ४८९ धावांवर संपुष्टात आला. कुलदीप यादवने चार, जसप्रित बुमराह, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. भारत ४८० धावांनी पिछाडीवर आहे.

****

भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन यानं ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यानं अंतिम फेरीत जपानच्या युशी तानाका याच्यावर २१-१५, २१-११ अशी सहज मात केली.

****

जागतिक वारसा सप्ताहानिमित्त इंटॅकच्या छत्रपती संभाजीनगर चॅप्टरच्या वतीने, विविध संघटनांच्या सहकार्याने आज शहरात रंगीन दरवाजा ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय असा हेरिटेज वॉक आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मोठ्या प्रमाणात कचरा यावेळी गोळा करण्यात आला.

****

अंबड इथला गायनाचार्य गोविंदराव जळगांवकर स्मृती दत्त जयंती संगीतोत्सव यावर्षी पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर इथं येत्या पाच ते सात डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. हा पहिला शतकोत्तर कार्यक्रम असून, रसिकांच्या आग्रहास्तव महोत्सव संभाजीनगरमध्ये होणार असल्याची माहिती संयोजन समितीने दिली. अनेक नामवंत कलाकार यामध्ये आपली कला सादर करणार आहेत. एमजीएम विद्यापीठ परिसरातल्या रुक्मिणी सभागृहात होणारा हा महोत्सव विनाशुल्क असल्याचंही आयोजकांनी कळवलं आहे.

****

सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी जवळपास सात हमी भाव खरेदी केंद्रं उभारण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी केंद्र शासनानं निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार मू, उडीद आणि सोयाबीन खरेदीकरता नोंदणी सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महामंडळ आणि नाफेड यांच्या संयुक्त विद्यमानं २०२५-२६ या हंगामासाठी कडधान्य खरेदीस सुरुवात करण्यात आली असून, त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन पणन महामंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

****

No comments: